‘आईविना वाढलेली पोर.’
आपल्या लहानपणीच्या गोष्टी आई सांगायची तेंव्हा आपला उल्लेख ती अनेकदा ह्या शब्दांत करीत असे. मी जेंव्हा तिचं लहानपणीचं चित्र डोळ्यांसमोर आणू पाहते तेंव्हा चित्रचौकटीत मधोमध एक सावळी, किडकिडीत, परकर पोलक्यातली मुलगी मला दिसते. चौकटीच्या काठांनी चेहऱ्यांची गर्दी आहे पण तिच्या भोवतालचा अवकाश रिकामा आहे. तिच्या नशिबी हा रिता अवकाश १९१८ सालच्या इंन्फ्लुएंझात आला. गेले १५ महीने कोव्हिडने पोरक्या केलेल्या मुलांच्या बातम्या वर्तमान पत्रांतून सतत येत आहेत. १९१८च्या स्पॅनिश फ्लूच्या साथीत पाच ते १० कोटी माणसं मरण पावल्याचा अंदाज आहे. करोना व्हायरसने आजपर्यंत पांच लाख बळी घेतले आहेत. काळाबरोबर वैद्यकीय ज्ञानाची प्रगती ज्या प्रमाणात झाली आहे त्या प्रमाणात ह्या शतकातल्या महामारीत जीव वाचले आहेत. तरीही लाखो मुलं आईविना वाढणार आहेत. त्यांचे पेपरात आलेले फोटो पाहीले की तिथे मला आईचा चेहेरा दिसतो.
‘मी पांच वर्षांची होते. अण्णा अडीचचा. आई निपचित का पडली आहे कळत नव्हतं. तिला जेंव्हा नेऊ लागले तेंव्हा मात्र मी तिच्या मागे रडत पळू लागले. माझ्यामागे अण्णा. माझ्या आईला कुठे नेता आहात मी ओरडत होते. नंतरचं काही आठवत नाही.’
आईचे वडील, माझे आजोबा, नारायण गंगाधर बेहेरे हे त्यांच्या पिढीतले सर्वात मोठे. त्यांना नाना म्हणत असत. त्यांना वामन, गोपाळ, मोरेश्वर आणि विष्णू (उर्फ मच्चा) असे चार घाकटे भाऊ आणि एक बहीण. आईच्या लहानपणी हे सर्व एकत्र राहत असत. नंतर मोरू काका आणि मच्चा काका सोडून इतर दोन भावांची लग्न झाली. आईला सुशीला काकू आणि सावित्री काकू अशा दोन काकू आल्या. चुलत भावंडं आली. त्या गजबजलेल्या घरात आईकडे आणि धाकट्या अण्णाकडे बघणारी एकच ठाम व्यक्ती होती. आईची आजी.
आजीविषयी आईने आम्हाला अनेक गोष्टी सांगितल्या. पण त्याहूनही अघिक गोष्टी तिने लिहिलेल्या एका लेखात आहेत. तो लेख कोसबाडहून निघत असलेल्या, अनुताई वाघ संपादित ‘सावित्री’ मासिकाच्या फेब्रुवारी १९८३ च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. त्या लेखाचं कात्रण आणि त्याबरोबर इतर अनेक कात्रणं, जुन्या वह्या, डायऱ्या इ. दस्तऐवज आईने जपून ठेवले आहेत. हे छोटेखानी चरित्र लिहीताना मला त्यांची खूप मदत होणार आहे.
आईने आयुष्यभर अनेक प्रकारचं लेखन केलं. मनात जे कोणते विचार असतील, ज्या काही कल्पना असतील, जी खळबळ असेल, ते सगळं ती कागदावर उतरवून काढायची. एकेका लेखाचे अनेक खर्डे तिच्या वह्यांमध्ये आहेत. ती हाडाची लेखिका होती म्हणायला हरकत नाही. तिची लेखन शैली सरळ आणि सुबोध होती हे तिच्या आजीवरच्या लेखावरून कळेलच. तो मी इथे संपूर्ण देण्याचं कारण की तो केवळ आईच्या आजीबद्दलच नाही तर एका अर्थाने आईबद्दलही आहे. लेख वाचल्यावर हे लक्षात येतं.
आजीला जाऊन पुष्कळ वर्षे झाली, परंतू अजूनही दिवसातून कितीतरी वेळा तिची आठवण होते. माझी आई माझ्या वयाच्या ५व्या वर्षी इन्फ्लुएंझाच्या साथीत निवर्तली. माझ्यापेक्षा लहान माझा भाऊ होता. आजी आम्हां दोघांची आई झाली. अति प्रेमाने तिने आमचा सांभाळ केला. माझी आजी सखुताई या नावाने डहाणू गावात ओळखली जाई. करंदीकरांचेकडे तिचे आजोळ. उंबरगांवच्या परांजप्यांचेकडे तिचे माहेर. जवळ जवळ सर्व डहाणू गाव तिच्या नात्याचा! माझी सर्व जडण घडण तिच्या देखरेखीखाली झाली. स्वच्छता, टापटीप, शिस्त, प्रामाणिकपणा करारी स्पष्टवक्ती, प्रेमळ व परोपकारी होती. (ह्या वाक्याचं व्याकराण थोडं चुकलं आहे, पण मी ते तसंच ठेवलं आहे.) तिच्या हाताखाली शिक्षण घेतलेल्या प्राण्याला जगाच्या पाठीवर कुठेही नेऊन सोडलं तरी तो कमी पडणार नाही.
गादीवरच्या चादरी, उशांचे अभ्रे स्वच्छ असले पाहिजेत. पांघरूण स्वच्छ, त्याला कसलाही वास येता कामा नये. जमिनीचे सारवण लखलखीत. चूल-वैल, शेगडीचे सारवण असे की त्याला कुठेही काळा डाग दिसायचा नाही. स्वयंपाक स्वच्छ, चविष्ट, पदार्थाचं सत्व जाईपर्यंत ते शिजवायचे नाहीत हे तत्व! भाज्यांचे रंग गेलेले तिला आवडत नसे. दबावाखाली (अंडर प्रेशर) पदार्थ लवकर शिजतो हे तत्व तिला त्या वेळी माहीत होतं. शिजायला जड असलेल्या भाज्यांवर पाण्याने भरलेलं चकचकीत तपेलं असायचं. एकीकडे भाजी लवकर शिजत असे व दुसरीकडे पाणी तापत असे. इतर कोणाला माहीत नसतील अशा काटकसरी तिच्यात होत्या. पाट्यावर चटणी वाटली की थोड्या पाण्याने पाटा धुवून ते पाणी ती आमटीत घालत असे. तसेच लोण्याची, तुपाची भांडी रिकामी झाली की तशीच घासायला न टाकता त्यात कढी, आमटी सारखे पदार्थ गरम असतानाच ती घालून घ्यायची आणि नंतरच ती भांडी घासायला जायची. ती म्हणायची एक तुपट ओशट भांडे घासायला टाकले तर त्यामुळे बाकी भांडी तुपट होतात. घासणाऱ्याला किती त्रास! त्यापेक्षा थोडं फार तूप पोटात गेलं तर काय वाईट? आज मी म्हणते घासणारणीला त्रास आहेच आणि व्हिमचा खर्चही जास्त. पूर्वी चुलीवर स्वयंपाक होत असल्याने राख हवी तेवढी असायची. भांडी जळू नयेत म्हणून राख ओली करून त्याचे पातेल्यांना बुंधाले करायची पद्धत होती. बुंधाले व्यवस्थित केलेले असले आणी भांडी फळीवर व्यवस्थित उपडी लावलेली असली की वाटावे पंडित-मुनी भस्म लावून वेद पठणाला बसले आहेत.
आजी कोणतंही काम करो, त्यात तिचे व्यक्तिमत्व उठून दिसायचे. मी तासन्तास तिच्याकडे बघत असे व आपण पण अगदी आजीसारखे काम करायला शिकायला हवे असे मला वाटे. ती स्वयंपाक करताना मी कधीही त्याचा पसारा पाहीलेला नाही. चिरलेल्या भाजीत सुद्धा रंगसंगती असायची. थाळीत खवलेला नारळ, जवळच कापलेली कोथिंबीर, मिरचीचे तुकडे, त्याच्या जवळ कापलेला टोमॅटो किंवा गाजराचा कीस असायचा. भाजी चिरताना, नारळ खरवडताना, ताक करताना, लोणी काढताना, पापड लाटताना, पोहे कांडताना, नाक-कान टोचताना, गोंदण करताना, मोदक भरताना, पुरणपोळी तव्यावर घालताना तिचे व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक दिसायचे. जेवताना पण तिचे निराळेपण होते. तिने कालवलेल्या दही-भातातला एक तरी घास खावासा मला वाटे.
ती मातीच्या चुली, शेगड्या घाली. पुष्कळांना घालून पण देई. परंतू मातीचा रबरबाट मी कधी पाहीला नाही. स्वतःच्या चोळ्या पण तीच शिवायची. कितीतरी मुलामुलींचे नाक-कान तिने टोचले. तिचा हात अतिशय हलका असल्याने गोंदून घ्यायला पण तिच्याकडे गर्दी असायची. तिचे गोंदणे हिरवे गार वठे.
ती अर्धी डॉक्टर होती. मूळव्याध, रक्ति आव, कावीळ, व लहान मुलांच्या कफावर अनेक तऱ्हेची औषधे तिच्याकडे होती. आतासारखी त्या वेळी औषधे नव्हती. त्यामुळे लहान मुले कफाने दगावत. पुष्कळ लोक तिच्याकडे औषधासाठी यायची. एकही पैसा न घेता त्यांना ती आनंदाने औषधं द्यायची. लहान मुलाच्या कफासाठी कोणी औषध मागायला आलं तर घरातली कामं भरभर उरकून साधारण सकाळी नऊच्या सुमारास ती स्वतः त्यांच्याकडे जात असे. मुलाची एकूण पाहणी केल्यावर ती त्याला बोंडल्याने औषध पाजायची. मुलाला आपल्या मांडीवरच घेऊन बसायची. साधारण एक-दीड तासांनी मुलाचा कफ सुटायला सुरुवात होई. मुलानी गुदमरून जाऊ नये म्हणून कफाचे घागे ती हाताला गुंडाळून घेत असे. वातीसाठी काढलेले सूत आपण हाताला गुंडाळतो तसे. कफ अतिशय चिकट असे. मुलाची पूर्ण मुक्तता एक-दीड तासांत होई. मग त्याला ती बोंडल्याने दूध पाजत असे. ते प्यायल्यावर मूल निजायचं. त्या नंतरच ती घरी परतायची.
पहाटे लवकर उठायची, खूप काम करायची. दुपारी जर वेळ मिळाला तर १५-२० मिनिटे ती चटईवर निजत असे. केव्हांही मी तिला कंटाळलेली पाहिलेली नाही. देवळात जायची ती पायीच. आमच्या घरापासून देऊळ बरंच लांब होतं. तिचं नेसणं अत्त्यंत व्यवस्थित असे. कितीही वारा असो तिच्या पोटऱ्या कधीही दिसायच्या नाहीत. गार्टर न लावता नेसणं इतकं कसं ठाकठीक कोण जाणे!
आपण जन्मतः जे गुण घेऊन येतो त्यावर माझा विश्वास आहे. आजीचे वडील लवकर गेले. घरात तिला कोणी वळण लावेल असं नव्हतं. मग तिच्या अंगी इतके गुण कसे? आजी श्रीमंत नव्हती. अगदी बेताचा पैसा घरात यायचा. तिला पांच मुलगे व एकुलती एक मुलगी एवढा परिवार होता. त्या शिवाय अनाथ कोणी तरी असायचेच. माझे वडील सर्वात मोठे. त्यांना पुष्कळशी घरातली कामं करायला येत. मोदक व पुरणपोळ्या ते उत्कृष्ट करीत. मी आजीला विचारलं की ती सांगायची, अगं, मोठे पदार्थ करायचा घाट घातला आणि माझी काही अडचण आली, तर ते पदार्थ तुझ्या वडीलांनाच करावे लागत. काहीही काम असो. ते अगदी आनंदाने करायचे.
आजीच्या विषयी लिहायचे झाले तर एक पुस्तक होईल. नोकरांच्या बाबतीत सुद्धा तिचा निराळेपणा होता. माणसांची तिला दया यायची. घर गड्याच्या जेवणाचे पान बघण्यासारखे असे. नोकराला शिळेपाके दिलेले तिला आवडत नसे. घरकामा बरोबर ती समाजकार्य करायची. ते अर्थातच विनामूल्य असे. आजोबा सुद्धा जेंव्हा जेंव्हा वेळ मिळे तेंव्हा स्मशानात जाऊन महारोग्यांची सेवा करीत.
माझी आई गेल्यावर पिंडदानाचा विधी समुद्रावर स्मशानाजवळ चालला होता. काही केल्या कावळा शिवेना. माझे वडील हुषार होते. कावळा शिवावा म्हणून त्यांनी पुष्कळ युक्त्या केल्या, परंतु कावळा शिवेना. शेवटी त्यांनी आजीला बोलावणं पाठवलं. आजी टांग्यातून स्मशानात गेली. तिने कपाळ जमिनीला टेकले. ‘लक्ष्मी, मी तुझ्या मुलांना काही कमी पडू देणार नाही. प्रेमाने त्यांचा सांभाळ करीन.’ असे म्हणताच कावळा पिंडाला शिवला.
मी आजीला त्या काळची सुधारक म्हणत आले. पण आजही तिला मी सुधारक म्हटले असते. तिला ३-४ सुना होत्या. त्यांच्या कामाची विभागणी व्यवस्थित केलेली असे. एकीला जास्त दुसरीला कमी असं नसायचं. रात्री काम आटोपल्यावर प्रत्त्येकीने साडी बदललीच पाहिजे. दिवसभर काम करून घामट झालेल्या साडीत कोणी निजलेले तिला आवडत नसे. बदललेल्या साडीच्या निऱ्या करून, पदराच्या टोकाला चोळी बांधून, त्याची गुंडाळी करून दुर्डीत ठेवायची. दुर्डी पडवीत एका कोपऱ्यात ठेवलेली असे. दुर्डी म्हणजे जिला सध्या आपण लॉंड्री बॅग म्हणू अशी टोपली. नाईट ड्रेसची ही कल्पना तिची स्वतःची होती. संध्याकाळ झाली की प्रत्त्येकीने जाई, जुई, मोगरा वगैरे फुलं आकड्यात ओवून डोक्यात माळलीच पाहिजेत.
हे सर्व गुण उपजताच तिच्या ठिकाणी असले पाहिजेत. विचारी असल्याने कोणते बरे, कोणते वाईट, हे तिला आपोआपच कळे. तिच्या ठिकाणी कर्मठपणा नव्हता. सोवळं म्हणजे स्वच्छ वस्त्र. वर्षभर बासनात गुंडाळून ठेवलेल्या कदाला सोवळं म्हणणं तिला मान्य नव्हतं. धूत वस्त्र म्हणजे सोवळं अशी तिची व्याख्या होती.
अशा निर्मलपणाने आणि परोपकारी बुद्धीने जीवन जगणे या सारखा आगळा आनंद नाही. या गुणांमुळे उगीच कोणा समोर वाकण्याचा प्रसंग येत नाही.
आईच्या आजीच्या ह्या शब्दचित्रात आणि मी रंगवत आहे त्या आईच्या चित्रात फारसा फरक नाही. आई तिच्या आजी इतकीच टापटिपेची, सुग्रण आणि परोपकारी होती. ती जशी आजीकडे बघत रहायची तशी ती पोळ्या लाटताना, मोदक वळताना, चिरोटे तळताना मी तिच्याकडे बघत रहायची.
आजीविषयीच्या ह्या लेखात आईने तिच्या पणजीचा म्हणजे आजीच्या आईचा उल्लेख केलेला नाही. ह्या पणजीविषयी आई एकच गोष्ट सांगत असे. तिचा एक वीक स्पॉट होता. लॉटरीचा नाद. त्याबद्दल आईने ‘लॉटरी’ नावाची खूप मजेदार गोष्ट लिहिली आहे. ती ‘लोकप्रभा’ मासिकाच्या दि ५ सप्टेंबर १९८२ च्या अंकात छापून आली होती. पण त्या आधी तिने ‘महंमद’ नावाची तितकीच मजेदार एक गोष्ट लिहिली होती. डहाणूत झालेल्या एका खऱ्या घटनेवर ती आधारित होती. ती ‘अभिरुची’ मासिकाच्या जुलै १९४९ च्या अंकात ‘बिलावल’ ह्या टोपण नावाखाली छापून आली होती. ‘अभिरुची’चे संपादक पुरुषोत्तम आत्माराम चित्रे हे डॅडींचे मित्र होते. ते आईला लिहिण्यासाठी खूप उत्तेजन देत असत. आईने ही गोष्ट त्यांना दाखवली. त्यांना ती आवडली. मी ही छापतो असं ते तिला म्हणाले. पण आपण आपली गोष्ट त्यांना द्यावी हे डॅडींना योग्य वाटलं नसतं हे ती जाणून होती. तसं करणं म्हणजे मैत्रीचा गैर वापर करणं असं त्यांना वाटलं असतं. म्हणून तिने ‘बिलावल’ हे टोपण नाव वापरलं. नंतर, आमच्याशी काही एक संबंध नसलेल्या लोकांनी त्या गोष्टीचं थोडं फार कौतुक केलं तेव्हा आईने तिचं गुपित डॅडींना सांगितलं. ‘महंमद’ आणि ‘लॉटरी’ ह्या दोन्ही गोष्टी मी प्रस्तुत प्रकरणाच्या शेवटी देत आहे.
आईची आजी ज्या घरात राहिली आणि वारली तिथे मी राहिल्याचं मला जरी आठवत नसलं तरी राहिले होते नक्की. आमच्या फोटो आल्बम मध्ये ताई मावशीचा आणि माझा एक फोटो आहे. त्यात मी त्या घराच्या फाटकावर उभी आहे आणि ताई मावशी माझ्या मागे लपली आहे. आम्ही अडीच-तीन वर्षाच्या असू. फाटकाच्या मागे जे घर आहे ते माळ्याचं घर म्हणून सहज ओळखू येतं. त्या घराविषयीच्या अधिक माहितीसाठी मी ताई मावशीला फोन केला. ती म्हणाली, ‘अगं, त्याच घराच्या कौलांवरून तर राजा पडला होता.’ मग तिने मला ते घर माळ्याकडे कसं आलं त्याची कथा सांगितली. गावातल्या करंदीकर कुटुंबातल्या कोणा एका भावाने नानांवर केस केली होती. ती नाना हरले. त्या काळात पैशाचा सर्व व्यवहार हुंडी देऊन-घेऊन होत असे. हुंडींवर अवलंबून राहायचं म्हणजे दोन्ही पार्ट्या प्रामाणिक आणि विश्वासू असणं गरजेचं असायचं. एकाने दुसऱ्याला ठकवायचं ठरवलं तर हुंडी फाडून महत्त्वाचा पुरावा नष्ट करता येत असे. अशा काहीशा कारणाने नाना केस हरले. गेलेल्या पैशाची भरपाई करण्यासाठी त्यांनी आपलं राहतं घर माळ्याला विकलं आणि कारखान्याच्या मागे घर बांधून तिथे सगळा संसार हलवला. माझ्या ठळक स्मृतीतलं घर मात्र नानांनी १९४५-४६च्या सुमारास किंवा त्या आधीही बांधला असावा तो निळा बंगला. गांधींच्या हत्तयेनंतर त्यांनी अंगणात सुंदर गांधी मंदीर बांधलं ज्यात चार कोनाडे होते. एकात गीता, एकात बायबल, एकात ग्रंथ साहिब आणि एकात कुराण. ह्या घरात निर्मलने आणि मी अनेक सुट्ट्या मजेत घालवल्या.
ह्या घराची रचना अजूनही डोळ्यां समोर आहे. Behere’s Industrial Works ह्या कमानी पाटीच्या खालून फाटकातून कारखान्याच्या आवारात शिरलं की डाव्या हाताला निळा बंगला. त्याला समोर ओसरी. तिच्या उजव्या कोपऱ्यात नानांचा चरखा. त्या पलीकडे त्यांची खोली. तिथे उंच पलंग. त्यावर नंतरच्या काळात नाना पेशंस खेळत बसलेले असायचे. ओसरीतून आत शिरलं की माजघर. समोरच्या भिंतीवर नानांच्या आईचा आणि वडिलांचा फोटो. डाव्या हाताला माडी. माढीवर आण्णा मामा आणि लीला मामींची खोली. मामाने काही वर्षांची त्याचा बंगला बांधला. माजघराच्या दारातून पुढे गेलं की पडवी. वरती कपडे वाळत घालाय्च्या दांड्या. खाली भिंतीला टेकून बसलेली पिली मावशी. तिच्यापुढे बसका मेज. त्यावर तिला निवडायला दिलेलं धान्य किंवा पोथी. पडवीच्या डाव्या हाताला ती संपूर्ण बाजू व्यापणारी स्वयंपाकाची आणि जेवणाची खोली. त्यात लांबलचक जेवणाचं टेबल. पलीकडे ताकाचा डेरा आणि दोराने फिरवायची उंच रवि. पडवीच्या दारातून दोन पायऱ्या उतरलं की एक पॅसेज. उजव्या हाताला सरपण भरलेला बंब समोर न्हाणीघरांची ओळ.
ह्याच घरात नलू मावशीचं १९४८ साली धुमधडाक्यात लग्न झालं. लग्नातल्या नानांच्या आणि आजीच्या फोटोंवरून त्या दिवसाची धांदल लक्षात यावी. आम्ही बराच वेळ वरच्या खोलीत घालवला. तिथे ग्रामोफोन होता. त्यावर नुकतीच प्रकाशित झालेली लता मंगेशकरची रेकॉर्ड, तुजं स्वप्नी पाहिले रे गोपाळा आम्ही पुन्हा पुन्हा ऐकत होतो आणि गुलाबाच्या अर्काने सुवासिक झालेलं गुलाबी रंगाचं दूध कोल्ड ड्रिंक पीत होतो.
आता पुन्हा आईकडे वळते. आईचं माहेरचं नाव यमुना. तिला यमू म्हणणारे लोक माझ्या लहानपणी पुष्कळ होते. इतर नातेवाईक आणि त्यांचा मित्र परिवार तिला अक्का म्हणत असे. तिचं लग्न झालं तोवर तिला यमुना हे नाव जुनाट वाटू लागलं असावं. कारण लग्नात ते बदलून तिने इंदिरा नाव पसंत केलं. आईचं लग्न १९३८ साली झालं. तेंव्हा इंदिरा गांधी २१ वर्षांच्या होत्या आणि त्यांचे वडील जवाहरलाल नेहरू गांधींचे सर्वात तडफदार अनुयायी, साथीदार आणि आधुनिक जगाचे प्रणेते होते. आधुनिकतेची हाक डहाणूपर्यंत पोहोचली होती. न जाणे धाकट्या यमूच्या मनात कोणत्या सुप्त आकांक्षा जाग्या होत होत्या. ती मला एक दोनदा म्हणाली होती तिला वैमानिक व्हायला आवडलं असतं. अशा मुलीला, त्या काळात, इंदिरा नाव भविष्यातल्या शक्यतांचं द्योतक वाटत असलं तर नवल नाही. इंदीरा गांधी गेल्या तेंव्हा आईने जी कविता लिहिली त्यावरून तिच्या मनात त्यांच्याविषयी खोल आदर होता हे उघड आहे. तिला कार्यक्षम, कर्तबगार, धाडसी बायकांविषयी आदर होता. ज्या बायका एवढ्याशाचं एवढं मोठं करायच्या त्या ती केवळ सहन करायची. तिच्या अशाच एका जवळच्या मैत्रीणी बद्दल ती एक काल्पनिक स्वगत म्हणून दाखवायची: ‘आज किनई मी आमटी करणार आहे हं का. आता किनई मी आमटी करत्येय हं का. आज किनई मी आमटी केली होती हं का.’
बेहेऱ्यांच्या संयुक्त कुटुंबात आईला तिच्या काळेपणाची सतत जाणीव करून देण्यात येत असे. त्याविषयी ती एका प्रातिनिधिक घटनेबद्दल सांगत असे. ‘नाना फिरतीवर जात असत. येताना सर्वांसाठी काहीतरी आणत असत. एकदा त्यांनी धारवाडी खण आणले होते. कोणत्या तरी काकूने किंवा आत्त्याने ते बोचकं उघडलं. बोचक्यात रंगीबेरंगी खणांची चळत होती. खणांची वाटणी झाली. ‘तू गोरी आहेस, हा तुला छान दिसेल. तू उजळ आहेस तुला हा शोभेल. असं करून शेवटी आपली यमू काळुंद्री. तिला कोणता बरं बरा दिसेल? तसा एकच तर खण उरला होता. तो त्यातल्या त्यात मंद रंगाचा होता म्हणून तो माझ्या वाटणीला आला.’ आम्हा बहिणींच्या परकर-पोलक्या साठी तिने जेव्हा प्रथम धारवाडी खण घेतले तेंव्हा आम्हाला ही गोष्ट सांगितली होती. आमच्यासाठी घेतलेले दोन्ही खण चुकचुकीत रंगांचे होते. निर्मल आणि मी दोघीही सावळ्या. आई म्हणाली, ‘आपल्या रंगाला सगळे रंग खुलून दिसतात. कामाटी बायकांच्या साड्या-चोळ्यांचे रंग बघा—गुलबाक्षी, नारिंगी, लाल चुटक. किती सुंदर दिसतात त्या.’
आई आजीच्या गोष्टीं सांगायची तशीच नानांच्याही सांगत असे. त्यांच्यावर तिचं गाढं प्रेम होतं. त्यांच्या शोधक बुद्धीचा तिला खूप अभिमान होता. ‘ते फक्त मॅट्रिक झाले होते पण त्यांनी एकहाती राईस मिल बनवण्याचा कारखाना उभारला.’ आम्ही सुद्धा डहाणूला जायचो तेव्हा Behere’s Industrial Works ही पाटी अभिमानाने वाचायचो. नानांनी बरेच प्रयोग केले. त्यातला एक होता अत्तरं बनवण्याचा. आईकडे अनेक वर्ष चापच्या बटणाची एक चपट काळी पेटी होती. ती तिने तिच्या मोठ्या कपाटाच्या एका खणात ठेवली होती. मी अधून-मधून ती उघडून बघत असे. त्यात अत्तराच्या सहा लहान कुप्या होत्या. त्या कुप्या नानांच्या संशोधनाचं फलीत होतं. मी प्रत्त्येक कुपीतलं अत्तर हुंगत असे. आई-डॅडींच्यात कोणत्याही प्रकारचा रंगेलपणा नव्हता. ते नाटकांना, मैफलींना जायचे पण अत्तर-बित्तर लावून कधीही नाही. वर्ष लोटली तशी हळूहळू कुप्यांमधली अत्तरं उडून गेली. मागे राहिला फक्त मंदसा वास. काही काळाने तोही नाहीसा झाला.
नानांची बुद्धी शोधक होती तसेच त्यांचे हात कलात्मक होते. आई म्हणत असे, ‘नाना अत्त्यंत सुबक मोदक वळत असत. ठेंगणे बसके नाही. उभट, पुरणाने गच्च भरलेले, अनेक पाकळ्यांचे.’ नानांच्या मोदकांचा आदर्श समोर ठेवून आई मोदक करत असे. तिच्या मोदकांकडे बघत बसावं वाटे. पण बासमती तांदळाच्या उकडीचा घमघमाट आणि पुरणाचा सुगंध फार वेळ स्वस्त बसून देत नसे. आपण कधी मोदक फोडतोय, त्यात साजुक तुपाची धार सोडतोय आणि खातोय असं होई.
नानांच्या इतर दोन-तीन गोष्टी आई सांगत असे. एकदा डहाणूच्या समुद्र किनारी उभे असताना दूर नजर लावून ते म्हणाले होते, ‘आपल्याला जर्मन राइस मिल्सना टक्कर द्यायची आहे. करू या.’ त्यांच्या डोळ्यांसमोर हे फार मोठं ध्येय होतं. त्या काळचा राष्ट्रीयवाद हा असा दूर दृष्टीचा, ठोस कृतीचा होता. केवळ नारेबाजीचा नाही. नानांच्या अंगी झेप घेण्याची क्षमता होती. ते धोपट मार्गाने जाणारे नव्हते. आमच्या लहानपणी इतर कोठेही न पाहिलेली गोष्ट आम्हाला बेहेरज इंडस्ट्अल वर्क्सच्या आवारात पाऊल ठेवण्या आधीच दिसे. ती म्हणजे बंद केलेल्या विहिरीवरची उंच पवनचक्की. हिचे काम काय वगैरे गोष्टी तेव्हा माहीत नव्हत्या. पण हे एक नाविन्य आहे ही जाणीव खचितच तेंव्हाही होती.
नानांचे विचार प्रत्त्येक बाबतीत बुद्धिनिष्ठ होते. ते गांधीवादी होते. निळ्या बंगल्याच्या ओसरीत त्यांच्या चरख्याला प्रधान स्थान होतं. ते मुंबईला आले की घरी चक्कर करायचे. स्वच्छ पांढरं घोतर-सदरा, खादीचं जाकीट, त्याच्या खिश्यात साखळीचं घड्याळ ही मूर्ति आम्हाला अत्यंत प्रिय होती. आल्या-आल्या खिशातून बदाम पुरीचं पाकीट काढून ते आमच्या हातावर ठेवायचे. नानांचा गाधींवाद अंधळा नव्हता. गांधींचे आधुनिकतेच्या विरोधातले विचार त्यांना नक्कीच पटणारे नव्हते अशी मला खात्री आहे. नानांचे विचार पुरोगामी होते. त्यांनी आपल्या सर्व मुलांची लग्न रेजिस्टर्ड पद्धतीने करून दिली. त्यांच्या बुद्धिनिष्ठ विचारसरणीचा पुरावा आईने सांगितलेल्या एका गोष्टीत मिळतो. गावातल्या कोणत्याशा पिंपळावर भूत आहे अशी अफवा गावात पसरली होती. नानांचा भूताखेतांवर विश्वास नव्हता. त्यांच्या जेंव्हा लक्षात आलं की धाकट्या यमूचा ह्या अंधश्रद्धाळू गोष्टीवर विश्वास आहे तेंव्हा ते तिला मध्यरात्री त्या पिंपळाकडे घेऊन गेले. म्हणाले दाखव कुठे आहे तुझं ते भूत. अर्थात भूत कुठेही दिसलं नाही. पिंपळावर भूत नाही हे जरी नानांनी यमूला पटवून दिलं होतं तरी आपण कधी घरी जातोय असं तिला झालं होतं. नंतरच्या आयुष्यात मात्र ती अंधश्रद्धेला सामोरी गेल्याची दोन तरी उदाहरणं आहेत. माझ्या वेळी बाळंतपणासाठी ती डहाणूला गेली होती. तिच्या आठव्या-नवव्या महिन्यात कधी तरी ग्रहण लागलं होतं. गरोदर बाईने अशा वेळी बाहेर जाऊ नये असा समज होता. हे खोटं ठरवण्यासाठी आई मुद्दाम अंगणात जाऊन बसली होती. मी धडधाकट झाले तो त्या अंधश्रद्धेला खोटं पाडणारा पुरावा होता. त्याने इतरांचं नाही तरी तिचं समाधान झालं. तिच्या बुद्धिनिष्ठ विचारसरणीचं दुसरं उदाहरण डॅडी गेल्यानंतरचं आहे. ते ओघाने येईलच.
आपण धाडसी आहोत तशी आपली लेकही धाडसी असेल अशी नानांची खात्री होती. आणि ती बरोबरही होती. आई कोणाचीही मदत न घेता विहिरीत उडी मारून आपली आपण पोहायला शिकली. नाना एकदा जंगलात गेले असता त्यांना एक हरवलेलं वाघाचं पिल्लू सापडलं. ते बिबट्या वाघाचं असावं. त्यांनी ते यमूसाठी घरी आणलं. यमूने ते पाळलं. नानांच्या शाकाहारी घरात ती त्या पिल्लाला काय खाऊ घालत असेल कोण जाणे. त्याला आंबे आवडायचे एवढं मात्र तिने आम्हाला सांगितलं होतं. पिल्लू व्यवस्थित वाढत होतं. पण ती एकदा तिच्या आजोळी, जव्हारला गेली असताना घरच्या गड्याने त्याला घासून-पुसून आंघोळ घातली आणि ते मेलं. आईचा आपल्या आजोळाशी फार संबंध होता असं वाटत नाही. त्यांच्याविषयी तिने आम्हाला काहीही सांगितल्याचं आठवत नाही. मात्र तिचे एक वयस्क मामा सटीसामाशी तिला भेटायला येत असत. त्यांना ती जाईल मामा म्हणत असे. ह्यावरून वाटतं की ते तिचे सख्खे मामा नसावेत.
नानांच्या अंगी आणखी एक गुण होता. संगीत. नाना स्वतः तबला वाजवत असत. आई, नलू मावशी, सिंधू मावशी, ताई मावशी, सर्वांचे गळे गोड. पैकी आई आणि नलू मावशी रीतसर गाणं शिकल्या. मामांपैकी कोणी शिकलं नाही तरी त्यांच्यात उपजतच तो कलागुण होता. वासू मामा, सुधाकर मामा, राजा मामा हे सर्व बासरी वाजवत असत. वाद्य उचललं की वाजवलं असं त्यांचं होतं. गोपाळकाकाचा मुलगा शशी उत्तम गात असे. तो मुंबईला आमच्या घरी अनेकदा येत असे. (गोपाळ काकाची सर्वात थोरली प्रमिला दखील येत असे. सिवित्री काकू आणि आई यांच्यात प्रेमाचं नातं होतं.) तर शशी घरी आला की त्याने तलत महमूद आणि हेमंत कुमारची एकदोन गाणी गायल्या शिवाय आम्ही त्याला सोडत नसू. बेहेरे कुटुंबात आणखी एका सदस्याच्या अंगी कला होती. चित्रकला. आईचे मोरू काका उत्तम चित्रं काढत असत. त्यांनी डॅडींचं पेन्सिलने काढलेलं मोठं चित्र माझ्या खोलीच्या एका भिंतीवर लावलेलं आहे. लोकांना प्रथम तो फोटोच वाटतो. बारकाईने बघितल्यावर लक्षात येतं की ते हाताने काढलेलं रेखाचित्र आहे.
ह्या सर्व गुणांबरोबर नानांचा एक अवगूण होता. आम्हां बहीणींना तो कधी दिसला नाही. पण आई त्याविषयी सांगत असे. ते संतापी होते. त्यांच्या रागाचं एक मोठं कारण मुलांचं रडणं. मच्चा काकाच्या बाबतीत तेच कारण झालं की काय माहीत नाही पण आई सांगत असे की रागाच्या भरात नानांनी त्याला उचलून बाहेर फेकला. त्यामुळे तो खुजा राहीला आणि त्याच्या पाठीला कायमचं पोक आलं. नानांना मुलांचं रडणं न खपणं ह्याचा पुढे यमुच्या आयुष्यावरही परिणाम झाला.
नानांनी पुन्हा लग्न केलं. त्यांची दुसरी बायको आई पेक्षा फक्त सात वर्षांनी मोठी होती. तिचा जन्म १९०६चा. आईचा जन्म १९१३चा. लग्नात आजी १३ वर्षांची होती. म्हणजे लग्न १९१९ आणि १९२०च्या काठावर झालं असावं. बायको गेल्यावर विधुरांनी दुसरा विवाह वर्षाच्या आत करावा असं शास्त्र सांगतं. त्या प्रमाणे नानांनी केलं असावं. नाना त्या वेळी ३० वर्षांचे होते. मुलींची लग्न आपल्यापेक्षा वयाने इतक्या मोठ्या पुरुषांशी करून दिली जात असत, आणि तेही बिजवरांशी, ही आपल्या तत्कालीन संस्कृतीतली दुष्ट रुढी होती. त्या रुढीच्या मुख्य बळी गरीब बापांच्या मुली होत्या. आजीला सहा बहिणी आणि एक भाऊ. तो सर्वात धाकटा. अत्यंत रुबाबदार अण्णू मामा. त्याचा आईवर खूप जीव होता. त्याचं आणि डॅडीचंही खूप पटायचं. काही वर्षांसाठी तो, मंगला मामी, आणि आजीची आई असे सर्व जण आमच्या जवळच राहत असत. त्यामुळे घसट खूप वाढली.
आजीचे वडील शाळा मास्तर होते. त्यांना असून असून किती पगार असणार? घरात एकूणच हाल. अशा परिस्थितीत आई-वडीलांनी काय करावं? नाना वयाने मोठे होते, बिजवर होते, तरी त्यांचं स्थळ उत्तम होतं. मुलीला राहायला चांगलं घर आहे. खायला सकस अन्न आहे. एवढं आई-वडीलांनी पाहीलं. अशा प्रकारे १३ वर्षांची काशीबाई त्र्यंबक घाणेकर बेहेऱ्यांच्या घरात लक्ष्मीबाई नारायण बेहेरे म्हणून नांदू लागली. सर्वात मोठ्या मुलाची बायको म्हणून ती ‘मोठी काकू’ झाली. त्या काळात स्त्रीला जे स्थान बहाल केलं होतं आणि जे रूढी प्रधान प्रांतांत आणि कुटुंबांत आजही टिकून आहे, त्यात तिचं मुख्य कार्य कुटुंबास खाऊ-पिऊ घालणं आणि मुलांना जन्म देणं हे होतं. आजीनी ही दोन्ही कार्य इमानाने पार पाडली. आई सांगायची की आजीच्या पुढ्यात रोज सकाळी कणिकेचा अवाढव्य गोळा असायचा. त्याची तासाभरात पोळ्यांची उंच चळत बनत असे. आम्ही पाहीलेली आजी देखील पहाटे ताक घुसळण्यापासून ते रात्रीच्या स्वयंपाकापर्यंत स्वयंपाकघरात असे. सकाळी अंगणातल्या वृंदावनातल्या तुळशीची पूजा करण्या पुरेशी तिला आम्ही घरा बाहेर पाऊल टाकताना पाहीलेली आहे. स्वयंपाक लाकडाच्या चुलीवर. आजीच्या हाताची चव सर्व मुलींच्या हाती उतरली. पण त्यांनी गॅसवर किंवा अव्हनमध्ये केलेल्या दह्या-दुधाच्या केकला आजीने लाकडावर केलेल्या केकची कशी चव येणार? आई बरेच वर्ष कोळशाच्या शेगडीवर परात ठेऊन आणि वरती थाळीवर कोळसे ठेऊन आजीचा केक करत असे. तेव्हां त्याला तो खमंग स्वाद येत असे. नंतर केक अव्हन मध्ये गेला आणि तो स्वाद पळाला. आजीच्या आमटीची चव तशीच. ती अजूनही माझ्या जिभेवर आहे. आई त्याच पद्धतीने आमटी करायची, तरी मुंबईचं पाणी वेगळं म्हणून चव वेगळी व्हायची.
आजीची दुसरी ठळक आठवण म्हणजे आम्ही भगवानच्या मळ्यात कोवळी तोंडली आणि कच्च्या कैऱ्या खात उंडारत नसू, किंवा पत्ते खेळत नसू, तेव्हां मी तरी निदान तिच्या कुशीत शिरायची संधी घेत असे. तिचा सकाळ पासूनचा थकवा ती दुपारी लहानशी झोप काढून घालवत असे. तिचा पलंग मोठा होता. त्यावर आम्ही तिच्याबरोबर व्यवस्थित मावायचो. ती त्या काळात स्थूल झाली होती. तिच्या पोटाची वळी दाबण्यात मला खूप मौज वाटत असे. आजी हसायची. तिचं हसणं मला खूप आवडत असे.
तिची आणखी एक आठवण आहे. ती डहाणूची नसून मुंबईची आहे. आजी एकदा आमच्याकडे आली होती. तिला घारापुरी बेटावर लेण्या बघायला नेण्याचा बेत केला होता. अपोलो बंदरला आम्ही बोटीत चढत असताना तिचा पाय घसरला. ती पडली आणि तिच्या गुडघ्याला मार बसला. गुडघा सूजला. रक्त साकळलं. माझ्या आयुष्यात प्रथमच उपचार म्हणून जळवा लावलेल्या मी तेव्हा पाहील्या.
हळूहळू सर्व मुलं डहाणूतून बाहेर पडली. नाना १९५४ साली ब्रेन ट्यूमरनी गेले. आता निळ्या बंगल्यात एकटा वासू मामा, त्याची बायको उषा मामी, मुलं सुषमा आणि अभिजीत इतकेच राहिले. साधारण १९७४च्या सुमारास आजीने देखील डहाणू सोडलं. ती मुंबईत राजा मामाकडे विले पार्ल्याच्या जय विजय सोसायटीत राहायला आली. ऱाजा मामाच्या शेजारी ताई मावशी. एका घरात सीमा-उदय. दुसऱ्या घरात राजू-राणी. निर्मल आणि मी अनेकदा आमच्या चार मुलांना घेऊन ताई मावशीकडे रविवारचे जात असू. तिथे पुन्हा आजी भेटायची. पण तोपर्यंत तिच्या चेहेऱ्यावरचं हसू मावळलं होतं. आयुष्यभर खस्ता खाऊन ती थकली होती. नंतर तिला अरू मामाने आपल्याकडे डोंबिवलीला रहायला नेलं. तिथे आम्ही एकदाच तिला भेटायला गेलो होतो. ती फार बोलत नसे. पण तिची भेट झाली त्याचा आम्हाला आनंद झाला. १९८० साली ७४व्या वर्षी आजी गेली. उभ्या आयुष्यात तिने कशाहीबद्दल तक्रार केली असेल असं वाटत नाही. तिच्याविषयी बोलताना आई अनेकदा म्हणत असे, ‘मोठी काकू गरीब गाईसारखी होती.’ आजीला एकामागे एक मुलं होत गेली तेंव्हां त्यांना सांभाळण्यासाठी आईच्या मदतीची घरात निकड उत्पन्न झाली. ती चौथीत असताना तिचं नाव शाळेतून काढण्यात आलं.
ही गोष्ट आईने आम्हाला अनेकदा सांगितली आहे. आपण गतकाळाविषयी बोलताना आपल्या स्मृतींवर विसंबून राहतो. पण स्मृतीं फसव्या असू शकतात. म्हणून आईने सांगितलेल्या गोष्टीवर मी विचार केला आणि वाटलं की ती बराबरच होती. आपण असं धरून चालूया की आईचं शाळेतून नाव काढलं तेंव्हा ती नऊ वर्षांची होती. तिचा जन्म १९१३चा. म्हणजे तिचं शाळेतून नाव १९२२ साली काढलं असावं. तोपर्यंत आजीला किती मुलं झाली होती? पहिली पिली. खरं नाव वाराणसी. पिली असं नाव का तर तिला लहानपणी पोलिओ झाला आणि ती पांगळी झाली म्हणून. आई म्हणायची ती पांगळी झाली नसती तर सख्या आणि चुलत बहीणींच्यात ती सर्वात सुंदर ठरली असती. तिचा सांभाळ करणं कठीण काम होतं असावं. पिली मावशीच्या पाठीवरची दोन मुलं गेली, पण काही काळ जगून. त्यांच्याविषयी आईने आणखी काही सांगितलं नाही. १९२६ साली, आजीच्या २०व्या वर्षी, अंतू मामाचा जन्म झाला. तेंव्हा आई १३ वर्षांची होती. त्या नंतरची सर्व मुलं जगली. आणि त्यांच्याविषयी आई अनेकदा बोलत असे. नलू मावशी, वासू मामा, सुधाकर मामा-सिंधु मावशी जुळी, राजा मामा, इतक्या मुलांचा तिने सांभाळ केला. आजीचा हा दीड वर्षाचा पाळणा १९३९ सालापर्यंत चालू होता. ताई मावशीच्या जन्मानंतर तो थांबला.
मला समज आली त्या नंतर मी आईला विचारल्याचं आठवतंय की त्या काळात संतती नियमनाच्या उपायांचा प्रचार ऱ. धों. कर्वे करू लागले होते. नाना इतके पुरोगामी मतांचे होते तर त्यांनी इतकी मुलं का होऊ दिली? व्यक्तिशः मला त्याची खंत नव्हती. सर्व मामा-मावश्यांवर माझं अतोनात प्रेम होतं. माझा प्रश्र्न स्त्रीवादातून आला होता. प्रश्र्नाचं उत्तर आईकडे होतं. ‘अगं नानांनी हा विचार केला होता. जुळी भावंडं झाल्यानंतर मोठ्या काकूची घरातल्या कामांच्या रगाड्यातून एकदा जेमतेम सुटका करवून तिला त्यांनी मुंबईला ऑपरेशनसाठी पाठवली होती. पण नेमकी ऑपरेशनच्या दिवशी तिची मासिक पाळी सुरू झाली. आणि बेत रद्द करायला लागला. त्यानंतर मात्र पुन्हा तो खटाटोप करणं नानांना जमलं नाही.’
आईला शाळेतून काढल्याचं तिला फार वाईट वाटलं. मनात जपून ठेवलेलं शिक्षणाचं स्वप्न तिने लग्नानंतर पूर्ण केलं. त्याविषयी मी ओघाने सांगेनच. आई मुलांना सांभाळायची म्हणजे नेमकं काय करीत असे ह्याविषयी तपशीलवार तिने कधी सांगितलं नाही. ती बोलायची ते नेहमी रात्रीविषयी. फक्त अंगावर पीत असलेलं मूल आजीकडे झोपत असे. बाकी सर्व मुलं आईकडे. ‘अनंता सोडून मोठ्या काकूची सर्व मुलं कहर रडकी’ हे वाक्य तिने अनेकदा उच्चारलेलं आहे. नानांना मुलांचं रडणं सहन होत नसे. आई त्यांच्या कामाविषयी, मेहनतीविषयी, उद्योगात येत असलेल्या अनेक अडचणींविषयी सतत जागरूक असायची. त्यांना कोणताही त्रास होऊ नये ह्याची ती काळजी घेत असे. रात्री शेजारचं मूल रडू लागलं आणि लवकर शांत होण्याचं चिन्ह दिसलं नाही की आई त्याला उचलून अंगणाच्या टोकाला न्यायची आणि ते पुन्हा झोपेपर्यंत तिथेच उभी रहायची. आईला झोपेचा त्रास होता तो कदाचित ह्यामुळे सुरू झाला असेल.
आईच्या तरूणपणी तिच्याविषयी गावात एक अफवा उठवली गेली होती. अफवा कोण उठवतं हे कधीच कळत नाही. वातावरणात विष कालवल्या शिवाय ज्यांना चैन पडत नाही असे लोक सर्वच समाजांत असतात. आजकाल त्यांना समाज माध्यमांनी भरपूर हात दिल्यामुळे ट्रोल नावाचा एक प्राणी जन्मास आला आहे जो लोकांची आयुष्य बिनदिक्कत उध्वस्त करतो आहे. अशाच कोणा व्यक्तीने अफवा पसरवली की यमु बेहेरेला क्षयरोग झाला आहे म्हणून ती इतकी हडकुळी आहे. नानांनी आईला असल्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला. तो तिने घेतला. पण त्यातून ती एक धडा शिकली जो तिने आम्हाला देखील शिकवला. आपल्याकडे एखादा माणूस जेंव्हा दुसऱ्या विषयी काही तरी वाईट बोलतो तेंव्हा त्याच्यावर लगेच विश्र्वास ठेवायचा नाही. प्रथम विचार करायचा, आपल्याला हे सांगण्यामागे त्याचा हेतू काय असेल? त्या व्यक्तीविषयी आपलं मन कलुषित करणं हाच हेतु असणार. ते करून त्याला काय मिळणार आहे? असुरी आनंद. आपण त्याच्यावर विश्वास ठेवून अशा आनंदाला खत पाणी घालावं का?
आई मोठी झाली तशी नानांनी तिच्यावर कारखान्याचा हिशेब ठेवण्याची जबाबदारी टाकली. ती पै पैचा हिशेब ठेवत असे. त्यामुळे कारखान्यातल्या कामगारांमध्ये तिच्याविषयी आदर निर्माण झाला. ती मुलगा असती तर तिने नानांना पुढे देखील उत्तम साथ दिली असती. पण ती मुलगी होती. तिचं भवितव्य कारखान्याची मॅनेजर किंवा वैमानिक होण्यात नव्हतं. विवाह होण्यात होतं. आईने नानांचा रंग घेतला होता तर अण्णा मामाने आईचा घेतला असावा. आज सावळ्या मुलींची लग्न व्हायला जितका त्रास होतो तितका त्या काळात होत नसावा असा माझा तर्क आहे. डॅडींची आई सावळी होती. त्या पिढीतल्या इतर अनेक बायका सावळ्या होत्या ज्यांची चांगल्या ठिकाणी लग्नं झाली होती. त्यांच्या लग्नासाठी खास खटपट करावी लागे इतकं मात्र खरं. ही खटपट आईसाठी करणारं कोण होतं? तिची आजी कधीच वारली होती. ती जिवंत असती तर तिने नानांच्या मागे लागून हे काम करवून घेतलं असतं. तसा तगादा त्यांच्या मागे कोणीही न लावता त्यांनी धाकट्या भावांची लग्न करून दिलीच होती की. पण आई १६-१७ वर्षांची असताना जागतिक महामंदीचा काळ सुरू झाला होता. मंदीचा नानांच्या धंद्यावर परिणाम झाला. त्यातून सावरण्यासाठी त्यांना खूप श्रम करावे लागले. १९३३च्या सुमारास, म्हणजे आई २० वर्षांची असताना, जग मंदीतून बाहेर येऊ लागलं. त्यानंतर धंदा सावरण्यासाठी नाना सतत कामात असायचे. आई २२, २३, २४ची झाली तरी मुलीच्या लग्नासाठी वाहणा झिजवायला त्यांच्याकडे फुरसत नव्हती. मी आईला एकदा म्हटलं, ‘तू नानांना धंद्यात मदत करत होतीस. तुझं लग्न करायचं म्हणजे हाताखालचं विश्वासू माणूस गमवायचं. म्हणून तर त्यांनी तुझ्या लग्नाच्या बाबतीत चालढकल केली नसेल?’ आईचं नानांवर अतोनात प्रेम. माझं म्हणणं तिला कसलं पटणार? लगेच नानांची बाजू घेऊन ती म्हणाली, ‘नाही ग शाने. त्यांना ढुंगण खाजवायला सुद्धा फुरसत नसायची. त्यांच्या डोक्यात माझ्या लग्नाचा विचार कुठून येणार?’ मुद्दा इतकाच की आईचं वय वाढत होतं आणि तिच्या लग्नाचं कोणी बघत नव्हतं. शेवटी आपल्या लग्नाचं आपणच बघावं असा तिने निर्णय घेतला आणि ती कामाला लागली. त्या काळी विवाहेच्छू तरूण मासिकांतून जाहिराती देऊ लागले होते. आईने अशा किती जाहिरातींना उत्तरं दिली असतील कोण जाणे. पण गोपाळ गुंडो गोखले नामक तरूणाच्या जाहिरातीला तिने उत्तर दिले आणि त्याचा त्याच्याकडून प्रतिसाद आला. त्यांची पत्रा-पत्री झाली. आईने त्यांना लिहिलेल्या शेवटच्या पत्राविषयी तिला खास अभिमान होता. ते वादळात गेलं. ह्याबद्दल ती नेहमी हळहळायची. ‘वादळात पुष्कळ गोष्टी गेल्या त्याचं काही नाही. पण हे पत्र गेल्याचं फार वाईट वाटतं.’ कोणतं वादळ, कुठे झालं, कधी झालं हा तपशील तिने कधी सांगितला नाही. त्या खास पत्रातल्या विशिष्ट मजकूराविषयी मात्र ती अनेकदा बोलायची. ‘तुम्ही एम ए आहात. मी केवळ चौथी झालेली मुलगी. तुम्ही सूर्य तर मी काजवा. तरीही तुम्ही मला पसंत केली आहे. आपलं जमेल न जमेल, सांगता येत नाही. ही गाजराची पुंगी आहे. वाजली तर वाजली. नाही तर मोडून खाऊन टाकली.’ हा विचार त्या काळात एखाद्या २५ वर्ष वयाच्या मुलीच्या डोक्यात यावा आणि त्याचा तिने उच्चार करावा ह्यावरून तिचं धाडस आणि मनोबळ ध्यानात येतं.
ती गाजराची पुंगी जवळ जवळ ३० वर्ष सुरेल वाजली. आणखी २०-२५ वर्ष तरी वाजत राहिली असती. पण डॅडींना त्यांच्या ५५व्या वर्षी ह्रदय विकाराच्या जोरदार झटक्याने अकाली मरण आलं आणि आई वयाच्या ५३व्या वर्षी विधवा झाली. ती झाली पुढची गोष्ट. सध्या आपण १९३८ सालात आहोत. अजून आईचं असामान्य लग्न व्हायचं आहे आणि आई-डॅडींच्या असामान्य संसाराची सुरुवात व्हायची आहे.
नानांनी आपल्या सर्व मुलांची लग्नं रेजिस्टर्ड पद्धतीने करून दिली. मुलींची मात्र प्रत्येकीच्या सासरची मागणी असेल त्या प्रमाणे. लग्नाबद्दलचे नानांचे आणि डॅडींचे विचार तंतोतंत जुळत होते. डॅडींच्या सुधारक विचारांसाठी त्यांच्या कुटुंबाने त्यांना घरातून हाकलून दिलं होतं. म्हणून तर त्यांना आपल्या लग्नासाठी जाहिरात द्यावी लागली होती. त्यांना हवं होतं तसं सुटसुटीत लग्न डहाणूच्या कारखान्यात नानांनी करून दिलं. गोखल्यांकडून चार-सहा मंडळी आली होती. दोन कुटुंबात रीतसर बोलणी होऊन लग्न ठरलं नव्हतं. त्यामुळे देणी-घेणी असले प्रकार झाले नाहीत. डॅडी पुरोगामी मतांचे. त्यामुळे हुंड्याला त्यांचा विरोध होता. तेंव्हा तोही प्रश्र्न मिटला होता. गोखले मंडळी पाहुण्यांसारखी लग्नाला आली आणि गेली. लग्नाचे आमच्या आल्बम मध्ये फोटो सुद्धा नाहीत इतकं ते आटोपशीरपणे झालं.
गोपाळ गुंडो गोखले आणि यमुना नारायण बेहेरे ही तशी दोन धृवांवरची माणसं. गोपाळ गुंडो महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवरचे, बेळगावचे. यमुना नारायण महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरची, डहाणूची. ते दक्षिणेतून नोकरीसाठी उत्तरेस पाटण्याला पोहोचलेले. ती जन्मली तिथेच २५ वर्ष राहिलेली. ते डबल एम ए. तर ती चौथी पास. ह्यांनी एकमेकांना पसंत कसं केलं हा पहिला प्रश्र्न. आणि दुसरा प्रश्र्न आईला भीति कशी नाही वाटली की आपण ओळखीच्या प्रांतातून कुठल्या कुठे फेकल्या जाणार. हा माणूस इतका शिकलेला. तो माझी कदर करेल का? डॅडींना भीति कशी नाही वाटली की ही जवळपास अशिक्षित बाई आपली सहचारिणी कशी होणार? आपल्याला केवळ स्वयंपाकघरात राबणारी, मुलं पैदा करणारी बायको नको आहे. सखी होऊ शकेल अशी बायको हवी आहे. त्या दोघांनी ही मोठी उडी घेतली ह्याचं गुपित त्यांच्या नष्ट झालेल्या पत्रव्यवहारात असावं. त्यातून डॅडींच्या पुढे एका गांधीवादी माणसाच्या परिपक्व, विचारी, कर्तबगार, कुशल, जबाबदार, धडाडीच्या बाईचं चित्र उभं राहिलं असावं. ‘ही गाजराची पुंगी आहे. वाजली तर वाजली नाही तर तोडून खाल्ली’ हा सर्वसाधारण तरुणीचा विचार नाही. ह्या बळावर डॅडींनी तिला पसंत केली असावी. डॅडींच्या पत्रांतून आईला एक तडफदार, जबाबदार, स्वतंत्र बुद्धीचा, जीवनात आनंद घेणारा, तिला कोणत्याही परिस्थितीत आधार देईल असा माणूस दिसला असावा. आणि म्हणून १८ मार्च १९३८ रोजी यमुना नारायण बेहेरेचा विवाह होऊन ती इंदिरा गोपाळ गोखले म्हणून पाटण्यास संसार थाटायला रवाना झाली. तिच्या पाटण्याच्या पर्वाकडे वळण्या आधी आपल्या पणजी विषयी तिने लिहिलेली गोष्ट इथे देते.
पणजी आलेली कळताच पळतच मी बाहेर गेले. आज तिची स्वारी रागातच दिसत होती. वयोपरत्वे तिच्या चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या वाढलेल्या दिसत होत्या. कपाळ आक्रसलं होतं आणि नाकपुड्या ताणल्या होत्या. तिचं ते रूप पाहून मी थोडा वेळ गोंधळले. पणजीला इतकी रागावलेली मी कधीच पाहीली नव्हती. ती हुश्श करून बसली तेंव्हा मी तिच्या शेजारी जाऊन बसले. तिचा हात हातात घेतला. थोडासा कुरवाळला. जेंव्हा खात्री झाली की ती आपल्यावर रागावलेली नाही तेंव्हा मी तिला हळूच विचारलं, ‘पणजीबाई, आज तुला बरं नाही का वाटत?’ ती उसळून म्हणाली, ‘मला काय धाड झालीये मेलीला? पण हे गावातले लोक मागे लागतात त्याचं काय करू?’ पणजीबाई संतापाने कापत होती. मला काय बोलावं कळे ना.
पणजीबाई माझ्या वडीलांच्या आईची आई. तिला एकच मुलगी, माझी आजी. माझ्या आजीचं लग्न झालं आणि थोड्याच दिवसांत माझे पणजोबा वारले. त्यांनी त्यांच्या मागे पणजीचं पोट भरेल इतकं ठेवलं होतं -– थोडीशी जमीन आणि थोडी रोकड. पणजोबा गेल्यावर माझ्या आजोबांनी तिला आमच्याकडे येऊन राहण्याचा आग्रह केला. परंतु त्याला तिची तयारी नव्हती. ती एका लहानशा मठीत राहत असे. आजीचं व पणजीचं अजिबात पटत नसे. त्यामुळे त्या एकमेकींना टाळीत. पणजीचं आमच्या घरातील तीन माणसांवर प्रेम होतं. मी, माझे वडील व आजोबा. आजोबांना माय लेकींनी एकत्र नांदावे असं फार वाटत असे. परंतु ते कधीच शक्य झालं नाही.
पणजी जरी आमच्या घरापासून दूर, गावात राहत असली तरी ती बऱ्याच वेळा आमच्याकडे येई. सणासुदीला तर हमखास येत असे. आजीने तिचं कधीच हसत स्वागत केलं नाही. पणजी सुद्धा तशी पक्की होती. आली की घरात कधी सरळ जायची नाही. इकडून तिकडून माझे वडील कामावरून आले की नाही याचा अंदाज घेत असे. आले नाहीत असं आढळलं तर ती ओटीवर त्यांची वाट पाहात बसत असे. आजीकडे वर्णी लावायचं तिला धाडस होत नसे. भाऊ कामावरून बरोबर बारा वाजता जेवायला येत असत. त्यांच्या पंगतीला तिचं जेवण होत असे. भाऊ तिची बडदास्त उत्तम ठेवीत. पणजी आल्याचा त्यांना खूप आनंद होत असे. तिच्या बरोबर ते चिक्कार गप्पा मारीत. हे पाहून आजीची तळव्याची आग मस्तकाला जाई. पणजी आल्याचं कळलं की आजीची बडबड सुरू होई. ‘रावजी, ए रावजी. पाणी उपस त्या बाईसाठी आणि बोलाव तिला आंघोळीला. बारा वाजता यायचं तर यायचं आणि तो सुद्धा पारोसा गोळा! भाऊ यायच्या अगोदर होऊ दे तिचं अंग धुणं. नही तर तो आल्यावर दोघांच्या आंघोळी, गप्पा, नंतर जेवण. माणसानं तिष्ठत तरी किती बसायचं. हजार वेळा सांगितलंय जेवायला यायचं तर सकाळी येत जा. उशीराने यायचं तर अंग धुणं उरकून येत जा. पण ऐकते कशाला? पहिल्यापासून बेजबाबदारपणे वागायची सवय. आता म्हातारपणे थोडंच वळण लागणार? भाऊ तिची कौतुकं करतो आणि ठेवलीये तिला डोक्यावर चढवून.’
पणजीला वाढताना देखील आजी इतकी आदळआपट करीत असे की मला पाहवत नसे. पण मी आजीपुढे काय बोलणार? ज्या दिवशी पणजी येणार असं आजीला वाटे, त्या दिवशी ती जास्त जेवण करून ठेवत असे आणि तसंच आंघोळीसाठी पाणी तापवून ठेवी. पण दोघींचे असे काही ग्रह होते की पणजीला प्रत्यक्ष आलेली पाहीली की तिला राग येत असे. आजी अगदी टापटीपेने राहणारी तर पणजीबाई गबाळी. आणि भोळी. आजी आम्हाला पणजीबाईच्या पुष्कळ गोष्टी सांगत असे. आजीच्या एका बाळंतपणात ती हट्टाने तिचं बाळंतपण करायला आली आणि आजीचा एका महिन्याचा सामानाचा साठा एका आठवड्यात संपवला. स्वतः खाऊन नव्हे तर लोकांना देऊन. पणजीला थोडं थोडकं करणं जमत नसे. लाडू करायचे तर टोपली भर. नातवंडांना पोट भरून खायला घाली. शेजारीपाजारी वाटी. असा खर्च झाला की आजीला पुढे निस्तरावे लागे. तिचा गरीबाचा संसार त्यात पांच मुलं. तेंव्हा इतका उधळेपणा तिला झेपणे शक्य नव्हते.
पणजीचं जसजसं वय वाढत गेलं तसे गावातले लहानथोर रिकामटेकडे लोक तिच्या मागे लागत आणि त्रास देत. आम्ही गावापासून दूर राहत असल्याने पणजीवर चोवीस तास नजर ठेवणे आम्हाला शक्य नव्हते. जेंव्हा ती आजारी पडे तेंव्हा आम्ही तिला आमच्याकडे आणत असू. टुणटुणीत बरी झाली की ती एक मिनिट भर देखील अधिक रहायला कबूल नसे. लगेच आपल्या मठीचा रस्ता धरे. वसुलीसाठी ती रानात एकटी जात असे. तुम्ही एकटं जाऊ नका. मी तुमचा वसूल कोणाकडून तरी आणवतो. काळजी करू नका. असं कितीही आजोबांनी सांगितलं तरी त्यांचा डोळा चुकवून ती कधी एकटी निघून जाई कळत नसे. रानात जाऊन आल्यावर ती नेमकी आजारी पडे व ते आम्हाला निस्तरावे लागे.
वसुलीहून परत यायचं ते रात्री बैलगाडीने. ही संधी साधून रिकामटेकडे लोक, ज्यांच्यात काही नातेवाईकांचा देखील समावेश असे, तिच्या मागे लागायचे. तिला नाना तऱ्हेच्या भुतांची सोंगे घेऊन घाबरवायचे. ती आणि गाडीवान पूर्ण घाबरलेली दिसली की ते तिचे धान्य लुटीत. अशा लुटी नंतर तिच्या पदरात जेमतेम एक चतुर्थांश धान्य राहत असे. मग हे लोक पणजीला कशी घाबरवली, तिचे धान्य कसे लुटले हे रंगवून सांगत असत. त्या गोष्टी मोठ्या माणसांपासून बापाच्या पैशावर पोसलेली तरूण मंडळी चवीने ऐकत असत. ह्या सर्व गोष्टींमुळे आजोबांना पणजीला सतत मदत करावी लागत असे.
पणजीबाई सत्तरीच्या घरात पोहोचली आणि तिला लॉटरीचे वेड लागले. गावातल्या लोकांनी हे वेड जास्तच वाढवले. ती कुठेही भेटली की एकाने चिटोऱ्यावर काही तरी लिहावे, आणि दुसऱ्याने तिला ते लॉटरीचे तिकीट म्हणून विकावे. वर सांगावे की ह्याचे पैसे तुम्हाला उद्या मामलेदारांच्या कचेरीत मिळतील. तिला लिहिता वाचता येत नव्हते, त्यामुळे तिचा ह्यावर विश्वास बसत असे. खरे तर ती तशी हुशार होती. पण तिला लॉटरीचे इतके वेड लागले होते की अशा वेळी तिला काहीही सुचत नसे. ती कोणावरही विश्वास ठेवायला तयार होई.
दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळेच्या आधीच ती मामलेदाराच्या कचेरीच्या पायरीवर जाऊन बसत असे. मामलेदार दिसले रे दिसले की ती त्यांना सांगे मी लॉटरीच्या पैशासाठी आल्येय. मामलेदारांनी तिची कितीही समजून काढली तरी तिला पटायचे नाही. त्यांना ती खूप शिव्या देई. तुम्ही माझे पैसे खाल्लेत असा त्यांच्यावर आरोप करून संतापून घरी येई.
गावातील थोरापासून लहानापर्यंत तिच्या व माझ्या आजोबांच्या चांगली परिचयाची असल्याने तिला कोठेही मज्जाव नव्हता. ममलेदार व आजोबा तिची नाना तऱ्हेने समजूत घालीत असत. लोक तुम्हाला फसवतात. त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. पण तिला ते पटायचे नाही. कारण त्या वेळी गावात बऱ्याच लोकांना लॉटरी मिळाली होती तर आपल्याला मिळायला काय हरकत आहे असं तिला वाटे. ती मामलेदारांच्या कचेरीत अनेकदा जायची आणि तिथून हलायची नाही. लोकं म्हणतात माझा नंबर लागलाय. तुम्ही म्हणता नाही. मी कोणावर विश्वास ठेवायचा. नंबर लागला असणारच. तेंव्हा एक तर तुम्ही माझे पैसे खाल्लेत किंवा लोकांनी. मग ती त्यांना बोल बोल बोलायची. शेवटी ते युक्तीने तिला आजोबांकडे पाठवीत. आजोबांना फार वाईट वाटे. पणजीचा लॉटरीचा नाद सुटावा म्हणून त्यांनी एकदा तिला थोडे पैसे दिले आणि सांगितलं की काही दिवसांपूर्वी मी तुमच्या नावाने लॉटरीचं तिकीट घेतलं होतं. हे तुम्हाला मिळालेले पैसे. मी आत्ताच एका जोतिशींना तुमची कुंडली दाखवून आलो. ते म्हणाले आता तुमच्या नशीबात लॉटरीचा पैसा नाही. ह्या नंतर काही दिवस पणजी शांत होती. पण पुन्हा येरे माझ्या मागल्या.
आता तिला लॉटरीची बनावट तिकिटं विकून तिच्याकडून पैसे उकळवायचे हा गावातील उनाड मुलांचा आवडता धंदा झाला होता. मग तिला खर्चाला पैसे पुरत नसत. जावयाकडे मागण्याची तिला लाज वाटे. म्हणून ती गावातील बड्या लोकांकडे मागायची. ह्या गोष्टी आजोबांच्या कानावर यायच्या. त्यांना गावात खूप मान होता. त्यांची सासू गावातली मोठी बाई. म्हणून देखील तिला कोणी नाही म्हणत नसे. काही लोकं तर तिच्या पुढे पैशाचं पाकीट ठेवून तुम्हाला हवे तितके घ्या म्हणत. तिला चार आणे हवे असले तर ती तितकेच घेई. वर एक पैसाही नाही.
एक दिवशी रात्री आम्ही सर्व मंडळी ओटीवर गप्पा मारीत बसलो होतो. लांबून बरेच लोक येताना दिसले. पुष्कळांच्या हातात कंदील होते. काहींच्या हातात काठ्या होत्या. प्रथम आम्हाला वाटले ही प्रेत यात्रा असावी. पण लोक जसे जवळ आले तसे त्यांच्या डोक्यावर टोप्या असलेल्या दिसल्या. तेंव्हा ही प्रेत यात्रा नाही हे नक्की झालं. मग हे सर्व लोक काठ्यासोटे घेऊन चालल्येत तरी कुठे? थोड्याच वेळात आमच्या लक्षात आलं की ते आमच्याच घराच्या अनुरोधाने येत आहेत. माझ्या वडीलांचा स्वभाव अतिशय प्रामाणिक होता. ते स्पष्टवक्ते ही होते. त्यामुळे गावातल्या लोकांना त्यांची खूप मदत होत असे. तेही त्यांचं दिवसाचं काम आटोपून आमच्यात येऊन बसले होते. घराच्या दिशेने येणाऱ्या लोकांविषयी आमचे तर्क वितर्क चालू होते. तितक्यात एक चमत्कारिक दृष्य आम्हाला दिसले आणि येणाऱ्या लोकांबद्दलचे आमचे कुतुहल अधिकच वाढले. लोकांच्या मध्यभागी दोन लोकांच्या खांद्यावर डोली असल्यासारखी वाटली. शेवटी ते लोक आमच्या ओटीवर येऊन धडकले. एकूण तीस-चाळीस तरी लोक होते. त्यांनी डोली ओटीवर ठेवली. आत पणजीबाई. ती चांगलीच आजारी दिसत होती. चेहरा पार सुकून गेला होता. तिच्यात बोलण्याचं त्राण देखील उरलेलं नव्हतं. काय झालं विचारल्यावर ती कण्हत म्हणाली, ‘चार दिवसांपासून ताप येतोय. दमा पण पुष्कळ झालाय.’
आजी खूपच रागावली. ती तिच्या मामांना म्हणाली, ‘अशा परिस्थितीत तिला तुम्ही आमच्या घरी का आणलीत? तुमचं घर तिच्या जवळ असताना इथे आणण्याचं कारण काय? आणि इतकी सारी मंडळी जमवून तिला इथे प्रेतासारखी आणताना तुम्हाला काहीच वाटलं नाही? तिच्या सर्व आजारपणात ती इथेच आलेली आहे. पण ती इतकी क्षीण झाली असताना इतक्या रात्रीच्या वेळी तिला इथे आणणं तुम्हाला शोभत नाही.’ आजीचे मामा खूप श्रीमंत होते पण नंबर एकचे चिक्कू. त्यांची बायको पणजीची सेवा कशी करणार? पणजीचे ह्या वेळचे आजारपण पाहून मामांना वाटलं की ती आता बरेच दिवस खितपत पडणार. तेंव्हा तिला तिच्या लेकीच्या स्वाधीन करावी म्हणजे आपल्या बायकोच्या मागची कटकट वाचली. आजीचा व मामांचा वाद बराच वेळ चालला होता. आजोबा आणि भाऊ शांत कसे बसले होते मला कळेना. मामांनी इतके लोक बरोबर आणण्याचं कारण पणजीला अशा स्थितीत तिच्या लेकीकडे ठेवणं किती उचित आहे हे आमच्या कुटुंबाला पटवून द्यायला. मामा भाचीचा वाद चालू होता. पणजीबाई डोलीत बसून एकदा भावाकडे व एकदा लेकीकडे पहात होती. शेवटी तिच्याने राहवले नाही व ती ओरडून म्हणाली, ‘कुठे नेऊ नका बाबांनो. मसणात नेऊन टाका मला म्हणजे सुटलात एकदाचे.’ तिची ही दीनवाणी स्थिती पाहून, माझे वडील जागेवरून उठले व एखाद्या सुंदर बगीच्याचा मालक बगीच्यात शेळ्या-मेंढ्या शिरलेल्या पाहून त्यांना तेथून हुसकावून लावील त्याच प्रमाणे त्यांनी त्या सर्व लोकांना हुसकावून लावले.
पणजीबाई दोन महीने बिछान्यात होती. पुष्कळ औषधोपचार केले परंतु तिला बरे वाटण्याचे चिन्ह दिसले नाही. आता ह्या दुखण्यातून ती काही वाचत नाही अशी सर्वांची खात्री झाली होती. एके दिवशी तिची शेवटची घटका भरली. ती शुद्धीत होती पण तिला बोलता येत नव्हते. तीन दिवस ती त्याच स्थितीत होती. प्राण जाईना. सर्वांकडे बघून ती रडायची. चौथ्या दिवशी आजोबा तिच्याजवळ बसले असताना तिचा जीव कशात तरी अडकला आहे अशी त्यांना शंका आली. त्यांनी तिला विचारलं पण त्याचा उपयोग झाला नाही कारण तिला बोलता येत नव्हतं. आम्ही सर्व जण तिच्या भोवताली येऊन बसलो. थोड्या वेळाने आजोबा काही न बोलता तिथून उठून गेले. परत आले ते हातात एक भरलेली पिशवी घेऊन. ते पणजीच्या उशाशी बसले. त्यांनी तिच्या कानाशी पिशवी जोरात वाजवली. त्यातून खणखणीत नाण्यांचा आवाज आला. त्यांनी पिशवीत बराच खुर्दा भरला होता. ते मोठा आवाज काढून पणजीबाईला म्हणाले, ‘तुम्हाला लॉटरी लागल्येय. खूप पैसे मिळाल्येत. काही पैसे मी तुमच्या पुढील कार्याला खर्च करीन. उरलेले पैसे वापरून तुमच्या नावाने धर्म करीन.’ आजोबांनी पिशवी पणजीबाईच्या उशागती ठेवली व ते तिथून उठले. डबडबल्या डोळ्यांनी त्यांनी उंबरठा ओलांडला असेल नसेल इतक्यात पणजीबाईचा प्राण गेला.
डॅडींनी प्रथमपासून पत्रकारीता हाच आपला पेशा आहे असं ठरवलं असावं. नाहीतर नाशिकची सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमधली नोकरी सोडून एका लहान इंग्रजी वृत्तपत्रात वार्ताहराची नोकरी करायला ते दूर पाटण्याला न जाते. ते १९३५-३६च्या सुमारास तिकडे गेले. लग्न केलं तोपर्यंत त्यांनी तीनदा नोकऱ्या बदलल्या होत्या. प्रत्त्येक वेळी उडी घेतली ती अधिक महत्त्वाच्या वृत्तपत्रात अधिक जबाबदारीच्या हुद्द्यावर. पाटण्यातली त्यांची शेवटची नोकरी भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या ‘Searchlight’ ह्या वृत्तपत्रात होती. लग्न केलं तेंव्हा ते ह्या नोकरीत होते. १९४० साली त्यांना मुंबई सरकारात माहिती अधिकारी म्हणून नोकरी लागली. १९४२ साली ते टाइम्स ऑफ इंडियात रिपोर्टर म्हणून रुजू झाले. म्हणजे आई पाटण्याला केवळ दोन वर्षं राहिली.
डहाणू म्हंटलं की एका मागाहून एक अशी अनेक चित्रं माझ्या डोळ्यांसमोर येतात. पण पाटण्याची आणि माझी तोंड ओळख देखील नाही. तर आईच्या तिथल्या जीवनाचं चित्र मनात आणि शब्दात कसं उभं करायचं? त्यासाठी साधनं म्हणजे आईने सांगितलेल्या मोजक्या गोष्टी, डॅडींनी आणि आईने काढलेले फोटो आणि विजया मुळे ह्यांनी गोखले दांपत्याबद्दल लिहिलेलं एक सविस्तर पत्र.
प्रथम फोटोवरून काय दिसतं ते पाहूयात. एक फोटो त्यांच्या भाजीवालीचा आहे. भाजीवाली उंचशी आहे, ताठ पाठीची, डोक्यावरून पदर घेतलेली. ती घराच्या पायरीवर पाय ठेऊन उभी आहे. दुसऱ्या फोटोत नऊ वारी नसलेली आई ओसरीच्या खांबाला टेकून उभी आहे. ह्या फोटोचं शिर्षक आहे, ‘Our humble cottage’ (आम्हा पामरांची पर्णकुटी). ह्या दोन फोटोंवरून आईने इंदिरा गोखले म्हणून ज्या घरात पदार्पण केलं त्याच्या बाह्य भागाचा अंदाज येतो. ते बैठं होतं. कौलारू होतं. त्याला लांब ओसरी होती. ओसरीवर दोन खुर्च्या मांडलेल्या असायच्या. ओसरीतून घरात शिरायला दोन दारं होती. घरासमोर मोकळी जागा होती. पण तिथे बाग नव्हती. एकही रोप नाही की झाड नाही की गवत नाही. (ह्याचं मला नवल वाटतं. कारण आईला बाग करण्याचा मोठा छंद होता.) ह्या मोकळ्या जागेसाठी अंगण हा उबदार शब्द देखील योग्य नाही. ती केवळ आणि फक्त मोकळी जागा होती. तिथे डॅडी सिग्रेट ओढत उभे आहेत असा आईने घेतलेला एक फोटो आहे. तिथे आई मला पायावर घेऊन अंघोळ घालत्येय असे अनेक फोटो आहेत. आणि तिथे मुळे मामा आणि आई हसत उभे आहेत असाही फोटो आहे.
घराच्या आतल्या भागाचा एकच फोटो आहे. त्यात आई एका टेबलाशी बसली आहे. पाठीवर लांब सडक काळाभोर शेपटा लोंबतो आहे. अंगात तोकड्या बाह्यांचं पोलकं आहे. ती गोल साडी नेसली आहे. हातात पेन आहे. समोर कागद आहेत. मागे वळून ती कॅमेऱ्याकडे बघते आहे. फोटोच्या खाली डॅडींनी नेहमी प्रमाणे लाल पेन्सिलने मथळा लिहिला आहे: ‘Distracted in her studies’ (तिच्या अभ्यासातून लक्ष वेधलं गेलं आहे.)
पाटण्यात डॅडींचा पगार फार नसावा. त्यांचे रिकामे सिगारेटचे डबे आई मसाल्यांसाठी वापरत असे असं तिच्या बोलण्यात अनेकदा आलेलं आहे. पण तेवढ्या पगारात देखील पाटण्यातल्या त्या दोन वर्षांत त्या दोघांनी भरपूर प्रवास केला हे फोटोंवरून सिद्ध होतं. ताज महाल, फत्तेपूर सिक्री, लाल किल्ला, तसंच हरिद्वार, ऋशिकेष, काशी आणि सारनाथ ह्या ठिकाणी ते गेले असतानाचे अनेक फोटो आहेत. त्यांच्या प्रवासाबद्दलची आईने सांगितलेली एक गोष्ट मला पक्की आठवते. त्या गोष्टीतली मी अजून अंगावर पीत होते. गोष्टीचा हीरो आहे खंडू नावाचा गडी. तो बहुतेक आईने डहाणूहून नेला असावा. नंतर तो त्यांच्या बरोबर मुंबईला देखील आला. त्याचा ह्या घरातला अर्ध्या चड्डीतला मला कडेवर घेतलेला फोटो आमच्या ऍल्बममध्ये आहे. पाटण्याचा सुद्धा एक फोटो होता. तो आता गायब आहे. डॅडींच्या हस्ताक्षरातला लाल पेन्सिलने लिहिलेला मथळा तेवढा बाकी आहे – ‘Our servant’ (आमचा नोकर). तर खंडूची गोष्ट अशी. आई-डॅडी कोणतं तरी प्रेक्षणीय स्थळ पहायला गेले होते. ते जवळंच कुठे तरी असावं. कुठे, काय आईने मला सांगितलं होतं पण मी विसरले. त्या दिवशी मला पाजवून तीन तासांत परत येतील ह्या अंदाजाने दोघे निघाले. पण परतीचं वाहन वेळेत न मिळाल्याने तीन तास उलटून गेले तरी ते घरी पोहोचले नव्हते. माझ्या काळजीने आईचा जीव खाली वर होत होता. मी भूकेने आक्रोश करत असेन, आपण जायलाच नको होतं असं तिला वाटत होतं. स्वतःला दोश देत ती घरी पोहोचली तो काय? खंडू मला मांडीवर घेऊन मधाचं एक एक बोट चाटवत होता. मी कुरकुरत होते कारण मधाने दुधाची तहान भागत नव्हती. पण रडत नव्हते. ही गोष्ट सांगून झाली की आई खंडूच्या समयसूचकतेचं तोंड भरून कौतुक करत असे.
हे सर्व ठीक आहे. पण आई-डॅडींच्या दैनंदिन आयुष्याची कल्पना फोटोतून आणि एखाद दुसऱ्या गोष्टीतून येत नाही. विजया मुळे (विजू मामी)ने मला लिहिलेल्या पत्रातून ती काही प्रमाणात येते. त्यावरून आई-डॅडींच्या घराचं नाव The Retreat (विसावा) होतं हे कळतं आणि घराची अधिक माहितीही मिळते. एके काळी हे घर डुमरावच्या महाराजांच्या प्रचंड इस्टेटीचा एक भाग होतं. नंतर सुधाबाबू भट्टाचार्य नामक बंगाली माणसाने ते विकत घेतलं. घरासमोरच्या मोकळ्या जागेत महाराजांनी म्हणे कोणा एका सरदाराचा पुतळा उभारला होता. आमच्या ऍल्बम मध्ये कुठेही त्याचं चित्र नाही. पण पत्रात एक मजेदार उल्लेख आहे. तो असा: ‘गोपाळराव खेळकर वृत्तीचे होते. माझे यजमान, ज्यांना सर्व जण बापू म्हणून ओळखत असत, तेही तसेच. समोरच्या मोकळ्या जागेत आम्ही रिंग टेनिस खेळत असू. आमचा गेम संपला की गोपाळरावांची आणि बापूंची मौजमजा सुरू होत असे. त्यातला एक प्रकार म्हणजे इस्टेट मालकाने उभारलेल्या सरदाराच्या पुतळ्याचा नेम धरून त्याच्या उंचावलेल्या हाताभोवती रिंग पडेल अशा बेताने ती टाकायची. हे दोन मोठे पुरूष लहान मुलांसारखे खेळताना पाहून आमची फार करमणूक होत असे.’
मुळे मामा (काशीनाथ मुळे) आणि आई-डॅडींची ओळख कशी झाली कळायला मार्ग नाही. पण पाटण्यात हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकीच मराठी मंडळी होती. तेंव्हा सर्वांच्याच एकमेकांशी ओळखी असाव्यात. मुळे बॅचलर होते. मनमिळाऊ होते. ते घारवाडचे. डॅडी बेळगावचे. तोही त्याच्यात दुवा होता. दोघांचं छान जमलं. आईने त्यांना भाऊ मानलं होतं. द रिट्रीटमध्ये जागा मुबलक होती. आई-डॅडी त्यांना म्हणाले असतील, आमच्याच कडे राहा. ते राहिले. विजू मामी लग्न होऊन पाटण्याला गेली तेव्हा तीही तिथेच राहिली. ती मूळची ठाण्याची. तिची आई विधवा होती. पाटण्यात मुळे मामा सिपला औषधी कंपनीचे मेडिकल रेप्रझेंटेटिव्ह होते. ते नोकरीत स्थिर स्थावर झाल्यावर त्यांना लग्न करावं वाटलं. पण कुटुंबीयांनी ते ठरवू नये अशी त्यांची इच्छा होती. आई-डॅडी म्हणाले मग आम्ही केलं तसं कर. जाहिरात दे. आम्ही बघ किती सुखी आहोत. आईने त्यांची ‘मुलगी पाहिजे’ जाहिरात ‘स्त्री’ मासिकात दिली. त्याला आलेली उत्तरं चाळण्याचं कामही तिने अंगावर घेतलं. त्यात ठाण्याच्या माई रानडे नावाच्या बाईंचं उत्तर होतं. आईला हे स्थळ योग्य वाटलं. ह्याच मुलीशी तू लग्न कर असा सल्ला तिने आपल्या मानलेल्या भावाला दिला. मुळे मामा ठाण्याला गेले, एक दोन वेळा मुलीला भेटले आणि त्यांचं साधं, बिन हुंड्याचं लग्न झालं. विजू मामी प्रथमच महाराष्ट्रा बाहेर पडत होती. वेगळी भाषा, वेगळी संस्कृती, वेगळे लोक. बायका फारशा बाहेर दिसत नसत, अशात एक्झिबिशन रोडवरच्या ‘The Retreat’मध्ये आई-डॅडींच्या संगतीत राहणं हा तिला खूप मोठा आधार वाटला. मुळ्यांना एक स्वतंत्र खोली होती. विजू मामी आणि आई आलटून पालटून स्वयंपाक करत. त्यामुळे दोघींना मोकळा वेळही मिळायचा. मला खेळवणं हा सर्वांचाच छंद होता असंही मामीने लिहिलं आहे. मी तेंव्हा वर्ष-सव्वा वर्षाची असेन. मुळे दांपत्य आठ महीने ‘The Retreat’मध्ये राहीले. त्यानंतर त्यांनी स्वतंत्र बिऱ्हाड थाटलं. आई-डॅडींचे पाटण्याचे दिवस एकूण मजेत चालले होते. पण डॅडींना कामाचं क्षेत्र कमी पडत असावं. विजूमामीच्या पत्रात उल्लेख आहे की राजेंद्रबाबूंच्या सर्चलाईट वुत्तपत्रात त्यांना समाधान मिळत नव्हतं. १९४० साली त्यांना मुंबईला नोकरी लागली. त्यांनी पाटणा सोडलं. आई निर्मलच्या वेळची गरोदर होती. डॅडी मुंबईला गेले आणि ती डहाणूला रवाना झाली.
डॅडींची नोकरी मुंबई राज्य सरकारचे पहिले मुख्य मंत्री बी. जी. खेर यांच्या हाता खाली माहिती अधिकाऱ्याची होती. पण लवकरच त्या नोकरीत त्यांची काटेकोर नीति मूल्यं आड येऊ लागली. त्यामुळे त्यांनी एका वर्षात नोकरी सोडली. ती नोकरी खरं तर त्यांच्या स्वभावात बसेल अशी नव्हतीच. ते हाडाचे पत्रकार होते. त्या व्यवसायात त्यांच्या गाठी चार वर्षांचा अनुभव होता. त्याच्या बळावर त्यांना लगेचंच टाइम्स ऑफ इंडियात वार्ताहर म्हणून नोकरी लागली. ती संपूर्ण कथा मी डॅडींच्या चरित्रात लिहिलं आहे. इथे त्याबद्दल एकच गोष्ट नोंदवते. त्यांच्या टाइम्स मधल्या नेमणुकीसाठी त्यांना आईने जे अभिनंदनपर पत्र ‘डहाणू रोड’ ह्या पत्त्यावरून लिहिलं आहे त्यात मायना ‘प्रिय गोपाळ’ असा आहे. पत्र नोव्हेंबर १९ला लिहिलेलं आहे. वर्ष १९४०. नवऱ्याला नावाने हाक मारणं ही गोष्ट तेंव्हा काय, आजही आपल्या रीति रिवाजांच्या इतकी विरुद्ध आहे, की आईने ते धडस नक्कीच डॅडींच्या आग्रहाखातर केलं असावं. ते अधुनिक मतांचे होते. नवरा जर बायकोला अगं तुगं करतो तर बायकोने नवऱ्याला अरे तुरे का करू नये? तसं केलं तरच त्यांचं नातं समान मानलं जाऊ शकतं. मुख्य मुद्दा हा की ‘इश्शं, काय बाई भलतंच. लोकं काय म्हणतील?’ असं म्हणणाऱ्यातली आई नव्हती. ती खऱ्या अर्थाने नानांची लेक होती आणि तितक्याच खऱ्या अर्थाने डॅडींची बायको झाली. बायको म्हणजे सहचारिणी, मैत्रिण, सोबतीण. ही सर्व नाती तिने निभावली.
पाटण्यात असताना आई-डॅडींनी खूप प्रवास केला असं मी सुरुवातीस म्हटलं आहे. त्यातल्या एका प्रवासाचं आईने लिहिलेलं तपशीलवार वर्णन मासिकात, बहुतेक ‘किर्लोस्कर’मध्ये, प्रसिद्ध झालं. त्याची छापील प्रत तिच्या कागदपत्रांत मिळाली नाही. पण टंकलिखित प्रत मात्र आहे. तिला टायपिंग येत नव्हतं. तेंव्हा ही प्रत डॅडींनी तिला काढून दिली असावी. ह्याचा अर्थ तिच्या लेखनाला त्यांचं सक्रिय प्रोत्साहन होतं. लेख माहितीपूर्ण आणि वाचनीय आहे. तो खाली पूर्ण स्वरुपात देत आहे.
सोनपूर – पाटण्याहून गंगेच्या पलीकडच्या बाजूला असलेले लहानसे खेडेगाव. वाचक म्हणतील एवढेसे खेडेगांव काय आणि तिथे भरणारी यात्रा – ह्यांचं काय वर्णन ही देत आहे? जरी ते खेडेगांव असले तरी तिथे भरणाऱ्या यात्रेचा जगात तिसरा नंबर लागतो. पहिल्या दोन नंबरांच्या यात्रा आपण पाहील्या शिवाय हिचा खरोखरीच तिसरा नंबर लागतो का हे ठरवणं अशक्य आहे. पण केवळ यात्रा म्हणून तिच्याकडे पाहीलं तर ती खरोखरीच फार मोठी असते ह्यात शंका नाही. बिहारमधील अशा ह्या यात्रेचं वर्णन वाचून वाचकांचे मनोरंजन होईल म्हणून ते मुद्दाम देत आहे.
सोनपूर लहान गाव पण तेच कार्तिकातल्या पहिल्या आठवड्यात लाखाहून अधिक वस्तीचे गाव बनते. गंडकी नदी जेथे गंगेला मिळते तेथून दोनतीन मैलांवर, गंडकीच्या तीरावर, आंब्याच्या झाडांनी भरलेल्या एका विस्तीर्ण मैदानावर तंबूंचे आणि झोपड्यांचे एक शहरच वसले होते. जगप्रसिद्ध सोनपूरच्या यात्रेकरूंचेच हे शहर. पंधरा दिवस नुसता गजबजाट चालला होता.
ह्या जत्रेची अशी अख्यायिका सांगतात की य़ेथे गजमोक्ष झाला त्या निमित्ताने ही यात्रा भरत असते. येथे हरिहरनाथाचे एक देवालय आहे. सर्व लोक गंडकीत आंघोळ करून पाण्याचा एक एक लोटा हरिहराच्या डोक्यावर ओततात. गंडकी नदीच्या घाटावर स्नान केल्याने आपल्याला गजेंद्रासारखी मुक्ती मिळते असे समजण्यात येते. गजेंद्रमोक्ष कार्तिकी पोर्णिमेला झाला म्हणून त्या दिवशी जत्रा फार जोरात भरते.
यात्रेच्या वेळी येथे दररोज लाखो लोक जमतात. कोणी लहान होड्यांमधून, कोणी जहाजांतून, कोणी रेल्वेने अगदी मुंग्याप्रमाणे लोक येत असतात. यात्रेकरता स्पेशल ट्रेनची सतत वर्दळ चालू असते. हजारो लोक गंगेत आंघोळी करीत असतात. हजारो लोक प्लॅटफॉर्मवर गाडीची वाट पाहात असतात. हजारो लोक पायी जात असतात तर हजारो घाईघाईने परतत असतात. हजारो लोक गंगेत नहात असतात तो देखावा लांबून पहावयास फारच मौज वाटते. काही काही लोकांना यात्रेला पोचण्याची इतकी घाई झालेली असते की गाडी मधेच काही कारणाने थांबली तर बिचारे लगेच खाली उतरून चालावयास लागतात. किती झालं तरी ती गाडीच. त्यांच्या पुढून ती केंव्हाच निघून जाते. मग त्यांची तोंडे अगदी बघण्यासारखी होतात. एवढी मोठी यात्रा होणार आणि एका पाठोपाठ गाड्या येणार त्यामुळे सोनपूरचा प्लॅटफॉर्म भरपूर लांब बांधला आहे.
काही वर्षांपूर्वी पर्यंत ह्या यात्रेला हल्लीपेक्षाही अधिक महत्त्व असे. श्रीमंत लोकांची चैन करण्याची ती एक जागा होती. संस्थानांचे राजे आणि मोठमोठे जमीनदार आपले तंबू ठोकून पंधरा पंधरा दिवस येथे मुक्काम करायचे. त्यांच्या आश्रयाखाली गाण्याचे जलसे, नर्तकींचे नाच वगैरे चालत असत. त्याच प्रमाणे चंपारण जिल्ह्यात निळीच्या लागवडी करिता जे युरोपियन प्लांटर्स पूर्वी होते ते देखील येथे येऊन आपला कॅंप करीत असत. घोड्याच्या शर्यती, नाच वगैरे गोष्टींची नुसती चंगळ असे. तसेच गव्हर्नरचा सुद्धा दोनतीन दिवस कॅंप असे. पण हल्ली ह्या गोष्टींना अजिबात फाटा मिळाला आहे. हल्ली सोनपूरची यात्रा ही गरीबांची यात्रा झाली आहे. काही श्रीमंत लोक अजूनही यात्रेला जातात परंतु ते एका दिवसा करिताच. यात्रेमधे अमुक एक वस्तु मिळत नाही असं होत नाही. बाजार अत्यंत मोठा भरतो व लहान गोष्टींपासून जडजवाहीर इथपर्यंतच्या सर्व वस्तु या बाजारात मिळतात. काही लोक आपल्याला वर्षभर पुरेल इतका माल ह्या यात्रेच्या बाजारात खरेदी करतात. श्रीमंत लोकांचा आश्रय जोपर्यंत होता तोपर्यंत मुंबई, कलकत्ता, मद्रास अशा लांबलांबच्या ठिकाणांहून मोठमोठे व्यापारी आपला माल अधिक मोठ्या प्रमाणात पाठवीत असत. तो इतका की ‘इंग्लिश बझार’ नावाचा एक भाग अलगच असे. पण हल्ली ‘इंग्लिश सेक्शन’ एवढी नुसती पाटीच दिसते. ह्या यात्रेत कॅटल मार्केट म्हणजे गुरांचा बाजार, चिडिया (पक्षी) बझार, मीना बझार वगैरे फारच बघण्यासारखे असतात. हत्ती, घोडे, उंटांपासून तऱ्हतऱ्हेच्या चिमण्यापर्यंत सर्व तऱ्हेचे प्राणी, पक्षी तिथे विकावयास येतात. बंगाल, आसाम, संयुक्त प्रांतातून लोक तेथे गुरांची खरेदी करण्याकरिताच येतात. ह्या वर्षी रमझानचा महिना ह्याच वेळी असल्यामुळे बंगालमधून फारसे व्यापारी आले नाहीत. यंदा बाजारात जवळजवळ आठशे साडे आठशे हत्ती विक्री करिता आले होते. यात्रेचे स्वरूप मूळचे धार्मिक, पण येथे धर्माच्या नावाखाली फार किळसवाणे प्रकार घडत असतात. येथे वेश्या व्यवसाय जितका उघडपणे चालतो तितका तो नेहमीच्या ठिकाणी देखील होत नसेल. निरनिराळ्या प्रांतांतून सर्व तऱ्हेच्या वेश्या येथे तळ ठोकून असतात आणि आपला व्यवसाय उघडपणे करीत असतात. खेडेगावांतून येणारे लोक ह्यासाठीही आलेले असतात आणि गावी परतताना रोग सोबत घेऊन जातात, ज्याचा तेथे फैलाव होतो. ह्याच्या विरुद्ध दर वर्षी खूप ओरड चालते. या वर्षी निदान हा प्रकार बंद होईल अशी आशा होती, परंतु ती फोल ठरली.
इतर बाबतीत मात्र ह्या वर्षी सरकारने फारच चांगली व्यवस्था ठेवली होती व त्यामुळे दर वर्षी होणारे कॉलेरा आणि इतर रोग बिलकुल उद्भवले नाहीत. दर वर्षी धुळीचा खूप त्रास असतो. ह्या वर्षी रस्त्यांवर पाणी घातल्यामुळे धूळ मुळीच उडत नव्हती.
स्काउटच्या कामगिरीचा उल्लेख केल्याशिवाय यात्रेचे वर्णन पुरे होणार नाही. स्काउट्स खरोखरंच ह्या यात्रेमधे उत्तम कामगीरी करताना दिसत होते. नदीच्या घाटावर, रेल्वे स्टेशनवर, खुद्द यात्रेमधे, सर्व ठिकाणी स्काउट्स उभे राहून अत्यंत सभ्यतेने व नम्रपणे यात्रेकरूंना सर्व तऱ्हेची मदत करीत होते. गर्दीचा प्रवाह नीट मार्गाने लावून देणे, मोटारींना व इतर वाहनांना मार्ग करून देणे, मुलांचा बचाव करणे वगैरे कामे कोणत्याही श्रमाला किंवा त्रासाला न जुमानता हे स्काउट्स करीत असताना दिसत होते.
मला फार वाईट वाटते ते एकाच गोष्टीबद्दल. बिहार मधे स्त्रियांत पडद्याची चाल असल्यामुळे कुलीन स्त्रिया यात्रेत अगदी तुरळक दिसत होत्या. ज्या दिसत होत्या त्यासुद्धा घोडा गाड्यांतून फिरत होत्या. खाली उतरायचे मात्र नाव नाही. आणि मला असे वाटले की बिहारमधे पडदा पद्धत असल्यामुळेच यात्रेत वेश्या व्यवसाय बळावला आहे. इकडील लोक इतके मागासलेले दिसतात की जगामधे आपल्या प्रांता बाहेर निराळे काही असेल याची कल्पनाच त्यांना नसते. एखादी मराठी स्त्री नऊवारी लुगडं नेसून रस्त्यावरून जात असेल तर जाणारे येणारे नुसते तिच्या तोंडाकडे पाहात रस्त्यावर उभे राहतील व बडबडतील, ‘ये मरद है या महिला है?’ इथल्या पुष्कळ सद्गृहस्थांनी मला सल्ला दिला होता. ‘तुम्ही सोनपूरला जाता आहात पण तुमच्या सारख्यांनी जाऊ नये हे बरे.’ परंतु मला तिथे काहीही त्रास झाला नाही.
१९४१ सालची मुंबई आजच्या मुंबईपेक्षा खूपंच वेगळी होती. आजच्या मुंबईत शिवाजी पार्क उच्चस्तरीय विभागात गणला जातो, इथे एक स्क्वेअर फुट जागेचा दर ४०,००० रुपयांच्या आसपास झाला आहे. पण तेव्हाच्या शिवाजी पार्कात घरं रिकामी पडलेली होती. मध्यम वर्गीयांना फ्लॅट्स खिशाला झेपेल अशा भाड्यात मिळत होते. त्यांना तयार घरं विकत घेणं शक्य होतं. एवढंच काय तर रिकामे प्लॉट विकत घेऊन तिथे घरं बांधणं देखील शक्य होतं. शिवाजी पार्क ही जुन्या मुंबई बाहेरच्या नवीन वसाहतींपैकी पहिली. तिचा जन्म १९२८ साली झाला. १९३५-३८ च्या दरम्यान मुंबई महानगर पालीकेने पार्कच्या भोवताली प्लॉट्स पाडून तिथली वस्ती सुरू करून दिली. ही वस्ती खास मध्यम आणि निम्न मध्यम वर्गासाठी होती. जुन्या शहरात चाळींमध्ये गर्दी करून राहणाऱ्या कुटुंबांना मोकळ्या हवेवर राहता यावं ही ह्या वसाहती मागची कल्पना होती.
आमची ललित इस्टेट ही तीन मजली इमारत आर्किटेक्ट परळकरांनी बांधली. ती चित्रपट अभिनेत्री शांता आपटे यांनी विकत घेतली. तळ मजला धरून ह्या इमारतीत दर मजल्यावर एक असे केवळ चार फ्लॅट्स आहेत. डॅडींनी पहिल्या मजल्यावरचा फ्लॅट भाड्याने घेतला. आई डहाणूहून आली. ललित इस्टेटचा फ्लॅट हाती येईपर्यंत ते दोघे आणि मी जवळच्या सरोज निवास मध्ये राहिलो. ललित इस्टेटच्या फ्लॅटमध्ये १९४१ सालापासून आईने संसाराची नव्याने सुरुवात केली. १९८६ साली ऑगस्ट महिन्यात तिने ह्याच फ्लॅटमध्ये जीव सोडला. या ४५ वर्षांच्या कालावधीत आईचं आयुष्य जसं बदलत गेलं तसा शिवाजी पार्कचा परिसरही बदलला.
आमच्या घरासमोर पूर्वी माडाच्या झाडांची वाडी होती. त्यात भंडारी कुटुंबांच्या झोपड्या होत्या. मुंबईतले ते आदी रहिवासी. ह्या वाडीचे राथ नावाचे मालक होते. त्यांचंही वाडीत बैठं कौलारू घर होतं. शिमग्यात कोकणी लोकांचे फड वाडीत नमन नाचायला यायचे. १९५४-५५ मध्ये मी दररोज संध्याकाळी बॅडमिंटन खेळायला जात असे तेंव्हा आई व्हरांड्यातल्या खुर्चीत वाडीतल्या माडांकडे बघत बसलेली असायची. मी अनेकदा तिला म्हणायची, आम्ही सगळे संध्याकाळी बाहेर जातो. तू पण चल ना. आमच्या क्लबजवळच तर समुद्र आहे. आपण तिथे थोडे फिरू. मग तू घरी ये आणि मी खेळायला जाईन. तिचं उत्तर ठरलेलं असायचं. ‘नको ग शाने. ह्या झाडांकडे बघत बसलं की दिवसाचा सगळा थकवा जातो. संध्याकाळच्या स्वयंपाकाला नवा जोर येतो.’
वस्तुतः आईला झाडं फुलं जितकी आवडायची तितकंच खेळायला ही आवडायचं. हे दोन्ही छंद ह्या घराच्या आणि मागच्या घराच्या मधे जी मोकळी जागा होती तिचा उपयोग करून तिने जोपासले. मागचं घर आमच्या घरा प्रमाणे तीन मजली. तिथेही चार बिऱ्हाडं. त्या घराचा मालक तिथे राहत नसे. आमची मालकीण देखील ह्या घरात राहत नसे. त्यामुळे आमच्यावर कोणाचाच दबाव नव्हता. मागच्या इमारतीत खालच्या मजल्यावर चार मलबारी पुरूष राहत असत. त्यांची कुटुंबं गावी असावीत. पहिल्या मजल्यावर शहांचं कुटुंबं होतं. दुसऱ्या मजल्यावर मेनन म्हणून मलबारी कुटुंब होतं. आणि सर्वात वरच्या मजल्यावर माथुर नावाचं जोडपं राहत असे. त्यांना मूलबाळ नव्हतं. ह्या सर्व मंडळींशी आईची मैत्री होती. १९४९ साली राज कपूर, नर्गिस, दिलीप कुमार यांचा अंदाज चित्रपट खूप गाजला होता. आमच्या तिसऱ्या मजल्यावर हळदीपूर म्हणून चित्रापूर सारस्वत कुटुंब राहत होतं. ते आपलं नाव राव असं लावत असत. डॉ राव डेंटिस्ट होते. त्यांची बायको लीलाताई. त्या, मिसेस माथूर आणि आई अशा तिघी जणी मिळून अंदाज चा दुपारचा शो पाहायला गेल्या होत्या. आम्ही शाळेतून घरी आलो तेंव्हा त्या चित्रपटावर जोरजोरात चर्चा करीत उभ्या होत्या. त्या काळात तुम्हाला राज कपूर तरी आवडायचा नाही तर दिलीप कुमार. क्वचितच दोन्ही नट आवडायचे. त्या दिवशी जी चर्चा कानावर पडली त्यात आईला दिलीप कुमार पसंत असल्याचं कळलं. तिच्या ७०व्या वाढदिवशी ती नको नको म्हणत असताना आम्ही तिला रमेश सिप्पीने दिग्दर्शित केलेला, अत्यंत गाजलेला, शक्ती चित्रपट पाहायला नेलं. त्यात दिलीप कुमार होता आणि त्याच्या सोबतीला अमिताभ बच्चन. आम्ही नंतर बाहेर जेवलो. ती संध्याकाळ आईच्या आनंदासाठी होती. पण ती मात्र संकोचली होती. फालतू खर्च तिच्या पिंडाला सहन होत नसे. सिनेमा पाहणं ठीक होतं. तो तिकीट काढूनच पहावा लागतो. पण जेवण? ‘आपण छान घरी बसून जेवलो असतो. हॉटेलात कशाला?’ ह्या तिच्या प्रश्र्नाला आमचं एकच उत्तर होतं, ‘कारण घरी तू स्वयंपाक केला असता. आम्हाला करू दिला नसता म्हणून.’ तिने आयुष्यात अनेकांचं कोडकौतुक केलं. पण तिचं कोणी केलं तर ती फारच बेचैन होत असे.
ललित इस्टेट आणि मागची इमारत, जया निवास ह्यांच्या मध्ये मोठी मोकळी जागा होती. ती जागा जया निवासच्या प्लॉटचा भाग होती. पण तिचा मालक तिथे राहत नसल्या कारणाने आम्ही भाडेकरूच मालक असल्यासारखे वागत असू. त्या जागेत आईने बॅडमिंटन कोर्ट आखून घेतलं. त्या कोर्टात दोन्ही इमारतींतली आणि क्वचित बाहेरची देखील माणसं खेळायला उतरायची. आई पदर खोचून जोरदार गेम खेळायची पण कौतुक करायची डॅडींच्या गेमचं. त्यांची स्टाइल, त्यांचा डौल. ते खरंही होतं. आईच्या खेळात जिद्द अधिक दिसायची. त्यांच्या खेळात सहजता होती. पुढे बॅडमिंटन थांबलं. का माहीत नाही. कालौघात ह्या गोष्टी होत राहतात. पण आमच्या दोन इमारतींच्या मधल्या जागेचा आईला वाटणारा मोह सुटे ना. यायला-जायला भरपूर जागा सोडून उरलेल्या भागात तिने बाग केली. गुलाब, शेवंती वगैरे फुल झाडं तर लावलीच पण सर्वात नवलाची गोष्ट म्हणजे एक केळही लावली. त्याला आलेलं लोंगर अजून माझ्या डोळ्यांसमोर आहे. एक-दोन वर्षांनी ती बागही गेली. आईच्या मागे इतकी व्यवधानं असायची की तिला बागेची निगा राखणं कठीण झालं असावं. पण फुलझाडांचा शोक डॅडींना देखील होता. त्यांनी आणि आईने मिळून आमच्या व्हरांड्यात समोरच्या बाजूला तारेच्या टोपल्या टांगून बाग केली. टाइम्स मधून घरी परतताना डॅडी बी-बियाणं, रोपं, खत-माती, कुंड्या, अवजारं विकणाऱ्या भायखळ्यातल्या रतनशी ह्या जुन्या प्रख्यात दुकानाशी थांबायचे आणि आमच्या छोट्या बागेसाठी मोठी खरेदी करायचे. तोपर्यंत त्यांच्याकडे गाडी आली होती, सेकंड हॅंड, लहान, पण उत्तम धावणारी मॉरिस मायनर. फुलझाडं लावण्याचं, त्यांची मशागत करण्याचं काम आईचं. ह्या तारेच्या शिंकवजा काही कुंड्यात १२ महीने जगणारी फर्न्स होती आणि काही कुंड्यांत विदेशी मोसमी फुलझाडं – कॉसमॉस, बॅलसम, फ्लॉक्स इ. आज अनेक घरांच्या खिडक्यांत, ग्रिलने तयार केलेल्या आधिकच्या जागेत पानाफुलांच्या कुंड्या दिसतात. त्या काळात अंगण नसेल तर फुलझाडं नाहीत. डालडाच्या डब्यातल्या तुळशी व्यतिरिक्त घरांत निसर्गाचे कोणतेही रंग दिसत नसत. आमच्या गल्लीत आणि उरलेल्या परिसरात फक्त आमचाच व्हरांडा पानाफुलांनी बहरलेला असायचा.
मजा म्हणजे निसर्गाशी आईचं जितकं नातं होतं तितकंच अतूट नातं यंत्रांशी होतं. खास करून शिवणाचं यंत्र. ह्या यंत्राच्या विकासाचे दोन अवतार आम्ही पाहीले. प्रथम पेडलवालं फाफ मशीन आणि नंतर मोटरवर चालणारं सिंगर. आई म्हणत असे बायकांनी किमान आपापले ब्लाउज शिवायला शिकलं पाहिजे. तिच्या शब्दात सांगायचं तर, ‘शिंप्यांपुढे मापासाठी छात्या पुढे का करायच्या?’ आपलं शिवणकाम आपण करावं ह्या मागचं स्वावलंबन हे एक कारण झालं. दुसरं कारण काटकसर. तिसरं कारण तिचा कल. तो केवळ शिवणातली कलाकुसर, कौशल्य, कल्पना इतक्या पुरेसा मर्यादित नव्हता. कलांमध्ये अंतर्भूत असलेल्या विज्ञानाची देखील आईला ओढ होती. शिवणकामात इंजिनिअरिंगचा भाग होता. स्वयंपाकात रसायनाचा. दोन्ही कलांमध्ये तिचे सतत प्रयोग चाललेले असायचे.
शिवणकामाचं उदाहरण घेऊ. आईचे डहाणूतले अनेक ओळखीचे लोक मुंबईत होते. त्यात लग्न होऊन नाशिकला गेलेल्या ताई रानडे यांची मुलगी इंदुताई पुसाळकर होती. ती आईकडे ब्लाउजचा कट तयार करून घ्यायला आली. तिने किंवा शिंप्याने शिवलेले ब्लाउज काही केल्या तिच्या अंगाला बसत नव्हते. सर्वसाधारण अंगाला बसेल अशा बेताने शिवणकाम शिकवलं जातं. शिंप्यांचेही तसेच आडाखे असतात. निर्मलच्या आणि माझ्या शरीराच्या ठेवणीत फरक आहे. आमच्या ब्लाउजच्या कटमध्ये आईने त्याप्रमाणे फरक केले होते. इंदू मावशीच्या शरीराचा अभ्यास करून तिच्या कटमध्ये नेहमीच्या कोष्टकापेक्षा बगलेचा भाग तिने अधिक खोल केला. त्या कट वरून शिवलेलं ब्लाउज इंदु मावशीच्या अंगाला गप्पकन बसलं.
आम्ही इंग्लंडला जाईपर्यंत आमचे सर्व कपडे आई शिवत असे. त्यांच्या प्रत्येक बटणाची, रिबनची, लेसची, भरतकामाची तपशीलवार आठवण मला अजून आहे. इथे एकच आठवण देते. त्या काळात जो कपडा उपलब्ध असेल तो घ्यावा लागायचा. हे बघ ते बघ करायला चॉइस नसायचा. दादर ट्रॅम टर्मिनस म्हणजे खोदादाद सर्कलला कापडाची दोन दुकानं होती. एक वडाळ्याला जायच्या रस्त्याच्या कोपऱ्यावर खुर्शीद नावाचं मोठं दुकान होतं आणि विरुद्ध बाजूला, म्हणजे टिळक ब्रिज उतरलं की उजव्या हाताला, वालिया होतं. त्या दोन दुकानांत स्टॉकमध्ये जो माल असेल त्यातून निवड करायला लागायची. माझ्यासाठी नवा फ्रॉक शिवायची वेळ आली होती. आईने पुस्तकात एक पॅटर्न पाहीली होती त्या बरहुकुम तिला फ्रॉक शिवायचा होता. त्यावर नाजुकसं भरतकाम केलेलं होतं. त्यासाठी कपडा एका रंगाचा, प्रिंट नसलेला घ्यायचा होता. तसं एकच कापड खुर्शीदकडे होतं. फिक्क्या गुलाबी रंगाचं सॅटिन. सॅटिनला चकाकी असते. ती आईला आवडत नसे. पण रंग छान होता. तिने ते कापड घेतलं पण वरची बाजू आत करून फ्रॉक शिवला. म्हणजे गुळगुळीत, चकचकीत बाजू आत. फ्रॉकला भरपूर घेर होता, गोल गळा, कमरेला पट्टा, त्याचा मागे मोठा बो आणि मुख्य म्हणजे छातीवर डाव्या बाजूला भरतकाम केलेला पांढऱ्या डेझीच्या फुलांचा गुच्छ, असा तो पार्टी फ्रॉक होता.
आईने शिवणाचे अनेकीं कडून अनेक धडे घेतले. प्रत्त्येकीची कोणती तरी स्पेशालिटी होती. ती हस्तगत केली की आई दुसऱ्या शिक्षिकेच्या शोधात असायची. तसं केल्याने पुन्हा तौलनिक अभ्यासाला वाव असायचा. हिने असा कट शिकवला, तिने तसा. दोन्हीत एखादी दुसरी गोम होतीच. ती कुठे होती, का होती ह्याचा अभ्यास केल्यावर आई त्या चुका टाळून आपला कट काढत असे. तिची पहिली शिक्षिका होती आमच्या घराच्या तळ मजल्यावर राहत असलेल्या जंगी परेरा कुटुंबातली एक सून, सिसी. त्यानंतर आई आणि जवळच राहणाऱ्या प्रभाताई परांजपे आणि छायाताई गोडबोले अशा तिघी मिळून माटुंग्याच्या फाइव्ह गार्डन्सला बॅंड व्ह्यू नावाच्या इमारतीत राहणाऱ्या फ्रेनी एलचीदानाकडे शिकू लागल्या. सिसी आणि फ्रेनीकडे आई फ्रॉक, स्कर्ट, ब्लाउज, स्लॅक्स हे पाश्चात्य पद्धतीचे कपडे शिकली. साडीवरचा ब्लाऊज, चोळी, परकर, सलवार, झब्बा, पायजमा हे कपडे तिने झारापकरांच्या पुस्तकांतून स्वत:ला शिकवले असा माझा कयास आहे. ते पुस्तक अजून माझ्याकडे आहे. पण प्रत्त्येक कपड्यात तिने नेहमीच्या पद्धतीने फेरबदल करून खास आपले असे नमुने तयार केले. त्यावरूनच ती ते कपडे शिवू लागली. तिची शोधक बुद्धी इतकी तीव्र होती की अनेक प्रयोग करून तिने स्वतःसाठी एकदोन ब्रासियर देखील शिवल्या होत्या. केवळ अभ्यास म्हणून. एरव्ही ती विकतच्याच वापरायची.
आईला टेलरिंगचा धंदा करण्याची सुप्त इच्छा होती. त्यासाठी तिने आमच्या घराजवळ एक लहानशी जागा भाड्याने घेतली होती. त्याच्या पाटीसाठी मोठी कात्री आणि तिच्या भोवती वळसा घातलेली टेप असं चित्रं मी काढलं होतं. दुकानाचं नाव स्टार टेलर्स ठेवायचं ठरलं होतं. ते दुकान सुरू झालंच नाही. आईच्या एकूण व्यापात ते होणं शक्यही नव्हतं. एका महिन्यात भाड्यानी घेतलेली चिंचोळी जागा मालकाला परत केली. पण तेवढ्या महिन्यात आईच्या धंद्याची पहिली ऑर्डर आली होती. नलू मावशीच्या सासरच्या नात्यातल्या एक विधवा बाई (त्यांचं नाव बरवे होतं असं पुसटसं आठवतंय) शाळेत शिक्षीका होत्या. शाळेच्या कोणत्याशा कार्यक्रमासाठी त्यांना एका पॅटर्नचे पण वेगवेगळ्या मापाचे १६ फ्रॉक शिवून हवे होते. त्यांनी कापड आणून दिलं आणि आईने एका हाती ऑर्डर पुरी केली. त्या नंतर स्टार टेलर्सने गाशा गुंडाळला. शिवणकामा व्यतिरिक्त मशीनवरचं आणि हाताने केलेलं भरतकाम, क्रोशे, विणकाम ह्या जोड कलातही ती पटाईत होती. त्या काळात असंख्य बायकांना त्या अवगत होत्या. पण विशेष कोणी करत नसलेला स्मॉकिंग हा भरतकामाचा प्रकार मात्र क्वचित कोणी करत असे तो ती करायची. तो मला खास प्रिय होता. मी खूप स्मॉकिंग केलं आहे आणि मैत्रिणींना शिकवलं आहे. अजूनही ते करण्याची मला खुमखुमी येते. पण आता घरी शिवलेले कपडे वापरतंय कोण? स्मॉकिंग कोणासाठी करायचं?
दुर्गाबाई भागवत आईशी भरतकामाविषयी आणि पाककलेविषयी गप्पा मारायला, माहिती करून घ्यायला येत असत. ही साधारण १९७४-७५ची गोष्ट. मी कॉलेजात शिकवत होते. दुपारी घरी आले की दुर्गाबाई आईच्या खोलीत बसलेल्या दिसायच्या. त्या विदुशी. ती एस एन डी टी विद्यापीठाची जी ए. पण भरतकाम आणि पाकशास्त्र हे जसे दुर्गाबाईंचे संशोधनाचे विषय होते तसेच तिचेही होते हे त्या जाणत होत्या.
आईला चौथीत शाळा सोडावी लागली होती. लग्नानंतर तिने मॅट्रिक केलं. ते मुंबईत आल्याबरोबर केलं असावं असा माझा तर्क आहे. मला तिचा अभ्यास आठवतो तो कॉलेजचा आणि रागदारी संगीताचा. जी एसाठी तिचा मुख्य विषय संगीत होता. पण त्या आधीच्या दोन वर्षांत तिने सोशॉलॉजी, सायकॉलॉजी, होम सायंन्स, मराठी साहित्त्य, इंग्लीश साहित्य असे विषय घेतले होते. आई-डॅडींच्या बेडरूम मध्ये भिंतितलं कपाट आहे. त्याच्या मधल्या खणात एक काळसर तपकिरी रंगाची रेक्झिनची लांब लखोट्यासारखी पिशवी होती. त्यात तिची पुस्तकं असायची. पिशवी दुमडून ती छातीशी धरायची आणि चर्चगेट लोकल पकडायला घाईघाईने स्टेशनला चालत जायची. कॉलेज मरीन लाइन्सला होतं. तिचं पहिल्यापासून चालणं झपझप. मुंबईत लोकलच्या वेळा ठरलेल्या असतात. गाडी चुकली की कॉलेजचा तास चुकला. मग (तिचा आवडता वाक्प्रचार) ‘सगळंच मुसळकेरात.’
तिला घरी इतके व्याप होते की त्यातून अभ्यासासाठी वेळ काढणं कठीण होत असे. परीक्षेच्या वेळी स्वयंपाक वगैरे करताना ती अभ्यासातलं काही काही घोकत असायची. साडी नेसताना ती माझ्या हाती पुस्तक देऊन हॅमलेटची स्वगतं म्हणायची. त्या वयात शेक्स्पिअरची भाषा मला ढिम्म कळत नसे. पण वाक्य वाचता यायची म्हणून तिचा एखादा शब्द चुकलाच तर तो मी दुरुस्त करत असे. इतका खटाटोप करून सुद्धा ती एकदा नापास झाली होती. जी ए च्याही पहिल्या प्रयत्नात ती नापास झाली होती. पण तिची जिद्द कायम होती. जी ए पास झाली त्या वर्षी तिने डॅडींना कॉलेजातून फोन करून आनंदाची बातमी दिली. त्यांनी आम्हाला कागदाचे हार घेऊन दारामागे उभं राहायला सांगितलं. तिने घरात पाऊल टाकल्याबरोबर जोरजोरात टाळ्या वाजवून आम्ही तिचं हार घालून स्वागत केलं. तिचं जी ए चं सर्टिफिकेट तिच्या कागदपत्रात अजून आहे. शिवाय माझ्या पुस्तकांच्या शेल्फवर तिचं कॉलेजचं एक पुस्तक आहे. ‘वाग्वैजयंती किंवा कै. गोविंदागजकृत समग्र कविता’. पहिल्या पानावर तिच्या हस्ताक्षरात इंग्रजीत ‘Indu Gokhale’ नाव आहे. १९३९ साली छापलेल्या ह्या चतुर्थावृत्तिची किंमत दोन रुपये आहे.
आई-डॅडींच्या खोलीत एका भिंतीवर आईच्या अभ्यासाच्या पुस्तकांसाठी उघडं शेल्फ लावलं होतं. त्यात क्लॅरेन्स डे ह्या अमेरिकन लेखकाने आपल्या विक्षिप्त वडीलांबद्दल लिहिलेलं ‘Life With Father’ होतं, सेड्रिक माउंट यांनी लिहिलेलं एक-अंकी नाटक ‘The Never-Never Nest’ होतं, शेक्स्पियरचं हॅमलेट होतं आणि पं. विष्णू नारायण भातखंडे यांचं संगीतावरचं गलेलठ्ठ पुस्तक होतं ज्यात १०-१५ रागांची माहिती, चीजा आणि चिजांची स्वरलिपी दिलेली होती. आईला काही दिवस अष्टैकर नावाच्या मास्तरांची शिकवणी होती. ते ह्या पुस्तकातल्या चिजा तिला शिकवायचे. त्या आम्हालाही पाठ होत्या. मी १२-१३ वर्षांची होते तेंव्हा आईने ‘The Never-Never Nest’चं मराठीत रूपांतर केलं. ते खूप छान झालं होतं. त्याचा प्रयोग वनिता समाजात व्हावा अशी तिची फार इच्छा होती. पण ती अपुरी राहिली. त्या नाटकातल्या आत्त्याबाईच्या पात्रात आणि स्वतःमध्ये तिला साम्य दिसत असे. मी नाटकाचं थोडक्यात कथासूत्र देते त्यावरून ते का हे लक्षात येईल.
एक तरूण जोडपं आहे. बायको गरोदर आहे. खुखसोयींनी समृद्ध अशा मोठ्या घरात ते राहत आहेत. त्यांच्याकडे मोटर आहे. फ्रिज आहे, रेडिओग्रॅम, पियानो, फर्निचर, सर्व काही आहे. त्यांच्याकडे एकदा नवऱ्याची आत्त्या राहायला येते. त्याच्या बेताच्या पगारात तो इतकं सगळं कसं विकत घेऊ शकला ह्याचं तिला आश्र्चर्य वाटतं. तिला जे जे दिसतंय ते सर्व हप्त्यावर घेतलेलं आहे असा तो खुलासा करतो. ती त्याला ह्या व्यवहाराविषयी खोदून विचारते तेव्हा तिच्या लक्षात येतं की त्याच्या पगारातून हप्ते भरणं त्याला जमत नाही म्हणून पगार आणि हप्त्यातली दरी मिटवायला तो दर महिन्याला कर्ज काढतो. करता करता मोटारीचं स्टिअरिंग व्हील, दोन चाकं, आणि ती ज्या सोफ्यात बसली आहे त्याचा एक पाय एवढं सामान त्यांच्या मालकीचं झालेलं असतं. आत्त्याबाईंनी उभ्या जन्मात एकही पैसा कर्ज न घेता उत्तम संसार केलेला असतो. आपल्या मिळकतीत आपण जे घेऊ शकतो त्यात समाधान मानावं आणि पगार वाढेल तसा संसार वाढवावा हे तिचं तत्व. तिला भाच्याच्या त्या कर्जाऊ सोफ्यात बसवत नाही. त्याच्या मोटारीतून हिंडवत नाही. एकूणच त्याच्याकडे रहावंसं तिला वाटत नाही. ती त्याला म्हणते मी बापडी माझ्या घरी परत जाते. जातानामात्र ती भाच्याला दहा पौंडाचा चेक देते. हे पैसे वापरून घरातली एक तरी वस्तु पूर्णपणे आपल्या मालकीची करा असा ती तरूण जोडप्याला सल्ला देते. भाचा तिला गाडीवर पोहोचवायला जातो तेंव्हा त्याची बायको चेक घेऊन डॉक्टरकडे पळते. तिच्या डिलिव्हरीचे पैसे देखील ते हप्त्यांनी भरणार असतात. पण चेकने संपूर्ण रक्कम ती आधीच भरते. आता निदान त्यांचं बाळ तरी त्यांच्या मालकीचं होणार असतं ह्याचा नवरा-बायकोला आनंद होतो.
आपल्या ऐपतीप्रमाणे हातपाय पसरावे हे आईचं ब्रीदवाक्य होतं. डॅ त्या मानाने सढळ हाताचे होते. पण काही गोष्टींवर खर्च करणं त्यांना पटत नसे. उदा. दागदागिने. त्यांच्या तत्वांचा सतत सामना न करता आपल्याला जे बरोबर वाटतं ते शांतपणे करण्याचं आत्मबळ आईच्या ठिकाणी होतं. त्यासाठी तिने ऐपतीत बसेल इतपत उधारी केली. डॅडींनी देखील त्यांच्या ऐपतीत बसेल तितकी उधारी केली होतीच. आम्हाला इंग्लंडला पाठवण्याचा बेत पक्का होत असतानाच त्यांनी टाइम्स मधल्या नोकरीचा तात्विक कारणाने राजीनामा दिला. त्याची तपशीलवार माहिती डॅडींच्या चरित्रात दिली आहे. आईला डॅडींच्या दोन गोष्टी मानणं कठीण गेलं. दागदागिन्यांना आणि फ्रिजला असलेला त्यांचा विरोध. तिला अंगभर दागिने घालायची हौस कधीच नव्हती. तिचं मंगळसूत्र देखील दिसेल न दिसेल असं बारीकसं होतं. पण लग्न कार्यांत वगैरे हातात, कानात, गळ्यात काहीतरी पाहिजे ह्यावर तिचा विश्र्वास होता. त्या काळात हरी महादेव वैद्यांचे एक विश्र्वासू गृहस्थ नमुन्याच्या पेट्या घरी घेऊन यायचे. आई जे साधेसुधे दागिने पसंत करायची त्यांची किंमत ती हप्त्यांनी भरत असे. घर ती इतक्या कार्यक्षम पद्धतीने चालवायची की आम्हाला कधीही काही कमी पडल्याचं जाणवलं नाही. डॅडीं आणि ती एकत्र बसून महिन्याचा खर्च ठरवत असत. तेवढ्या पैशातून दर महा लहान रक्कम ती बाजूला ठेवत असे आणि त्यातून दागिन्यांसारख्या डॅडींना न पटणाऱ्या वस्तुंची हप्त्याने खरेदी करत असे.
फ्रिजच्या बाबतीत हे करणं तिला कठीण होतं. ती वस्तु फारच महाग होती. आई इंग्लंडहून परत आली तेंव्हा डॅडींनी घेतलेल्या कर्जामुळे घरात पैशाची ओढाताण होती. पण तिला फ्रिजची चणचण भासू लागली. फ्रिज आता मध्यम वर्गीय आयुष्यातली अत्त्यावष्यक गोष्ट झाली होती. घरात पाहुण्यांचा राबता चालूच होता. अन्न फुकट घालवणं किंवा देऊन टाकणं ह्यात जी पैशाची नासाडी होत होती ती वाचवण्याचा फ्रिज हा एक मार्ग होता. मी इंग्लंडहून परत यायच्या आधी तिने मनाचा हिय्या करून डॅडींचे बालमित्र दत्ताराम पालेकर ह्यांच्याकडून फ्रिज विकत घ्यायला पैसे घेतले. ती शिवणाच्या शिकवण्या करत होती त्यातून ती कर्जाची परत फेड करणार होती. डॅडी अशा बाबतीत तिला प्रश्र्नांनी हैराण करत नसत. इंदूला फ्रिज हवा आहे. ती माझ्याकडे पैसे मागत नाहीये. ती मिळवत्येय त्यातून ती हप्ते भरत्येय. पैसे दत्तारामकडूनच घेतल्येत. तिला झेपत असेल तर मी का हरकत घेऊ असा त्यांचा विचार असावा. मी इंग्लंडहून परत आल्यावर मला एक चांगली शिकवणी मिळाली आणि सिडनहॅम कॉलेजात मराठी-गुजराती माध्यमाच्या शाळांतून आलेल्या मुला-मुलींना आठवड्यातून दोन दिवस इंग्रजी शिकवण्याचं काम मिळालं. त्या पैशैतून पालेकर काकांचे हप्ते मी भरले. अशा प्रकारे ऑल्विनचा तो लहानात लहान फ्रिज आमच्या मालकीचा झाला!
शिवण शिकणं झालं. कॉलेजचं शिक्षण झालं. राहून राहिलं ड्रायव्हिंग. डॅडींकडे सेकंड हॅंड का असेना, लहान का असेना, पण गाडी असायची. त्यांना ड्रायव्हिंग कोणी शिकवलं मला १०० टक्के आठवत नाही. पण माझ्या समजुतीप्रमाणे आप्पांनी शिकवलं. शांत वृत्तीचे, काळी टोपी, अर्ध्या बाह्यांचा शर्ट आणि अर्धी खाकी पॅंट घातलेले, सदा मोटारींखाली झोपलेले आणि हात सदैव तेलाने आणि कामाने काळे झालेले, असे हे आप्पा आमच्या जवळच्या मोटर दुरूस्तीच्या गॅरेजचे अत्यंत तरबेज मेकॅनिक होते. त्यांना आईने पकडलं. साहेबांना कळू न देता मला गाडी शिकवणार का? आप्पा कोणालाही नाही म्हणणाऱ्यातले नव्हते. ते तयार झाले. पहाटे डॅडी उठायच्या आधी आई गुपचुप बाहेर पडायची. ड्रायव्हिंगचा धडा झाला की साळसूदपणे परत. ही गोष्ट डॅडींना न कळवण्याचं कारण ते म्हणाले असते मी असताना आप्पा का? त्याला एकच उत्तर होतं. तुम्हाला शिक्षक म्हणून पेशन्स नाही. माझी जरा जरी चुक झाली तरी तुमचा भडका उडेल आणि शिकणं बाजूला राहिल. हे सत्य सुरुवातीसच सांगणं योग्य नव्हतं. डॅडींकडून लपवून ठेवलेल्या गोष्टी आई नेहमी काळवेळ पाहून त्यांना सांगत असे. लायसन्स हाती आल्यावर तिने त्यांना सांगितलं. मी असताना आप्पा का हा अपेक्षित प्रश्र्न डॅडींनी विचारलाच. तिने त्यांना सत्त्य गोष्ट सांगितली. त्यावर ते त्यांचं ठराविक वाकडं हसले. हे हसणं कौतुकाचं असायचं. कदाचित ते मनात म्हणाले असतील हीच ती बाई जिच्या पत्रांवरून आपण समजलो ही आपल्या शेरास शेर निघणार. हिच्याशीच लग्न करावं. ड्रायव्हिंगचं लायसन्स हाती असणं एक गोष्ट झाली पण गाडी चालवायला मिळणं ही वेगळी गोष्ट. दिवसभर गाडी डॅडींकडे असायची. ते ऑफिसला जायला निघायच्या आधी स्वयंपाक असायचा. डॅडी पोळी-भाजीचा डबा नेत असत. ऑफिसमधून ते संध्याकाळी परत आले की पुन्हा ती रात्रीच्या स्वयंपाकात गुंतलेली असायची. गाडी चालवायला वेळ कुठला? मग गाडी चालवायला शिकायचं का? ह्या प्रश्र्नाला तिचं उत्तर होतं, ‘कधी वेळ आली तर चालवता आली पाहिजे.’
‘वेळ आली तर’ ही तिच्यासाठी अगदी खरी संभावना होती. आम्हाला उजेडात निजवणं, अंधारात निजवणं, असे प्रयोग ती करायची त्याच्या मागे हेच तत्व होतं. ‘वेळ आली तर’ कुठेही झोप लागली पाहिजे. तसंच जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी कोणत्याही परिस्थितीत टिकून राहता आलं पाहिजे. ‘भुकेला कोंडा निजायला धोंडा’ ही म्हण आम्ही आयुष्यभर ऐकली.
आईच्या शिक्षणाचा तिसरा भाग होता गायन. तिचा आवाज गोड आणि सुरेल होता. अष्टैकर गुरूजींच्या समोर ती गायची तेंव्हाच फक्त आम्हाला तो ऐकायला मिळायचा. रियाज करायला तिला कधीच वेळ नसायचा. जितकं गाणं अष्टैकरांच्या पुढ्यात बसून शिकणं झालं तितक्या पुंजीवर ती जी ए पास झाली. बेहेरे घराण्याला संगीताचं वरदान होतं. नलू मावशीने संगीत हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग केला. ती कॉलेज करायला आमच्याकडे दोन-तीन वर्षं होती तेंव्हा ती जवळच्या व्यासांच्या क्लासला जात असे. कॉलेजमध्ये असताना तिने ‘संगीत खडाष्टक’ नाटकात काम केलं होतं. लग्न झाल्यावर अनेक वर्षांनी ती पंडित शरदचंद्र आरोलकरांकडे शिकू लागली. ते आमच्या जवळ इंदु मावशी पुसाळकरच्या बिल्डिंगमध्ये राहत असत. नलू मावशी कुर्ल्याहून शिकवणीसाठी येत असे. शिकवणी आटोपली की आमच्याकडे यायची. तिच्या आणि माझ्या गाण्यावरून खूप गप्पा व्हायच्या.
सिंधू मावशीने देखील आमच्याकडे राहून कॉलेज केलं. ती सुद्धा उत्तम गात असे. आईचा आवाज बारीक, नलू मावशीचा भरीव आणि खणखणीत तर सिंधू मावशीचा जाडसर पण गोड. मावशांना अभ्यासाच्या संधी डॅडींची त्याला मान्यता होती म्हणून आई देऊ शकली. पण त्याच संधी तिला झगडून, वेळात वेळ काढून लग्नानंतर मिळवाव्या लागल्या. अर्थात त्याविषयी तिने कधीही रडगाणं गायलं नाही. मला हे करायचं होतं, ते करायचं होतं पण मेला संसार आड आला हा विचार तिच्या मनाला कधीच शिवला नाही. संसारात तिच्या अंगच्या इतर अनेक गुणांचं तिने चीज केलं आणि त्यातून खूप समाधान मिळवलं.
आईला स्वयंपाकाची मनापासून हौस तर होतीच पण त्यातली कला तिला जितकं समाधान द्यायची तितकंच समाधान तिच्या प्रयोगांतून ती मिळवत असे. आजी असं करत असे ते का? नाना असं कारायचे त्याच्या मागचं शास्त्र काय? हे प्रश्र्न ती सतत स्वतःला विचारत असावी. कला म्हणाल तर तिने वाढलेलं ताट पहावं. जेवणाचा मेन्यू ठरवतानाच त्याची रंगसंगती ठरायची. ताटात एक पिवळी भाजी असेल तर त्याच्याजवळ हिरवीगार भाजी असायची, वाटीत आमटी किंवा टोमॅटोचं लाल सार. डावीकडे हलक्या हिरव्या रंगाची खमंग काकडी नाही तर हलक्या पिवळ्या रंगाची कोबीची पचडी.
आईला पोळ्या लाटताना पाहणं म्हणजे लयबद्ध ह्या शब्दाचा पोळपाटावर होणारा आविष्कार बघणं. तिचा हात ठेक्यात फिरायचा. कणिकेचा गोळा पोळपाटावर गोल गोल फिरत पातळ होत जायचा. आता तेल लागलं, एक घडी झाली, दुसरी घडी झाली, वर पिठी भुरभुरली, पुन्हा हात चालू. बघता बघता त्रिकोनी घडीची गोल पोळी व्हायची. ती उचलली की नेमकी समेवर तव्यावर पडायची. की दुसरं आवर्तन सुरू. एका आवर्तनाचा काळ ६० सेकंदाचा असायचा.
कोणतंही काम निगुतीने करावं हे आईचं आणखी एक ब्रीदवाक्य. निगुती ह्या शब्दात अनेक अर्थ भरलेले आहेत. निगुतीने म्हणजे हुशारीने, काळजीपूर्वक, पूर्ण लक्ष देऊन, आपल्या अंगातलं सर्व कौशल्या वापरून. मी कालची वृत्तपत्रं रद्दीत ठेवते तेंव्हा टोकावर टोकं ठेवून त्यांच्या साफ घड्या घालते. रद्दी दृष्टी आड जाणार असते पण आई समोर असते.
स्वयंपाकातल्या प्रयोगांतून आईने अनेक पाककृतींची निर्मिती केली त्यापैकी एक दुधी भोपळ्याची भाजी. कृति साधीच होती पण भाजी अत्यंत चविष्ट व्हायची. तुपाची हिरवी मिरची घालून फोडणी, त्यावर काजूचे तुकडे, दुधीच्या एक सारख्या कापलेल्या फोडी, आपल्याच रसात अर्धवट शिजवायच्या. शिजवण्याची क्रिया दूध घालून पूर्ण करायची. मीठ, साखर, नारळ, कोथिंबीर घातली की अर्धवट पारदर्शक, हलक्या हिरव्या रंगाची भाजी तयार. मी ह्या भाजीची कृति कुठे तरी लिहिली असावी. मुंबई हाय कोर्टाच्या न्यायमूर्तीं मृदुला भाटकर यांनी ती वाचून घरी केली आणि ती त्याच्या कुटुंबात सर्वांची आवडती झाली असं त्यांनी मला एका भेटीत सांगितलं.
साबूदाण्याची खिचडी, उपीट, पोहे ह्या अल्पोपहाराच्या पदार्थांबरोबर आई आणखी एक पदार्थ करत असे. त्याचं तिने नामकरण केलं नव्हतं. कदाचित कानाला बरं लागेल असं नाव तिला सुचलं नसावं. ह्या पदार्थासाठी ती भिजवलेली चणा डाळ भरडी वाटून घेत असे. आपण खिचडीसाठी भिजवतो तसा साबुदाणा भिजवत असे. बारीक चिरलेला कांदा घालून फोडणी करून त्यावर वाटली डाळ आणि साबुदाणा घालून वाफेवर शिजवत असे. वर नारळ, कोथिंबीर घातली की पदार्थ तयार.
तिने निर्माण केलेला आणखी एक (आणी शेवटचा) पदार्थ आता देते. त्याचं नाव तिने ‘डेझर्ट डिलाईट’ ठेवलं होतं. त्यासाठी खजूर कुसकरून घ्यायचा. त्यात साखर घालून गोळा होईपर्यंत शिजवायचा. ताटावर त्याची गोळी टण्ण वाजली की त्यावर तुपाची धार सोडायची, आक्रोडाचं भरड कुट घालायचं आणि ढवळून उतरवायचं. प्लास्टिकच्या दोन तुकड्यांच्या मधे खजूराच्या गोळ्याची जाड लंबचौकोनी पोळी लाटायची. वर पाढरं शुभ्र सुकं खोबरं पेरायचं. पोळीची वळकटी करून त्याच्या गोल चकत्या कापायच्या.
आईचे अनारसे, गुलाबाचे चिरोटे, मैसूर पाक ह्यांच्याकडे बघत राहावं, खाऊच नये असं वाटत असे. तिची गूळपोळी खुटखुटीत, पुरणपोळी लुसलुशीत, मोदक सुबक आणि बेसन लाडू जरद पिवळे, घशात कधी न बसणारे असायचे. तिची एक मैत्रिण तिला म्हणाली तुमचे लाडू कच्चे दिसतात हो. आमचे असे पिवळे नसतात. आम्ही बेसन खमंग भाजतो. आई म्हणाली खाऊन पहा कच्चे लागतात का. आम्ही देखील बेसन खमंग भाजतो पण मंदाग्नीवर. निगुतीने.
आईबरोबर आम्ही पोह्याचे पापड लाटले आहेत. बक्षीस म्हणून तेलात बुडवलेल्या डांगराच्या लाट्या खाल्ल्या आहेत. संक्रांतीला शेगडीवरच्या परातीत हात भाजून घेत, तिळावर काटेरी साखर चढवून हलवा बनवला आहे. हे सर्व शिकलंच पाहिजे असा तिने कधी आग्रह केला नाही. पण आम्हां दोघींना ती करत असलेल्या प्रत्येक गोष्टीची उपजत हौस होती.
आईच्या हाताखाली नेहमी एक चोवीस तासांचं माणूस असायचं. घऱात सतत पाहुणे, त्यामुळे तिला मदत लागायची. अनेकदा एखाद्या गरजू मुलीला किंवा बाईला ठेवलेलं असायचं. एक-दोन वर्ष घाऱ्या डोळ्यांची कुंदा चाफेकर होती. तिची काही तरी दुःखद कहाणी होती. काय ती मला आठवत नाही. पण काकूंची कहाणी आठवते. त्यांना नवऱ्याने मार झोड करून घरातून हाकललं होतं. त्या तीन चार वर्ष आमच्याकडे होत्या. नंतर कुठे गेल्या माहीत नाही. आईने त्यांची कुठेतरी व्यवस्था करून दिली असावी.
खूप पूर्वी डॅडींचे एक मित्र अनेक महिने आमच्याकडे राहिले होते. त्यांची बायको अचानक गेली म्हणून ते सैरभैर झाले. म्हणून डॅडींनी त्यांना घरी राहायला बोलावलं. ते मनाने स्थिर झाले, त्यांचं दुसरं लग्न ठरलं तेंव्हाच ते आपल्या घरी गेले. दोनेक वर्ष डॅडींचे मोठे भाऊ हरीकाका आमच्याकडे राहत होते. ते रेल्वेत होते आणि त्यांची मुंबईला बदली झाली होती. दुसरीकडे बदली झाल्यावर ते गेले. दोन मावश्या शिकायला होत्या त्याच प्रमाणे डॅडींच्या सर्वात मोठ्या भावाची, दादासाहेबांची एकुलती एक मुलगी विमलताई एकदोन वर्ष होती. तिला बॅंकेत नोकरी होती. ती सबनीस नावाच्या सहकाऱ्याच्या प्रेमात पडली. दादासाहेबांना हे पसंत नव्हतं. आई-डॅडींनी नंतरच्या काळात अनेक विवाहेच्छू तरुण-तरुणींना पाठिंबा दिला तसा तिलाही दिला. पण दादासाहेब हटेनात. त्यांनी तिला नाशिकला बोलावून घेतलं. त्या नंतर तिच्या आयुष्यात बरीच उलथापालथ झाली. तिने स्वतःचा जीवनसाथी शोधलाच. पुन्हा संघर्ष. तिच्याशी वडीलांनी नातं तोडलं. तिने लग्न केलं. ती सुखी झाली पण माहेराला मुकली.
अशीच सिंधू मावशीची गोष्ट. ती डहाणूहून आली ती तापाने आणि रागाने फणफणलेली. अण्णा मामाशी भांडण करून, डोक्यात राख घालून, तडकाफडकी घर सोडून आली. इथे कॉलेज केलं. पुढे काय असा प्रश्र्न समोर उभा होता. तेवढ्यात आई-डॅडींची पाटण्याला ज्या कुटुंबाशी ओळख झाली होती त्यांच्या नात्यातल्या एका बाईला आपल्या मुलीसाठी गव्हरनेस हवी होती. मुलीचा सांभाळ करायचा. तिच्यावर संस्कार करायचे. तिचा अभ्यास बघायचा असं गव्हर्नेसचं काम असायचं. ही मंडळी काही वर्षांसाठी लंडनला चालली होती. आईला वाटलं सिंधू मावशीने ही नोकरी पतकरली तर तिला एका बाजूला एखादा उपयुक्त कोर्स करता येईल आणि भारतात परत आल्यावर वेळ आलीच तर त्याच्या सहाय्याने ती आपल्या पायांवर उभी राहू शकेल. सिंधू मावशी जायला तयार झाली. अण्णा मामाने आईला रागाचं पत्र लिहिलं. तू सिंधूला नोकर म्हणून पाठवत आहेस. सिंधू मावशी लंडनला गेली. त्याला एक वर्ष झालं नाही तोच तिला चंद्रकांत मोरे भेटले. त्यांनी तिथे रबर टेक्नॉलॉजीत पदवी मिळवली होती. ते तिच्या प्रेमात पडले. त्यांच्या फटफटीवरून तिला ते हिंडवू लागले. लवकरच तिने नोकरी सोडली. ती आणि ते दोघेही भारतात परत आले. आईने तिच्या बाबतीत केलेला बेत फसला त्याचं तिला खूप वाईट वाटलं. पण दोघांनी लग्न करायचं ठरवल्यावर ती किंवा डॅडी काय म्हणणार? अण्णा मामाने तर सिंधू मावशीच्या बाबतीत कधीच हात झटकले होते. त्यामुळे सिंधू मावशीच्या लग्नाची जबाबदारी पूर्णपणे आई-डॅडींवर आली. ही १९५४च्या आसपासची किंवा त्या आधीची गोष्ट असावी. तेंव्हा आजी-बाबा म्हणजे डॅडींचे आई-वडील बेळगाव सोडून आमच्याकडे राहायला आले होते. त्यामुळे लग्ना सारख्या कार्याला घरात जागा नव्हती. अनेक वर्षांपूर्वी परेरांच्या एका मुलाच्या लग्नाचं जेवण आणि डान्स ज्या हॉलमध्ये झाला होता तो आता उपलब्ध नव्हता. आमच्या गल्लीतली सर्व कुटुंबं खूप एकोप्याने राहत असत. परेरांचं तळ मजल्यावरचं घर आमच्या घरापेक्षा लहान होतं आणि त्यांचं कुटुंबं बरंच मोठं होतं. त्यांनी आईला विचारलं एक दुपार भर तुमचा हॉल आम्हाला वापरायला द्याल का. आई एका पायावर कबूल झाली होती. पुढे असं झालं की नेमकं त्या लग्नाच्याच वेळी डॅडींचे मधले भाऊ तात्या साहेब कर्क रोगाच्या उपचारासाठी मुंबईला आले होते. आई-डॅडींच्या बेडरूममध्ये त्यांना पलंग घालून दिला होता. मधलं दार बंद केलं की हॉल मधला आवाज दबला जायचा. पण तात्या साहेबांना तेवढा आवाज देखील सहन होत नसे. मग डान्स बॅंडचा आवाज त्यांना कसा झेपणार? परेरांना आणि त्यांच्या पाहुण्यांना जेवा पण बॅंड वाजवू नका असं कसं म्हणणार? बॅंड आणि डान्स त्यांच्या लग्न कार्यातला महत्त्वाचा भाग होता. आईने त्यांना परिस्थिती समजावून सांगितली. सॉरी मी तुमच्यात नसेन पण काही लागलं तर आमचा गोविंदा (घरगडी) तुम्हाला हवी ती मदत करेल. एवढं सांगून तिने मधलं दार लावून घेतलं, तात्या साहेबांच्या शेजारी खुर्चीवर बसली, त्यांच्या कानावर उशी ठेवली आणि बाहेर जेवण-डान्स चालू असताना दोन-तीन तास दोन्ही हातांनी ती उशी दाबून ठेवली. अशा प्रकारे दिलेला शब्द तिने पाळला आणि तात्या साहेबांना फार त्रास होऊ नये ह्याची काळजी घेतली.
सिंधू मावशीच्या लग्नासाठी मात्र आमचा हॉल उपलब्ध नव्हता. आमच्या शेजारी डॉ क्षीरसागर राहत असत त्यांच्याकडे त्यांचा हॉल आईने एका दिवसासाठी मागितला. तो रिकामा होता की त्यांनी तो रिकामा करून दिला माहीत नाही. पण तिथे सिंधू मावशीचं लग्न झालं. काही दिवस मोरे दांपत्य परळला खोली घेऊन राहिले. पण मोरे काकांच्या नोकरीचं इथे जमेना. म्हणून ते इंग्लंडला परत गेले आणि त्यांच्या मागोमाग सिंधू मावशीही गेली.
आईची सतत धावपळ चालू असे त्यात तिला तब्येतीचा आधार होता असं मुळीच नाही. तिच्या शब्दात सांगायचं तर तिची तब्बेत रुकूटुकूच होती. तिला झोप लागत नसे. डोकेदुखी तिच्या पाचवीला पुजली होती. अमृतांजनाची लहान बाटली नेहमी तिच्या उशागती असे. ती विनोदाने तिला पाठराखीण बहीण म्हणत असे. तिला पित्ताचा त्रासही होता. तो अनेक वर्ष तिने सहन केला. त्यावर उपाय काय करावा ह्याचा ती सतत विचार करत असे. तिने अनेक प्रयोग करून पाहीले. शेवटचा यशस्वी ठरला. त्या मागचा वैज्ञानिक विचार होता की चहाने ऍसिडिटी होते. सकाळच्या चहाच्या अगोदर आपण पाव कप दूध पिऊन पहावं. दुघाची क्षारीयता कदाचित चहाच्या आम्लीयतेला निष्क्रिय करेल. आई चहाच्या आधी दूध पिऊ लागली आणि तिचं सकाळचं पित्त ओकणं थांबलं.
आई साधारण ३८ वर्षांची असताना तिला सौम्य संधिवात सुरू झाला. तिचे गुडघे दुखू लागले. आम्ही जेंव्हा पिंडारी ग्लेशियरची सात दिवसांची चढण चढून गेलो तेंव्हा आईचं वय ३९ वर्षांचं होतं. ती ज्या प्रकारे कठीण चढण सुद्धा चढत होती त्यावरून कोणालाही वाटलं नसतं तिला गुडघे दुखी आहे म्हणून. आईच्या बाबतीत mind over matter (आत्मबळाची शरीरावर मात) हे तत्व तंतोतंत खरं होतं. एका चढणीवर मात्र तिच्या आत्मबळाला आमच्या टेकूची गरज भासली. ती चढण इतकी सरळ होती की वळसा घेतल्यावर मागचा भाग थेट आपल्या खाली दिसायचा. आम्ही वर पोहोचलो की खाली बघून तिला उत्तेजन देत होतो, आई आता हे शेवटचं वळण. ती आम्हाला पुढे व्हा असा हात करून पायाखालच्या जमिनीवर नजर रोखून चालत राहायची. प्रवासाचा तो टप्पा केवळ तिच्या जिद्दीच्या जोरावर तिने पूर्ण केला. परतताना आपण केवढी सरळच्या सरळ चढण चढलो हे तिच्या लक्षात आलं. अनेक वर्षांनी ती डॉ हब्बूंचं होमिओपॅथिक औषध घेऊ लागली तेव्हा तिचा संधिवात आटोक्यात आला.
ही सर्व नेहमीची म्हणजे chronic दुखणी झाली. पण तिला एका फटक्यात येऊन गेलेलं जे दुखणं होतं त्याची सुरुवात अत्त्यंत नाट्यमय पद्धतीने झाली. तिही रंगमंचावर नाही तर विंगेत. म्हणजे आमच्या दृष्टीने विंगेत. कारण आम्ही कोणीच तेव्हा घरी नव्हतो. तिने त्या घटनेचं वर्णन करून सांगितलं तेव्हा आम्हाला त्या दुपारी काय झालं ते कळलं. तिचा होमिओपॅथीवर ठाम विश्वास होता. आमच्या जवळच मेनन नावाचे होमिओपॅथ राहत असत. त्यांचं क्लिनिक घरातच होतं. तिच्या गुडघ्यांसाठी ती प्रथम त्यांचं औषध घेऊ लागली होती. एक दिवशी दुपारी ती व्हरांड्यात काही कामासाठी गेली असताना तिच्या पायाशी अचानक रक्ताचं थारोळं झालं. तिला पहिल्यांदा वाटलं ही नवीन औषधाची रिऍक्शन असेल. पण रिऍक्शन इतकी जबर असणं शक्य नाही म्हणून ती डॉ वसुंघरा वझेंना दाखवायला गेली. ही गेष्ट आज झाली असती तर डॉक्टरांनी तिला अनेक महागड्या चाचण्या करून घ्यायला सांगितल्या असत्या. पण वसुंधराताईंनी तिला केवळ तपासून निदान केलं. गर्भाशय काढायला हवा. आई इतकी स्वतंत्र बुद्धीची आणि धैर्यवान होती की ठरल्या दिवशी आम्ही शाळेत आणि डॅडी ऑफिसला गेलेले असताना ती हॉस्पिटलात गेली आणि ऑपरेशन करून घेतलं. सोबतीला कोणी नाही. तिला डिसचार्ज मिळाल्यानंतर तिला थकवा, दुखणं-खुपणं असा काही त्रास झाला असेलच तर तो आमच्या कानावर आला नाही. ऑपरेशन झालं आहे म्हणून आम्ही तिला कधी झोपलेली पाहीली नाही. आता विचार केला की वाटतं हे कणखरपणाच्या पलीकडचं काही तरी होतं.
डॅडींनी आणि आईने पाटण्यात जोपासलेला प्रवासाचा छंद मुंबईत आल्यावरही त्यांनी चालू ठेवला. आम्ही लहान असताना, दर वर्षा आड आम्हाला डहाणूला पाठवून ते लांबचा प्रवास करून येत असत. एकदा ते काश्मीरला जाऊन आले आणि एकदा माउंट आबूला. माउंट आबूचं आईने प्रवास वर्णन लिहिलं आहे ते ह्या प्रकरणाच्या शेवटी देत आहे. आम्ही थोड्या मोठ्या झाल्यावर मात्र ते आम्हाला बरोबर नेऊ लागले.
आईने मला एकटीला बंगलोरला नेलं होतं. तिथे डॉडींचे बेळगांवचे मित्र कश्यपी राहत असत. ते डॅडींना सारखे रहायला बोलावत. ओगले ग्लास वर्क्सच्या बंगलोरच्या कारखान्याचे ते मॅनेजर होते. डॅडींना त्यांच्याकडे जायला सवड मिळत नव्हती म्हणून ते आईला म्हणाले तू सध्या जा मग आपण सगळे जाऊ. सगळ्यांचं जाणं कधी झालं नाही. पण माझी आईबरोबरची सहल कारखान्याला दिलेल्या भेटीमुळे अविस्मरणीय झाली. तोपर्यंत जे गूढ वाटत होतं ते तिथे उकललं. त्या काळी कागद उडू नयेत म्हणून वर ठेवायला खालून चपट आणि वरतून गोल अशी काचेची वजनं मिळत असत. त्यांच्या आत फुलं असायची. ती काचेत कशी शिरली ह्याचं मला फार नवल वाटत असे. ती वजनं तयार करण्याची संपूर्ण प्रक्रीया मला त्या कारखान्यात पहायला मिळाली. आणि माझे डोळे फिरले. काच वितळून पातळ करणं मग फुगा फुगवतात तशी ती फुगवणं. त्यात हवं ते भरणं. त्याला हवा तो आकार देणं. ही किमया पाहून मी थक्क झाले. आमच्या त्या सहलीचा फोटे आहे त्यावरून मी तेंव्हा सहा-सात वर्षांची असेन असं वाटतं. तितक्याच वयाची निर्मल असताना तिला डॅडींनी त्यांच्या धारवाडच्या कॉलेजातल्या एका मित्राकडे राहायला नेलं होतं. त्यांचं नाव माधवराव गणपुले. त्यांच्या मोठ्या भावाचा, अनंतराव गणपुले यांचा मोरवीला विटा, फरशा, संडासातली भांडी, मातीच्या कप-बश्या-किटल्या इ. वस्तु बनवण्याचा कारखाना होता. त्याची वांकानेरला शाखा होती त्याचे गणपुले काका सर्वेसर्वा होते. मी काचेच्या वस्तू बनवताना पाहील्या तशा निर्मलने विटा बनवताना पाहील्या. आम्ही विभागून प्रवास करण्याची एवढी दोनंच उदाहरणं. इंग्लंडला जाण्या आधी डॅडींना सोडून आम्ही तिघींनी एकच प्रवास केला. मथुताई डोंगरेंच्या समुद्रकाठच्या अलीबाग जिल्ह्यातल्या अक्षी गावच्या घरी. तिथे आम्ही तीन-चार दिवस राहिलो. त्या सुट्टीतल्या दोन खास आठवणी आहेत. आम्ही रोज सूप भरून घरचे रायवळ आंबे खायचो ही एक. आणि डोंगरे मावशींच्या वाडीतले गावकरी माडाच्या सुकलेल्या झावळ्यांच्या चटया विणायचे ते बघत आम्ही उभे राहायचो ही दुसरी.
आईला अनेक जीवाभावाच्या मैत्रिणी होत्या. त्यापैकी काहींना ती डहाणूपासून ओळखत होती. एक होत्या डोंगरे बालामृतवाल्या डोंगऱ्यांच्या कुटुंबातल्या मथुताई डोंगरे. त्या काळात डोंगरे याचे बालामृत प्रसिद्ध होतं. त्या गिरगावात एका प्रशस्त चार मजली इमारतीत राहायच्या. मुंबईमध्ये त्या काळात तीनहून अधिक मजल्याच्या फारशा इमारती दिसत नसत. आई मथुताईंकडे अधूनमधून जात असे. दोन चारदा तिने मलाही बरोबर नेलं होतं. माझ्यासाठी ह्या भेटी नवलाईच्या असत. प्रथम म्हणजे मावशींच्या घराला लिफ्ट होती. त्या चवथ्या मजल्यावर राहायच्या. लिफ्ट जुन्या काळची होती. त्यामुळे तिचा वेग बेताचा होता. ती हळू हळू चढत जाताना इमारतीच्या इतर मजल्याचं व्यवस्थित दर्शन घडत असे. वर पोहोचल्यावर मावशींचे ‘आता कितवीत’ टाईप प्रश्र्न विचारून झाले की मी थेट त्यांच्या शो केस समोर ठाण मांडून बसायची. त्यात इतक्या निरनिराळ्या ठिकाणच्या शोभेच्या वस्तू होत्या की त्या पाहता पाहता वेळ कधीच निघून जायचा. शो केस मधली माझी सर्वात आवडती वस्तू होती ती छोटा टी सेट -- लहानसे कप, लहानशा बश्या आणि लहानसा टीपॉट.
डोंगरे मावशींच्या अलिशान घराच्या विरुद्ध यमू लव्हाटेचं दोन खोल्यांचं घर. ही आईची डहाणूची बाल मैत्रिण. तिचा विवाह ऍडव्होकेट शंकरराव जोशी यांच्याबरोबर होऊन ती आमच्या अगदी जवळ रहायला आली होती. तिला चार मुलं होती, तीन मुली आणि एक मुलगा. सर्वात मोठी सिंधू पायाने अधु होती. तिच्या खालची शशी गात असे आणि नाटकांत कामं करत असे. तिसऱ्या मुलीचं नाव विसरले. मुलगा अरविंद. त्यांच्याकडे निर्मल आणि मी खेळायला जायचो. अधूनमधून यमू मावशी आईकडे येत असे. तिला आतून काही तरी दुःख असावं अशी तिची मुद्रा असायची. ती आईला त्या विषयी खालच्या आवाजात बरंच काही सांगत असे. मला त्याची थोडी फार कल्पना होती. आईकडे अनेक जणी आपली दुःख बोलून दाखवायच्या. ती सहानुभूतीने त्यांचं ऐकायची. देण्यासारखा सल्ला असेल तर द्यायची. पण इकडलं तिकडे कधी करत नसे. तिच्या शब्दात सांगायचं तर लोकांच्या दुःखाचं आपण भांडवल करू नये.
ताई घारप ही तिसऱ्या प्रकारची मैत्रिण. त्यांच्याकडे सुद्धा मी आईबरोबर जात असे. त्याही डहाणूच्या होत्या असा माझा समज आहे. त्या विघवा होत्या. नर्स होत्या. त्या यमु मावशीच्या घराहूनही लहान घरात राहत असत. गोखले रोडवरून वळलं की एका गल्लीच्या टोकाला त्यांची त्रिकोणी आकाराची खोली होती. तिथेच उठणं-बसणं-झोपणं आणि तिथेच स्वयंपाक. आई नेहमी म्हणायची ‘एका खोलीत नीटनेटका संसार कसा करावा हे ताईंकडून शिकावं. सर्व वस्तु जागेवर ठेवल्या की एका खोलीत सुद्धा मजेत राहता येतं बघ.’ धारप मावशी नऊवारीत असायच्या. त्यांची मुलगी विमल अविवाहित होती. ती ही नऊ वारीच नेसत असे. ताई गेल्या नंतर त्याच एका खोलीत विमल बरोबर तिच्या दोन भाच्या राहायला आल्या. आईने घरी भजन क्लास सुरू केला तेव्हां पेटीची साथ विमल करत असे.
इंदू मावशी पुसाळकरच्या आईचा उल्लेख मी आधी केलाच आहे. इंदू मावशी आईची खूप जवळची मैत्रिण होती. पण वयाने आईपेक्षा बरीच लहान असल्या कारणाने ती जास्त पाठच्या बहिणीसारखी होती. नवऱ्याच्या मित्रांच्या बायका जशा त्यांच्या बायकांच्या आपोआप मैत्रिणी होतात असं नाही, तसंच बायकोच्या मैत्रिणींचे नवरे पुरुषांचे आपोआप मित्र होतात असं नाही. पण पुसाळकरांच्या बाबतीत मात्र ही गोष्ट झाली. डॅडींचं आणि रामभाऊ पुसाळकरांचं खूप जमत असे. डॅडी निवृत्त व्हायच्या सुमारास त्यांना मुंबई सोडायचे वेध लागले होते. त्यांना पुण्याच्या आसपास घर बांधायचं होतं. त्यासाठी खिशाला झेपेल असा प्लॉट शोधायचा होता. पुसाळकरांनी तेव्हा रिझर्व्ह बॅंकेतली त्यांची उच्च हुद्द्यावरची नोकरी सोडून पुण्याला एका मोठ्या कंपनीत त्याहूनही मोठ्या हुद्द्यावरची नोकरी घेतली होती. डॅडी दर शनिवार-रविवार त्यांच्याकडे राहून, दोन दिवस पायपीट करून, उन्हाने करपून जाऊन, नाराज होऊन मुंबईला परत य़ेत असत. हे जवळ जवळ महिनाभर झाल्यावर त्यांच्या मेहनतीचं आणि पुसाळकर दांपत्त्याच्या आदरातिथ्याचं सार्थक झालं. त्यांना तळेगांव दाभाडे इथे कडोलकर कॉलनीत मनासारखा आणि खिशाला झेपेल असा प्लॉट मिळाला.
डहाणूच्या संबंधातून झालेल्या आईच्या मैत्रिणी होत्या तशा पाटण्यात ज्यांच्याशी तिची मैत्री झाली होती त्या माई मराठे होत्या. त्या उत्तम गायिका होत्या पण नंतर एका कौटुंबिक कारणाने त्यांना गाणं सोडावं लागलं. ती गोष्ट मला आईने सांगितली होती पण ती इथे सांगणं उच्चित नाही. मी एवढाच खुलासा करेन की त्यांचे यजमान ह्याला कारणीभूत नव्हते. माई मुंबईला आल्या नंतर त्या सटीसामाशी आईला भेटायला येत असत. तळेगावला सुद्धा त्या एकदा अचानक देवदुतासारख्या आल्या. त्या दिवशी तीन महीन्याच्या रेणुकाचे कान टोचायचे होते. सोनाराला बोलावणं गेलं होतं. पण आई आणि मी दोघीही कासावीस झालो होतो. रेणुका छोटीशी होती. आई स्वतःच्या आणि आमच्या बाबतीत जितकी धीट होती तितकीच नातवंडांच्या बाबतीत हळवी होती. निर्मलच्या मोठ्या मुलाला, भरतला, ती कौस्तुभ मणी म्हणायची. तो तिचा सर्वात लाडका होता. रेणुकाचं नाव तिने उमा ठेवलं. तिचं म्हणणं होतं की इतक्या नाजुक मुलीच्या नावात तो घणासारखा ‘ण’ कशाला? तिचं नाव सुटसुटीत आणि मृदू असायला हवं. म्हणून उमा. वडीलांनी पसंत केलेलं रेणुका नाव शहाणे कुंटुंबीय वापरू लागले आणि ते तिचं शाळेतलं ही नाव झालं. पण गोखले-बेहेरे परिवारात जवळपास सर्व जण तिला उमा म्हणू लागले. सांगायची गोष्ट म्हणजे ऱेणुकाचे कान टोचायचे होते त्या दिवशी नेमक्या माई तळेगावला आल्या. मुंबई-पुण्याचे अनेक जण असेच तळेगावला येत असत. कळवून येणं अशक्य होतं कारण तिथे फोन नव्हता. माईंना आम्हा दोघींची मनःस्थिती बघताच लक्षात आली. त्या म्हणाल्या मी उमाला मांडीवर घेते. तुमची आम्हाला गरज नाही. हो की नाही ग उमे? पडत्या फळाची आज्ञा. सोनार आले तशी आई आणि मी पशार झालो त्या थेट बागेच्या आणि गोठ्च्याही पलीकडे, घराकडे पाठ करून उभ्या राहिलो. कान घराकडे. तिथे सामसूम. थोड्या वेळाने माई उमाला कडेवर घेऊन आम्हाला शोधत आल्या. उमा थोडी कुरकुरली होती पण सोनाराचा हात हलका होता आणि काम पटकन झालं होतं.
प्रभाताई परांजपे आणि छायाताई गोडबोले ह्या आईच्या मुंबईत झालेल्या खास मैत्रिणी. आई-डॅडी शिवाजी पार्कचे रहिवासी झाले आणि लगेचच वनिता समाज हा आईच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग झाला. सिटी इंजिनियर मोडक यांच्या पत्नी लक्ष्मीबाई मोडक यांनी ह्या समाजाची १९३७ साली स्थापना केली. शिवाजी पार्क रहिवासी योजना तेंव्हा अमलात येत होती. त्यात नानासाहेब मोडकांचा मोठा वाटा होता. इथे नव्याने राहायला येणाऱ्या महिलांना भेटण्यासाठी, सांस्कृतिक करमणुकीसाठी, आपल्या कला-कौशल्यांचं प्रदर्शन करण्यासाठी स्थान असावं म्हणून लक्ष्मीबाईंनी वनिता समाजाची स्थापना केली. इथे कुठून कुठून राहायला आलेल्या कुटुंबांतल्या महिलांना एकत्र जोडून घट्ट विणीचा समाज निर्माण करण्याचं कार्य वनिता समाजाने केलं. आई समाजाची सभासद झाली त्याच सुमारास प्रभाताई आणि छायाताईही झाल्या.
छायाताई बोलघेवड्या होत्या. प्रभाताई त्या मानाने अबोल. आई दोघींच्या मधली, नेमकेपणाने बोलणारी. आमचं घर देखील त्या दोघींच्या घरांपासून सम अंतरावर. ह्या तीन मैत्रिणी मिळून फ्रेनी एलचीदानाकडे शिवण शिकायला जात असत. छायाताई त्यातून लवकरच गळल्या. त्यांना शिवणकामात खरा रस नव्हता. त्या घरी यायच्या तेंव्हा आपल्या सात मजली हसण्याने आमचे तीन मजले दणाणून टाकायच्या. डॅडी आणि त्या एकमेकांची खूप मस्करी करीत. मी इंग्लंडहून काही महीन्यांसाठी परत आले तेव्हां माझे फोटो काढून घेण्याचा छायाताईंनी घाट घातला. त्यांनीच फोटोग्राफर आणला आणि माझे दोन सिल्कच्या साडीत आणि दोन नऊ वारीत फोटो काढून घेतले. गोडबोले मावशींनी आणलेला फोटोग्राफर बाबू (आपण त्यांना त्यांचं पूर्ण नाव कधीच कसं विचारलं नाही ह्याची आता मला लाज वाटते) हे नंतर आमचे घरचे फोटोग्राफर झाले. निर्मलच्या आणि माझ्या लग्नाचे फोटो त्यांनीच काढले.
डॅडींच्या दोन तीन मित्रांच्या बायका सोडल्या तर इतरांशी आईची फार दोस्ती झाली नाही. दोन तीन मित्र अविवाहितच होते. दोन प्रोफेसरांची लग्न उशीरा झाली -- मं. वि राजाध्यक्ष आणि प्रा. टोणगांवकर. दोघांच्या बायकांची नावं विजया. पैकी फ्रेंचच्या प्राध्यापक विजया टोणगांवकर यांच्याशी आईची जवळीक झाली. त्यांच्या मोठ्या मुलाला तिने तिच्या मानलेल्या मुलीच्या, विजया फाटकच्या मुलीचं स्थळ सुचवलं आणि त्यांचं लग्न झालं. डॅडी साधारणतः रविवारी सकाळी मित्रांना भेटायला जायचे. मी अनेकदा त्यांच्याबरोबर जात असे पण आई स्वयंपाकात असायची म्हणून ती येत नसे. महिन्या काठी एखाद्या शनिवारी डॉडींचे साहित्त्यिक, पत्रकार आणि प्राध्यापक मित्र आमच्या घरी जमायचे तेंव्हा आई त्यांच्यासाठी चमचमीत पदार्थ बनवत असे. ज्या मित्रांच्या बायका यायच्या त्यांना बाहेर चाललेल्या गप्पांत रस असायचा. इतर बायकांसारख्या त्या लगबगीने स्वयंपाकघरात मदत करू का विचारायला येत नसत. खरं तर आईलाही बाहेरच्या चर्चांमध्ये रस असायचा. पण ती आपलं गृहिणीचं कर्तव्य सोडून त्या ऐकायला बसत नसे. त्यामुळे डॅडींच्या मित्रांसाठी आणि त्यांच्या बायकांसाठी आई केवळ गोपाळराव गोखल्यांची बायको होती. एक मित्र सोडल्यास तिच्या वेगळ्या आणि स्वतंत्र अस्तित्वाची त्यांना कल्पना नव्हती. ते मित्र अभिरुची मासिकाचे संपादक, पु. आ. चित्रे, ज्यांनी तिची महंमद ही कथा आपल्या मासिकात छापली. ज्या एका मित्राच्या बायकोशी आईचं खास जिव्हाळ्याचं नातं जमलं ती म्हणजे ग. रा. कामत यांची बायको कुमुद, उर्फ सिने नटी रेखा पूर्वाश्रमीची सुखटणकर. कामत जेंव्हा पुणे सोडून मुंबईला आले तेंव्हा शिवाजी पार्कच्या पलीकडच्या बाजूला अल्ट्रा सोसायटीत त्यांनी फ्लॅट घेतला. त्यानंतर केवळ कुमुदताईशीच नाही तर तिच्या बहीणींशी देखील आईचा परिचय झाला. कामत दांपत्य पुण्यात असताना आम्ही त्यांच्याकडे एकदा जेवायला गेलो होतो. कुमुदताईने एग करी केली होती. ती आम्ही अशी चोपून खाल्ली की आम्हाला पाटावरून उठता येईना. एग करीची ती पाककृती आईने ताबडतोब शिकून घेतली. ती स्वतः शाकाहारी होती पण डॅडींना अधून मधून मटण मासे आवडायचे म्हणून ती करत असे. तिने आमच्या तिसऱ्या मजल्यावरच्या राव मावशींकडून सारस्वत पद्धतीची माशांची करी, असयेकर काका ह्या डॅडींच्या मित्राच्या बायकोकडून कोल्हापुरी पद्धतीचं मटण आणि चिकन हे सर्व शिकून घेतलं होतं. आता तिच्या मेन्यूवर एग करी आली.
आईच्या स्वतःच्या मैत्रिणी, बहिणींच्या मैत्रिणी, शिवण शिकणाऱ्या शिष्या, भजन क्लासमधल्या बायका अशा अनेकींना आईबद्दल प्रेमयुक्त आदर होता. सिंधू मावशीची मैत्रिण कला कोल्हटकर (नंतर खाडिलकर) आजही तिची आठवण काढते. ह्या पैकी अनेक मुलींनी, बायकांनी, आपल्या वैयक्तिक आयुष्यात झालेल्या, होत असलेल्या गोष्टी तिला सांगितल्या. ती त्या सहानुभूतीने ऐकेल, इकडलं तिकडे करणार नाही आणि आपल्याला विचार करून सल्ला देईल हा त्यांचा विश्वास होता आणि तो रास्तच होता. जिथे बिघडतंय तिथे आपण चार शब्द बोलून निस्तरणं शक्य असेल तर बोलावं नाही तर चुप बसावं हे आईचं तत्व होतं. कधी कधी ज्या बाईने तिला काही तरी गुपित म्हणून सांगितलेलं असायचं ते नंतर तीच तीन इतर जणींना सांगायची. मग फिरत फिरत ते गॉसिपच्या रूपात आईच्या कानावर यायचं. म्हणून एखादी बाई तिला जेंव्हा म्हणे, ‘तुम्ही बोलणार नाहीच, तरी आपलं सांगते, कोणाला सांगू नका हं’, तेंव्हा आई हसत म्हणायची, ‘तुम्हीही कोणाला सांगू नका हं.’
समाज सेवा करणं आईच्या स्वभावाचा, तिच्या आनंदाचा भाग होता. त्याविषयी काही न बोलता ती लोकांना सहजतेने मदत करीत असे. केलेल्या मदतीची कोणत्याही रूपात, साध्या शब्दांत सुद्धा, परत फेड व्हावी अशी तिची अपेक्षा नसे. कधी तरी ज्यांना मदत केली ते त्या मदतीस अपात्र ठरत किंवा तिच्याच विरुद्ध काही तरी बोलत तेंव्हा मात्र ती खट्टू होत असे. शांताबाई नावाच्या नवऱ्याने टाकलेल्या एक बाई आणि त्यांचा मुलगा यांना आईने आमच्या घरी तात्पुरता थारा दिला होता. त्यांची कामाची आणि राहण्याची व्यवस्था करण्याचं तिने अंगावर घेतलं. परांजपे मावशींच्या तीन नणंदा होत्या. त्या एकापेक्षा एक कर्तृत्ववान होत्या. सर्वात मोठी नणंद, उंच, देखणी, रुबाबदार मालती नौरोजी, ज्यांना सर्व जण अक्का म्हणत असत, त्या भारतातल्या पहिल्या घटस्फोटित महीला होत्या. त्यांचा सांगलीच्या राजघराण्यातल्या एकाशी बाल विवाह झाला होता. त्या इसमाला स्त्री हक्कांविषयी आस्था होती. त्यांनी अक्कांना आपल्याशी घटस्फोट घेण्यात सक्रीय मदत केली. नंतर अक्कांनी दादाभाई नौरोजींचे एक नातू, जालेजार अर्देशीर नौरोजी, यांच्याशी लग्न केलं. ते १९३८ साली गेले. अक्का चेंबूरला नौराजी फार्मवर एकट्याच राहत असत. त्या हळूहळू थकत चालल्या होत्या. त्यांच्याकडे राहील, त्यांची देखरेख ठेविल अशी कोणी तरी जबाबदार बाई त्यांना हवी होती. आईने शांताबाईंना त्यांच्याकडे लावून दिलं. अक्कांना त्या पसंत पडल्या. त्यांना आणि त्यांच्या मुलाला अक्कांनी फार्मवर स्वतंत्र खोली दिली. शांताबाई त्यांच्याकडे शेवट पर्यंत राहिल्या. पण त्यांचा मुलगा ऐदी निघाला. आईच्या जीवावर जगला. अक्का गेल्यानंतर आईला फूस लावून फार्म पूर्णपमे गिळंकृत करण्याचा कट त्याने केला. शांताबाई त्यात सामील झाल्या. अक्कांनी त्यांना जे द्यायचं ते मृत्यूपत्रात लिहून ठेवलं होतं. फार्मची विभागणी उषा (जातेगावकर) आणि सुशीला गोरेंची मुलगी अरुणा मलिक यांच्यात केली होती. शांताबाईंच्या कारस्थानामुळे दोघींना कोर्ट कचेऱ्या करून, एका गुंड राजकारण्याला शह देऊन आपल्या हक्काचा वारसा मिळवावा लागला. आई गेल्या नंतर ही गोष्ट घडली. तिला कळली असती तर तिला खूप वाईट वाटलं असतं.
आईच्या दयाळूपणाची आणखी एक गोष्ट. आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो. तिथे एकदा फिरत असताना समोरुन लक्तरं नेसलेली एक बाई आली. तिच्या कडेवर तान्हं बाळ होतं आणि हाताला, पदराला लोंबकाळलेली तीन लहान मुलं होती. तिने भिकेसाठी हात पुढे केला. आई तिला म्हणाली, ‘बाई मी तुला भीक देणार नाही. पण तुझं एखादं मूल मला दिलंस तर माझ्या मुलांबरोबर त्याला वाढवेन. तू जे मूल देशील ते मी घेईन.’ ती बाई हसली. म्हाणाली, ‘बाई, लोकं शिळी भाकरी देत नाहीत तर मी माझं पोर देऊ?’ तिने पोरांना आपल्या भोवती गोळा केलं आणि ती निघून गेली.
आगगाडीतून प्रवास करत असताना लोक शेंगा खाऊन टरफलं खाली टाकतात. तळेगावला घर बांधलं जात होतं तेव्हा दर आठवड्याला काम कसं चाललंय ह्यावर नजर ठेवायला आई तिकडे जात असे. खाली टाकलेली टरफलं दिसली की प्रथम ती टाकणाऱ्या लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करी. ‘हा देश आपला आहे. तो स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे.’ बहुतेक वेळा हे लोक तिला दुरुत्तर तरी करत नाही तर तिच्याकडे बघत मुद्दाम टरफलं खाली टाकत. मग ती आपल्याबरोबर एक पिशवी बाळगू लागली. कोणी काहीही खाली टाकलं की ते उचलून ती शांतपणे पिशवीत ठेवत असे. घरी आली की पिशवी कचऱ्याच्या करंडीत रिकामी करायची.
आईच्या आयुष्यातलं हे पर्व १९५६ सालच्या जूनमध्ये संपुष्टात आलं. त्या वर्षीच्या जूनमध्ये, ५ तारखेला, आई, निर्मल आणि मी पी ऍड ओ कंपनीच्या एस. एस. आरकेडिया जहाजाने इंग्लंडला जायला निघालो. आम्हा मुलींना इंग्लंडला शिकायला पाठवायचं हे डॅडींचं स्वप्न होतं. मला आधी आणि निर्मलची सीनिअर केंब्रिजची परीक्षा झाली की तिच्या मनात असेल तर तिला. मला एकटीला पाठवायला आई कबूल नव्हती. डॅडी म्हणाले मग तू जा तिच्या बरोबर. ती म्हणाली निर्मलला मागे ठेऊन मी कशी जाऊ? त्यावर ते म्हणाले मग तिलाही घेऊन जा. डॅडींनी एखादी गोष्ट मनात घेतली की घेतली. त्यांचे एक मित्र म्हणाले होते, ‘गोपाळराव चौखुर धावणाऱ्या घोड्यासारखे आहेत. त्यांना इंदिराबाईंचा लगाम आहे म्हणून बरं.’
पुढचं प्रकरण आईच्या लंडनच्या मुक्कामाविषयी आहे. हे प्रकरण संपवायच्या आधी आईचा माउंट अबूवरचा लेख आणि ‘महंमद ही कथा जोडत आहे. कथा अभिरुची मासिकात प्रसिद्ध झाली होती. मासिकाचे संपादक पुरुषोत्तम आत्माराम चित्रे हे डॅडींचे मित्र होते. त्यांनी तिची कथा मैत्रीच्या नात्यातून छापली असं होऊ नये म्हणून तिने ‘बिलावल’ ह्या टोपण नावा खाली ती त्यांना पाठवली. ती छापून आल्यावर बिलावल म्हणजे कोण हे तिने उघड केलं.
माउंट अबूच्या सहलीविषयीचा लेख कुठे प्रसिद्ध झालं हे मला माहीत नाही. आईच्या संग्रहात कात्रण नसून त्याची टंकलिखित प्रत आहे. लेख पत्राच्या स्वरुपात लिहिला आहे. एवढंच नव्हे तर हे पत्र ‘सुंदर’ नावाच्या काल्पनिक मैत्रिणीला पाठवलेलं आहे. डायरीच्या पहिल्या पानावरून लक्षात येतं की आई-डॅडींनी हा प्रवास १९४६ साली मे महीन्यात केला. तेंव्हा मी ६ वर्षांची होते आणि निर्मल ५ वर्षांची. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे आमची डहाणूला रवानगी झाली असावी. राजा मामाने निर्मलला श्रीखंडाची वडी म्हणून साबूचा तुकडा खायला दिला होता तो व्रात्त्यपणा त्याने ह्याच सुट्टीत केला की काय कोण जाणे.
बांदूर गाव मोठे रमणीय होते. सर्व जातींची वस्ती निरनिराळ्या उद्योगानिमित्त तेथे वसली होती. प्रत्येकाच्या घराच्या पुढल्या दारी सुंदर फुलझाडांचे बगीचे असत आणि मागीलदारी भाजीपाला व फळ झाडे लावलेली असत. ह्यामुळे गाव हिरवागार दिसे. ह्या टुमदार गावाच्या रमणीयतेची पूर्तता सागराने केली होती. त्याचा प्रशस्त किनारा संध्याकाळी रंगीबेरंगी माणसांनी अगदी फुलून जाई. नैसर्गिक सुबत्तेमुळे, हे गाव क्षणिक उतरणाऱ्या मुशाफिरासही आनंद देत असे.
एखाद्या डवरलेल्या झाडास किंवा सुंदर फुलांनी प्रफुल्ल झालेल्या पुष्प तरूस मुळाशी कीड लागावी व त्याचे सर्व सौंदर्य हरपले जावे तद्वतच ह्या गांवास काही दिवस घाणेरडी कीड लागली होती. तेथील सौंदर्यावर जणू काळाने झडपच घातली होती. परंतु ही कीड मनुष्यरूपी होती. तेथील बरेचसे लोक एका ढोंगी बुवांच्या मागे लागले होते. बुवा ह्या गावी वरचेवर आपल्या लवाजम्यासह येत व त्यांच्याकडे भक्तांच्या वाऱ्या सुरू होत. संतान नसलेल्या किती तरी बायका पुत्रप्राप्तीसाठी त्यांच्या सेवेला त्यांच्या मठात राहिल्या होत्या. लोकांचे लक्ष आपापल्या कामावरून अजिबात उडाले होते. बुवांची मात्र मजा चालली होती. पूर्वी संध्याकाळी फिरायला जाणारी माणसे, कामावरून आल्यावर शांतपणे बगीच्यात बसून आपल्या प्रेमाच्या माणसांशी गप्पा मारत बसणारे प्रेमी जीव, आता आरत्या म्हणू लागले होते. ज्याच्या त्याच्या घरात बुवांच्या तसबिरी झळकत होत्या. संध्याकाळच्या आरत्या, तीर्थ, प्रसाद वगैरे गोष्टी सुरू झाल्या होत्या. थोडक्यात म्हणजे गावातले बरेच लोक बुवांच्या पायी पार वेडे झाले होते.
एक दिवस अचानक बुवा नाहीसे झाल्याची वदंता भक्तांच्या कानी आली. बऱ्याच जागी त्यांना शोधले, परंतु ते सापडले नाहीत. भक्तगणांत खळबळ उडाली. त्यांना अत्त्यंत चुकल्याचुकल्या सारखे वाटू लागले. तरीही आशेच्या एका किरणाला ते घट्ट धरून होते. बुवा कधी तरी आपल्याला पुन्हा दर्शन देतील.
एक दिवस बजाबा धावतच बाबासाहेबांचेकडे गेला व आदल्या रात्री त्याला पडलेल्या स्वप्नाची त्यांना हकिकत सांगू लागला. त्याला स्वप्नात बुवा दिसले होते. बुवांनी भक्तांना कधी तरी दर्शन देण्याचे आश्वासन दिले होते व सांगितले होते की जो कोणी त्यांना प्रथम ओळखेल तो त्यांचा खरा भक्त होय.
ह्या बातमीने साहाजिकच भक्तगाणांत आनंद आणि उत्कंठा पसरली. प्रत्त्येकास वाटत होते की आपण बुवांना प्रथम ओळखू. बरेच दिवस लोटले तरी बुवांचं दर्शन घडण्याचं चिन्ह काही दिसेना. एके दिवशी गांवातील एक बडा मनुष्य मेला. तो बुवांचा लाडका भक्त होता. त्यामुळे बराचसा भक्तगणच प्रेत यात्रेला हजर होता. स्मशानात ज्या वेळी प्रेत यात्रा पोहोचली त्या वेळी तिथे बरीच दुर्गंधी येत होती. इकडे तिकडे पाहीले तर लोकांना एक कुत्रा मरून पडलेला दिसला. त्याच्या सडलेल्या शरीराचीच दुर्गंधी येत असावी असे त्यांनी ठरवले. कुत्रा उचलून समुद्रात फेकून दिल्याशिवाय तिथे उभे राहणे केवळ अशक्य होते. पण हे काम करणार कोण हा प्रश्न होता. जवळच अंगाला राख फासून एक बैरागी बसला होता. त्याच्याकडे काहींचे लक्ष गेले व त्यास कुत्रे फेकून देण्याचे काम सांगावे असे ठरले. एक मनुष्य त्याच्याकडे गेला व कुत्रे फेकून देण्याची त्यास विनंती केली. वर त्याने त्याला पैसे देण्याचे आश्वासन दिले. हे ऐकून बैरागी लगेच उठला व त्याने कुत्रे समुद्रात फेकून दिले. त्याचे त्याला पैसे देऊ केल्यावर ते तो घेईना. तो गुपचुप आपल्या जागी जाऊन ध्यानस्थ बसला.
तो जेंव्हा पैसे घेईना आणि लोकांच्या प्रश्नांना उत्तरं देईना तेंव्हा लोकांना फारच आश्चर्य वाटले. बैराग्याची जात पैशाला अतिशय हपापलेली असते. त्यांना अफू व गांजाचे व्यसन असते. त्यामुळे त्यांना कितीही पैसे मिळाले तरी ते अपुरेच असतात. स्मशान म्हणजे बैराग्यांची पैसे मिळवण्याची मोक्याची जागा. शिवाय देवालये व तीर्थ स्थाने ह्या देखील त्यांच्या बसायच्या जागा असतात. त्यांना तांदळाची भिक्षा मुळीच चालत नाही. एक पैसा दोन पैसेही चालत नाहीत. कमीत कमी दो आना, चार आना हवे असतात. बैराग्याची जात अशी असताना हा बैरागी पैसे घ्यायला तयार नाही पाहून लोकांची निरनिराळे तर्क करण्यास सुरुवात झाली. एकदा का माणूस तर्क करू लागला की त्याची धाव कुठे जाईल सांगणे कठीण.
बजाबा सुन्न होऊन विचार करू लागला. करता करता त्याच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. त्याला वाटले आपले स्वप्न तर खरे होत नाही ना? बुवांनी भक्तांना दर्शन देण्याचे कबूल केले होते. जो भक्त त्यांना ओळखेल तो त्यांचा खरा भक्त ते मानणार होते. वेष बदलल्याशिवाय ही गोष्ट घडणार नाही व भक्तांची परीक्षा होणार नाही. म्हणूनच बैराग्याचा वेषांत घेऊन ते आपली परीक्षा पाहात आहेत अशी त्याची खात्री पटू लागली. त्याला वाटलं आपण किती भाग्यवान. आपल्यालाच स्वप्न पडले व आपणच त्यांना ओळखणार! आता हे गुपित मी बाकी भक्तांना कसे सांगू? मित्रांना अगोदर सांगू की आधी बुवांचे जाऊन पाय धरू? का असाच सरळ घरी जाऊन हिला बातमी देऊ? करू तरी काय? मला काहीच सुचत नाही. पण सुचले. बजबाने लगेच बातमी भक्तांना सांगितली.
भक्तगणांत खळबळ उडाली. एक भक्त म्हणाला, “माझ्या आधीच लक्षात आलं होतं की हा बैरागी पैसे घेत नाही म्हणजे तो साधासुधा बैरागी नसणारच.” दुसरा म्हणाला, “माझ्या अगदी त्याच वेळी तोंडावर आलं होतं म्हणावं पण मी ते मागे घेतलं. मला वाटलं तुम्ही मला वेड्यात काढाल.” तिसरा म्हणाला, “ह्याची चर्चा करण्याचं कारण नाही. विधिलिखित जेथे ठरलेले होतं की बजाबालाच बुवा ओळखू येणार तेथे आपल्या मनात काय होतं आणि काय नाही हे सांगणं फुकट आहे.”
चर्चा थांबली. सर्वांनी बजाबाच्या नशीबाचे कौतुक केले. आजचा योग म्हणजे केवढा अवर्णनीय. एका भक्ताच्या दहन विधीला बुवा हजर असणे म्हणजे केवढे भाग्य! त्यांनी ठरवले की दहन विधी आटोपल्यावर बुवांना उघडपणे ओळखल्याचे सांगावे. दहन विधी आटोपताच सर्वांनी स्नान केले व बुवांचे पाय धरले. तरी बुवा आपले ध्यानस्थच. नजीकच घर असलेल्या एका भक्ताकडे बुवांना नेण्यात आले. तेथे त्यांना निरनिराळ्या सुवासिक तेलांनी स्नान घातले. नंतर आरती करून त्यांना पालखीत बसवले व त्यांची वाजंत्री लावून मिरवणूक काढली. बुवांच्या आजूबाजूला इतकी गडबड चालली होती, इतका आनंद उतू जात होता तरी बुवा आपले ध्यानस्थ. भक्तांना वाटले की बुवा आपली पुरी परीक्षा घेत आहेत.
नाम गर्जना, वाद्य, ऊद, धूप, अशा थाटात बुवांची पालखीतून मिरवणूक काढली. प्रत्त्येक घरी पालखी थांबवून सुवासिनी बुवांची आरती करीत होत्या. जिकडे तिकडे ऊद व कर्पुराचा सुगंध दरवळला होता. फुले, पैसे, अक्षता बुवांवर उधळल्या जात होत्या. अशा थाटात गावाच्या एका भागातून दुसऱ्या भागात मिरवणूक चालली होती. वाटेत मशीद लागली. वाद्ये बंद झाली. त्यामुळे लोकांची चालण्याची गतीही मंदावली. गांवाकडे जाणारा प्रत्येक माणूस पुन्हा उलट दिशेला तोंड करून मिरवणुकीत मिसळे. थोड्याच वेळात एक मुसलमान न्हावी पालखीकडे पुन्हा पुन्हा निरखून पाहताना दिसला. सर्व लोकांचे न्हाव्याकडे लक्ष गेले. तो वेडा असेल असे त्यांना वाटू लागले. इतक्यात न्हावीच आश्चर्याने ओरडून म्हणाला, “अरे वेड्यांनो, ह्याला कुठे नेत आहात. हा तर आमचा महंमद वेडा!”
प्रिय सुंदर,
दर वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठल्या तरी नवीन थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचा आमचा बेत असतो हे तुला माहीतच आहे. ह्या वर्षी अबूच्या पहाडावर जाण्याचा आम्ही विचार केला. अबू येथील राजपुताना हॉटेलची जाहिरात वर्तमानपत्रांत नेहमी येते. त्यामुळे आम्ही राजपुताना हॉटेलच्या मॅनेजरला पत्रही पाठविले. पत्र पाठविण्यास फार उशीर झाल्यामुळे नकारात्मक उत्तर येणार असेच वाटत होते, पण जागा असल्याबद्दल उत्तर आले. हॉटेल इंग्लीश पद्धतीचे असल्यामुळे जावे किंवा नाही ह्या विचारातच दोन दिवस गेले. त्यातच काही मित्रमंडळींनी प्रवासाबद्दल फारच बाऊ केला. “राजपुताना म्हणजे सहारा वाळवंट. जाताना प्रवासात उन्हाचा फार त्रास होईल. पुष्कळ वेळा सनस्ट्रोक होतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत का जाता? ऑक्टोबरमध्ये प्रवासाचा त्रास कमी आणि हवा उत्तम असते तेंव्हा जा” वगैरे प्रत्त्येक जण काहीतरी निरनिराळे सांगू लागला. पण प्रत्यक्ष जाऊनच काय ते पाहू असा विचार करून आम्ही आमचा जाण्याचा बेत नक्की केला.
पसोमवार ता. २० मे रोजी सायंकाळी आम्ही गुजरात मेलने जाण्याकरिता घरून निघालो. ‘प्रथम ग्रासे मक्षिकापात’ ह्या म्हणीप्रमाणे स्टेशनवर जातानाच आमच्या व्हिक्टोरियाचे चाक मोडल्यामुळे थोडे सामान खाली पडले. सुदैवाने आम्हाला काही दुखापत झाल्याशिवाय आम्ही गाडीतून उतरलो व दुसरी व्हिक्टोरिया करून स्टेशनवर गेलो. फ्रॉन्टिअर मेल अपघाताच्या प्रवासानंतरचा माझा बी. बी लाईनवरचा हा पहिलाच लांबचा प्रवास असल्यामुळे मनात जरा शंका उत्पन्न झाली. पण अपघात नेहमीच घडत नसतात असा विचार करून मनातली शंका दूर केली व प्रवासास सुरुवात केली. आम्ही रात्री गुजरात मेलने निघालो ते अहमदाबादला सकाळी साडेसहा वाजता पोचलो. अबू रोडला जाणारी गाडी लगेच साडेआठ वाजता निघते. ह्या गाडीने गेल्यास पुढचा प्रवास उन्हात करावा लागेल म्हणून आम्ही तो सबंध दिवस स्टेशनवरच ‘रिटायरिंग रूम’ मध्ये घालविण्याचे ठरवले. सकाळ-संध्याकाळ टांगा करून अहमदाबाद शहर सुद्धा पाहीले. रात्री साडे दहाला गाडीने पुढील प्रवासाला सुरुवात केली. दुसरे दिवशी सकाळी साडेआठ वाजता अबू रोडला पोचलो. नेहमीप्रमाणे मला मोटारचा त्रास झालाच. रस्ता फार नागमोडी आहे. रस्त्यावर दुतर्फा झाडी बरीच आहे. मोटारभाडे स्वस्त म्हणजे एक रुपयाच आहे. थर्ड क्लासला तर आठच आणे आहे. त्याशिवाय प्रत्येक माणशी वर जाताना एक रुपया यात्रेचा कर भरावा लागतो. स्पेशल मोटार केल्यास हा कर माणशी पांच रपयांप्रमाणे द्यावा लागतो. पण स्पेशल मोटारचे भाडे मात्र साडेदहा रुपये आहे. मोटार स्टॅंडवरच उभी राहते. तेथून हॉटेलला जाण्यास रिक्षा मिळतात. हॉटेल किती लांब आहे ह्याची कल्पना नसल्यामुळे आम्ही रिक्षा करूनच हॉटेलला गेलो.
पराजपुताना हॉटेलची जागा फारच प्रशस्त आहे. इतर व्यवस्थाही ठीक आहे. सर्व हिल स्टेशन्सप्रमाणे येथेही पाण्याचा तुटवडा आहे. पाणी विशेष चांगले नाही. ते स्टोव्हवर उकळून पिण्याचा विचार केला आहे. हिदू, युरोपिअन, खोजा, पारसी व ख्रिश्चन अशी सर्व जातींची ‘कंपनी’ असल्यामुळे वेळ मजेत जाईल असे वाटते.
पता. २३ मे १९४६
या पहाडाचे अबू नांव का पडले ह्याबद्दल एक मजेदार आख्यायिका सांगतात. हा पहाड देवांचे व साधूसंतांचे राहण्याचे एक प्रसिद्ध ठिकाण होते. गावाच्या एका बाजूला एक खोल खळगा होता. वशिष्ठ ऋषींची आवडती गाय नंदिनी एक दिवस ह्या खळग्यात पडली. तिला बाहेर काढण्यास त्यांनी सरस्वती नदीची मदत घेतली. सरस्वतीने ती सर्व खाच पाण्याने भरून काढली. त्याबरोबर नंदिनी तरंगून वर आली. त्या खाचेची जनावरांना आणि माणसांनासुद्धा फार भीति वाटत असे. वशिष्ठांनी ही खाच भरून काढण्यास श्री शंकराचा मुलगा हिमालय यास विनंती केली.
त्याचा सहानुभूति पूर्वक विचार होऊन हिमालयाने ही कामगिरी आपल्या धाकट्या मुलावर सोपविली. तो लंगडा असल्यामुळे त्याला अरबुधा नावाच्या सापाची मदत घ्यावी लागली. अरबुधाने एका अटीवर त्याला मदत करायचे कबूल केले. ही खाच भरून जो डोंगर तयार होईल त्याला अरबुधा हे नाव दिले पाहिजे. म्हणून ह्या डोंगराला अरबुधा हे नाव पडले. अबू हा अरबुधाचा अपभ्रंश. येथून जवळच डोंगरात देवीचे एक देऊळ आहे. त्या देवीला अरबुधादेवी किंवा अधरदेवी म्हणतात. वर जाण्यास अडीचशे पायऱ्या चढाव्या लागतात. वरील देखावा फारच प्रेक्षणीय आहे. देवीचे देऊळ लहानच आहे. आत जाण्याचा दरवाजा ठेंगणा असल्यामुळे कोणालाही मान वाकवूनच देवळात प्रवेश करावा लागतो. देवळाच्या वाटेवर दूध बावडी म्हणून एक विहीर आहे. पुरातन काळी साधू संतांना उपयोग व्हावा म्हणून ही विहीर खऱ्या दुधाची होती असे सांगण्यात येते. खऱेच, अशा दुधाच्या विहिरी सांप्रतच्या काळी असत्या तर किती बरे झाले असते!
पजैनांची जगविख्यात दिलवार देवळे हे अबूचं वैशिष्ट्य आहे. कोरीव कामात हिंदुस्तानात ताज महालच्या खालोखाल ह्यांचा नंबर लागतो असे म्हणतात. एवढे मात्र खरे की संगमरवरी दगडावरील कोरीव कामाचा उत्कृष्ट नमुना येथे पाहावयास मिळतो. देवळाबाहेरील आवार व जागा मात्र इतकी गलिच्छ व पडीक आहे, की आत इतकी सुंदर देवळे असतील अशी कल्पनासुद्धा येणार नाही. एकंदर येथे पांच देवळे आहेत. पैकी दोन फारच मनोहर आहेत. बाकी तीन कारागीरांनी आपल्या फावल्या वेळात विनामोल बांधली असे म्हणतात.
पपहिले देऊळ भीमदेवाचा प्रधान विमलशा याने १०३१ साली बारा कोटी रुपये खर्च करून बांधले. हे देऊळ ज्या जागेवर बांधले आहे ती जमीन राजा परमार याच्याकडून विकत घेतली. ती सर्व जागा व्यापण्यास जेवढे रुपये लागले तेवढे रुपये जागेची किंमत म्हणून दिले असे सांगतात. ह्या देवळात आदिनाथाची पंचधातुची मूर्ति आहे. मूर्तीच्या डोळ्यात व तोंडात तेजस्वी रत्ने बसवलेली आहेत. देवळासमोर हत्तीखाना आहे. त्यात संगमरवरी दगडाचे दहा हत्ती आहेत. मधल्या एका हत्तीवर विमलशाचा पुतळा आहे. दुसरे देऊळ वस्तुपाल आणि तेजपाल ह्या दोन राजांनी १२३१ साली बांधले. त्यात जैनांचा बाविसावा तीर्थंकर नेमिनाथ याची मूर्ति आहे. ह्या मूर्तीवरही रत्ने बसवलेली आहेत. या देवळात दोन बाजूंना दोन कोनाडे आहेत. ते ‘दिराणी जेठाणी की अलिया’ म्हणून ओळखले जातात. हे कोनाडे वस्तुपाल आणि तेजपाल ह्या भावांच्या बायकांनी आपल्या स्वतःच्या पैशातून बांधले असे सांगतात. दोन कोनाड्यात ह्या दोघींच्या मूर्ति बसविल्या आहेत. त्यांना प्रत्येकी सव्वा लाख रुपये खर्च आला. त्या काळी राजघराण्यातील का होईना, परंतु स्त्रियांकडे इतका पैसा होता हे ऐकून नवल वाटल्याशिवाय राहत नाही. शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून त्या दोन्ही देवळांचा उल्लेख करावा लागेल. येथील कोरीव काम पाहताना मति गुंग होते.
पबाकीच्या तीन देवळांपैकी एकात चौमुखी मूर्ति आहे. दुसरे शांतिनाथ आणि तिसरे बच्चाशा अशी एकंदर पांच देवळे आहेत. ही देवळे पाहण्यास दुपारी बारा ते संध्याकाळी सहा ह्याच वेळी परवानगी असते. प्रवेशापूर्वी माणशी सव्वा रुपया कर भरावा लागतो. एकदा कर भरला की त्या परवान्यावर पुन्हा ह्या वर्षी केंव्हाही देवळात जाता येते. देवळात कातड्याचा केणताही जिन्नस नेण्यास सक्त मनाई आहे. परंतु फोटो काढण्यास परवानगी आहे.
पदिलवाराच्या मागील बाजूला बालमरस्याचे देऊळ आहे. वाल्मिकीचा बालमरस्या हा मारवाडी अपभ्रंश असावा. ह्या देवळाबद्दल पुढील कथा सांगतात. वाल्मिकी ऋषी येथे राहत असता त्यांचे एका मुलीवर प्रेम बसले. तिच्याबरोबर लग्न करण्याची त्यांना इच्छा झाली. परंतु त्या मुलीच्या आईने एका अटीवर लग्नाला परवानगी देण्याचे कबूल केले. सूर्यास्तापासून पहाटे कोंबडा आरवेपर्यंत डोंगरावरून खाली सपाटीपर्यंत एक उत्तम रस्ता वाल्मिकींनी तयार करावा. ही गोष्ट त्या बाईच्या दृष्टीने अशक्य होती. परंतु वाल्मिकींनी सूर्यास्तापासून कामाला सुरुवात केली. सूर्योदयापूर्वीच रस्त्याचे काम जवळजवळ पुरे होत आलेले पाहून त्या मुलीच्या आईला भीति वाटली व तिने कोंबडा आरवल्याचा आवाज केला. तो आवाज एकताच वाल्मिकी निराश होऊन आपल्या पर्णकुटीत परत गेले. पुन्हा काही वेळाने खरा कोंबडा आरवला. तेंव्हा वाल्मिकींना त्या म्हातारीचे कपट कळून आले. खोट्याची अत्यंत चीड असल्यामुळे वाल्मिकी फार संतापले व त्या मायलेकींना शाप देऊन त्यांना दगड बनवून टाकले. आता तेथे एका लहान देवळात एक मूर्ति आहे तिला कन्वरकन्या (कुवारकन्या) म्हणतात. समोर वाल्मिकींची मूर्ति रागाने कन्वरकन्येच्या मूर्तीकडे पाहत आहे. जवळच दगडांचा एक ढीग आहे. तो त्या आईच्या दगडांचा आहे असे सांगतात. यात्रेकरू येथे आल्यावर आणखी एक दगड त्या ढीगावर टाकतात व खोटे बोलणारी आई म्हणून तिची निर्भर्त्सना करतात.
पदिलवाराच्या पुढे चार मैलांवर अचलगड म्हणून किल्ला आहे. दिलवारा ते अचलगड मोटार सर्व्हिस आहे. पायथ्यापर्यंत मोटार जाते. पायथ्याशी अचलेश्वर महादेवाचे देऊळ आहे. त्याच्या आवारात आणखी पुष्कळ लहान लहान देवळे आहेत. अचलेश्वराच्या पिंडीखाली पाण्याने भरलेले अरुंद भुयार आहे ते पाताळापर्यंत पोचते असे पुजारी दिवा दाखवून सांगतो. देवळाजवळच मंदाकिनी कुंड म्हणून मोठा तलाव आहे. ह्या तलावाच्या काठावर दगडाचे तीन रेडे व एक धनुर्धारी मूर्ति आहे. पूर्वी म्हणे हा तलाव तुपाने भरलेला होता. तेथे तीन राक्षस रेड्यांचे रूप घेऊन रोज तूप चोरून नेण्यास येत. आदिपाल परमार याने त्या तिघांना मारले म्हणून तलावाच्या काठावर त्यांच्या मूर्ति आहेत. देवळाच्या समोरच विटीच्या आकाराचा एक दगड आहे त्याला भीमाची विटी असे म्हणतात. तो दगड इतका जड आहे की भीम कितीही पराक्रमी आणि वज्रदेही असला तरी त्या विटीने तो खेळत असेल ही गोष्ट शक्यच वाटत नाही. तेथून अर्ध्या फर्लांगावर राजा गोपीचंदाचा महाल आहे. बहुतेक सर्व पडीक आहे. शिल्ल्क असलेल्या एका भागावरचे कोरीव काम मात्र पाहाण्यासारखे आहे.
पदेवळाजवळून अचलगडवर जाण्यासाठी चांगला दगडी रस्ता बांधलेला आहे. वर चढून जाण्यास साधारण अर्धा तास लागतो. वरून अबू रोड स्टेशनपर्यंतचा सर्व देखावा दिसतो. वर जैनांचे एक दोन मजली देऊळ आहे. त्यात एकंदर चौदा मूर्ति आहेत. सर्व सोन्याच्या आहेत व त्यांचे एकूण वजन १४४४ मण आहे असे सांगतात. आणखी वर गेल्यावर श्रावण-भाद्रपद नावाचा एक तलाव आहे. थोड्या अंतरावर भर्तृहरीची व मीराबाईची गुंफा आहे व भृगु ऋषींचा आश्रम आहे.
पअचलगडाच्या रस्त्यावर उत्तरेस ओरिया गावापासून तीन मैलावर गुरूशिखर म्हणून एक उंच पहाड आहे. हे अबूच्या पहाडावरील सर्वात उंच स्थान आहे. त्याची उंची समुद्र सपाटी पासून ५६५० फूट आहे. वर जाण्याचा रस्ता अरुंद, वेडावाकडा व रुक्ष आहे. वर शंकराचं एक आणि दत्ताच्या पादुकांचं एक, अशी दोन देवळे आहेत.
पवशिष्ठ आश्रम व गोमुख हे अबू पासून तीन मैलांवर दिलवाराच्या उलट दिशेला आहेत. तीन मैल चालून गेल्यावर हनुमानाचे एक देऊळ लागते, तेथून पायऱ्यांना सुरुवात होते. सुमारे सातशे पायऱ्या उतरून गेल्यावर पाण्याचे एक कुंड लागते. त्यात गोमुखातून पाणी पडते. पाणी थंड व गोड आहे. जवळ वशिष्ठ ऋषींचा आश्रम आहे. त्यात राम-लक्ष्मणांसमवेत वशिष्ठ ऋषींची मूर्ति आहे. वशिष्ठ पत्नी अरुंधती हिची मूर्ति जवळच आहे व त्याचप्रमाणे वशिष्ठांची आवडती गाय नंदिनी हिचीही मूर्ति आहे. गोमुखाच्या पूर्वेस व्यासतीर्थ व इशान्येस नाथतीर्थ आहेत. वशिष्ठाश्रमापासून चार मैलांवर गौतम ऋषींचा आश्रम आहे. तेथे गौतम ऋषी व त्यांची पत्नी अहिल्या यांच्या मूर्ति आहेत. येथे जाण्याचा रस्ता फारच कठीण आहे. तेथे हल्ली लोक जात नाहीत म्हणून आम्हीही गेलो नाही. ह्या संपूर्ण वर्णनावरून तुझ्या एक गोष्ट सहज लक्षात आली असेल, की अबूच्या पहाडावर वाल्मिकी, वशिष्ठ, गौतम, भृगु या महान ऋषींनी केंव्हा ना केंव्हा काही काळ तरी वास्तव्य केलेले होते.
पअबूचा प्रदेश डोंगराळ असल्यामुळे मेठमोठे खडक खूप आहेत. परंतु टोड रॉक आणि नन् रॉक हे विशेष उल्लेखनीय आहेत. टोड ऱॉकचा आकार बेडकासारखा आहे. नन् रॉक राजपुताना क्लबच्या टेनिस कोर्टाजवळ आहे. डोंगरांत निसर्गतःच गुहा असल्यामुळे पुष्कळ साधूंची राहण्याची चांगली सोय झाली आहे. टोड रॉकच्या जवळ रामकुंड म्हणून स्थान आहे व जवळच रामाचे एक देऊळ आहे. रामकुंडात पाणी मात्र मुळीच नाही.
पनक्की तलाव, कोड्रा डॅम, ट्रेव्हर्स तलाव, जयविलास तलाव, व बंडरमिअर टॅंक असे एकंदर पांच तलाव आहेत. नक्की तलाव बाजाराजवळ असून बराच मोठा आहे. त्यात भरपूर पाणी आहे. वारा असेल तेंव्हा चांगल्या लाटा दृष्टीस पडतात. तलावात बोटिंगची उत्तम व्यवस्था असून पोहोण्याची किंवा काही ठिकाणी मासे पकडण्याचीही परवानगी आहे. तलावाच्या सभोवार फिरण्यास चांगला रस्ता केलेला आहे. देवांनी स्वतःच्या नखांनी खोदलेला तलाव म्हणून नक्की (नखकी) तलाव असे नाव पडलेले दिसते. कोड्रा डॅम तलाव सर्व अबूला पिण्याचे पाणी पुरवतो. हा तलाव अर्थातच उंचावर आहे पण तो पाहण्यासारखा आहे. ट्रेव्हर्स तलाव दिलवारा देवळापासून एक मैलावर अचलगडच्या वाटेवर आहे. पिकनिकला ही जागा अगदी योग्य आहे. जयविलास टॅंक हे अलवारच्या महाराजांनी स्वतःच्या बंगल्याजवळ आवारातच बांधले आहे. बंडरमिअर टॅंक काही विशेष मोठे नाही, परंतु त्याच्या काठावर भाजीपाल्याचे मळे आहेत. तेथे ताजा भाजीपाला विकत मिळतो.
पकोणत्याही हवेच्या ठिकाणी न पाहिलेली गोष्ट मला येथे आढळली. अबूच्या पहाडावर प्रथम सिरोही स्टेटची सत्ता होती. १९१७ साली हिंदुस्तान सरकारने ह्या पहाडाचा मुख्य भाग कायम भाडेपट्ट्याने घेतला. त्या भागाची सीमा निश्चित करण्याकरिता व इतर स्थळी सुद्धा मोठ्या पांढऱ्या दगडाचे खांब काळ्या रंगाने आकडे घातलेले आढळतात. प्रत्येक पॉइंटवर असे आकड्याचे खांब असल्यामुळे आपण इच्छित स्थळी पोहोचलो किंवा नाही हे नकाशात नंबर बघून ठरविता येते. प्रत्येक हिल स्टेशनवर ही सुधारणा करण्यासारखी आहे.
पअबूचा पहाड हे थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे राजपुतान्याचा रेसिडेंट उन्हाळ्यात येथेच राहतो. बडोद्याच्या रेसिंडेंटचेही येथेच वास्तव्य असते. राजपुतान्यातील बहुतेक संस्थानिक उन्हाळ्यात इकडेच येतात. अहमदाबाद आणि बडोदा येथील लोकांना हे नजीकचे हवेचे ठिकाण आहे. दक्षिणी लोक इकडे फारच क्वचित नजरेस पडतात. त्या पैकीच आम्ही. तू सोबत असतीस तर प्रवासाला आणखी गम्मत आली असती.
तुझी इंदिरा
५ जून १९५६. महिनाभराची धांदल आटोपून आई, निर्मल आणि मी अखेरीस त्या अवाढव्य जहाजावर चढलो. एस एस आरकेडिया हे नाव आम्ही जन्मात विसरणार नाही. इतर लोकांच्या गर्दीत आम्ही डेकवर उभ्या होतो. खाली धक्क्यावर डॅडी. आमचे गळे दाटलेले, पण एकमेकींना धीर देणाऱ्या आम्हीच. मग आत साठलेले अश्रू बाहेर कसे येऊ द्यायचे? डॅडींची इच्छा पूर्ण करायला आम्ही निघालो होतो. मुलींना उत्तमातलं उत्तम शिक्षण देणं ही त्यांची इच्छा. सोनं नाही, हुंडे नाहीत. मागतील तेवढं शिक्षण. इतक्या वर्षांत डॅडींनी त्यांच्या इंदूला दोनचार दिवसांहून अधिक दिवस माहेरी देखील राहू दिलं नव्हतं ते आता ६००० मैल दूर पाठवत होते. लोकांनी त्यांना मूर्खात काढलं होतं. मुलांच्या शिक्षणावर खर्च करायचा असतो. मुलींच्या नाही. त्यांचे मित्र ग. रा. कामत आम्ही किती तरी मोठ्या झाल्यावर सुद्धा आम्हाला म्हणाले, ‘मूर्ख होता तुमचा बाप.’ डॅडी तर आम्हाला एकट्यांना पाठवायला निघाले होते. आईने ती कल्पना एका शब्दात हाणून पाडली. ना-ही. मग तू जा त्यांच्याबरोबर हे त्यांचं उत्तर यायला एका सेकंदाचाही विलंब झाला नाही.
जहाज निघालं. हळूहळू धक्क्यावरची माणसं लहान होत होत मुंग्यांसारखी दिसू लागली. मग अदृष्य झाली. तेंव्हा आमचे बांध फुटले. पुढचे १५ दिवस आम्ही पत्रांवर जगलो. प्रत्त्येक बंदरात आमचं पत्र जाई आणि डॅडींचं येई. आम्ही शाकाहारी. जेवणाचे तसे हालच. पॉरिज, ब्रेड, बटाटे आणि फळं खाऊन १५ दिवस काढले. अज्ञातात जात होतो. पलीकडे शाश्वत घर आहे एवढी एकच आश्वासक बाब होती. सौ गोडबोले नावाच्या बाई लंडंनहून मुंबईला आल्या असताना आईने त्यांना आमच्यासाठी फ्लॅट शोधण्याची विनंती केली होती. त्या म्हणाल्या होत्या की आम्ही लंडनला पोहोचायच्या सुमारास त्या स्वतः महीनाभर कॉंटिनेंटवर हिंडायला जाणार होत्या. क्लॅपहम नावाच्या लंडनच्या इलाख्यातला त्यांचा फ्लॅट रिकामा असणार होता. अत्त्यंत उदारपणे त्यांनी तो आम्हाला तात्पुरतं राहण्यासाठी देऊ केला. तिथे राहून आमची कायमची जागा शांतपणे आम्ही शोधू शकू अशी त्यांची कल्पना होती. ह्या आश्वासनावर आम्ही लंडन पर्यंतचा प्रवास निश्चिंतपणे केला. गोडबोल्यांच्या जागेत राहून आमचं बस्तान कुठे आणि कसं बसवावं हे पाहायला भरपूर अवधी होता. पण कसलं काय. हे सुखाचं चित्र पुसून तिथे भयावह चित्र उभं राहिलं. त्या घटनेविषयी आईने लिहिलेला लेख तिच्या वहीत आहे त्यातला संबंधित भाग इथे देते.
आमचे जहाज टिलबरी धक्क्याला लागण्या आधी मी आमच्या सहप्रवाशांचा निरोप घेत असताना निर्मल म्हणाली आपण पत्रांच्या ऑफिसात एखादं पत्र आलंय का ते बघुया? मी म्हटलं इथे कोण पाठवणार पत्र? निर्मलला खात्री होती की तिचे डॅडीं इथे सुद्धा नक्की पत्र पाठवतील. म्हणून ती टपालाच्या ऑफिसात गेली आणि आश्चर्य म्हणजे तीन पत्र घेऊन ती माझ्या मागे धावत आली. एक पत्र माझ्या पुतण्याचं, बाळचं होतं. तो बरेच वर्षं इंग्लंडमध्ये होता. पत्रात त्याने आमचं स्वागत केलं होतं. दुसरं पत्र होतं सौ गोडबोले यांचं. ते पत्र नव्हतं. बॉंबगोळा होता. त्यांच्या घरी कोणी पाहुणे येऊन राहीले होते म्हणून त्यांचा फ्लॅट त्या आम्हाला देऊ शकत नव्हत्या. पत्र वाचलं आणि मला वाटलं ह्याच क्षणी आपण मुंबईला परत जावं. पाया खालची जमीनच सरकली होती. पण तिसऱ्या पत्रातून आम्हाला दिलासा मिळाला. ते पत्र होतं सिंधूच्या यजमानांचं, चंद्रकांत मोरे यांचं. त्यात त्यांनी म्हटलं होतं की सहा दिवसांपूर्वी सौ गोडबोलेंनी त्यांना फोन करून त्यांची अडचण कळवली होती आणि आमच्यासाठी फ्लॅट किंवा तात्पुरतं हॉटेल शोधण्याची विनंती केली होती. फ्लॅट शोधायला वेळ फारच कमी होता पण त्यांनी आमची व्यवस्था एका लॉजिंग-बोर्डिंगमध्ये केली होती.
आता एक दुसरी पंचाईत आली होती. आमची प्रवासाची सर्व व्यवस्था थॉमस कुक ह्या एजंसीने केली होती. आम्हाला लंडन मधल्या आमच्या घरी पोहोचवण्या पर्यंतची जबाबदारी त्यांनी घेतली होती. टिलबरी लंडनपासून बऱ्याच अंतरावर आहे. लंडनला जाणाऱ्या प्रवाशांसाठी सेंट पॅनक्रस स्टेशन पर्यंतच्या खास गाड्या असतात. त्यांना बोट ट्रेन म्हणतात. पण एवढं सामान घेऊन आम्ही गाडीने जाणार आणि सेंट पॅनक्रसवरून टॅक्सी करून क्लॅपहमला जाणार हे प्रथमच लंडनला आलेल्या आम्हाला झेपेल असं वाटलं नाही म्हणून मी एजंटला सांगितलं होतं गाडीची तिकिटं न काढता आम्हाला टॅक्सीत बसवून दे. पण मोरेंच्या पत्रात होतं की आम्हाला सेंट पॅनक्रसला उतरवून घ्यायला ते येतील. आता पुन्हा बेत बदलायचा म्हणजे सर्वांचाच गोंधळ झाला असता. म्हणून ठरल्या प्रमाणे टॅक्सीने जाण्याचा निर्णय मी घेतला. एजंट म्हणाला मी टॅक्सीवाल्याला सेंट पॅनक्रसवरून गाडी घ्यायला सांगतो. तिथे तुमच्या नातेवाईकाला तुम्ही पिक अप करा आणि पुढे जा. पण पुढे एक घोका वाढून ठेवला होता. मोरे सेंट पॅनक्रसला बोट ट्रेनवर डोळा ठेऊन असणार. आम्ही रस्त्याने येणार. त्यांची आमची भेट व्हायची कशी? अशा वेळेला, इतर कोणताच मार्ग समोर दिसत नसताना, जे ठरलं आहे तेच करावं आणि काय होतं ते पहावं असा विचार करून आम्ही जहाजावरून उतरण्याच्या वेळेची वाट पहात उभे होतो. आमची उतरण्याची पाळी दुसऱ्या ‘पंगतीत’ होती. घडघडत्या छातीने आम्ही गॅंगवे वरून उतरलो आणि आम्हाला मोठा आणि सुखद धक्का बसला. घक्क्यावर मोरे आमची वाट पाहात होते. आम्हाला चुकामुकीची जी भीति वाटली होती तीच त्यांनाही वाटली. एजंटने टॅक्सी ठरवलेलीच होती. आता तर काय, माहितगार माणूसच आमच्याबरोबर होता. त्यामुळे आम्ही निश्चिंत झालो.
शेवटी आम्ही आमच्या ठिकाणी पोहोचलो. हे भारतीय कुटुंबाने चालवलेलं लॉजिंग-बोर्डिंग होतं. त्यांचं आडनाव गुल्हाने आणि त्यांची ही जागा होती हॅंप्स्टेड नावाच्या ठिकाणी. ते पार लंडनच्या उत्तरेस होतं. आणि टिलबरी लंडनच्या बाहेर दक्षिणेस. त्यामुळे टॅक्सी भाडं ऐकून माझे डोळे फिरले. गोपाळरांवांच्या मेहनतीच्या पैशातले धाडदिशी पांच पौंड देण्याचं धैर्य मला होईना. पण द्यावे तर लागलेच. १९५६ साली पांच पौंड ही खूप मोठी रक्कम होती. त्यानंतर लंडनच्या माझ्या संपूर्ण मुक्कामात मी पुन्हा टॅक्सी केली नाही.
(महिन्यात झालेला पूर्ण खर्च आई डॅडींना कळवत असे. बोटीवरचा खर्च आईने ज्या पत्रातून कळवला त्यात शेवटची रक्क्म ‘पांच पौंड टॅक्सी’ अशी आहे. पुढे कंसात तिचा शेरा आहे, ‘येथे मी माझं डोकं गहाण टाकलं होतं.’ लंडनहून तिने, निर्मलने आणि मी लिहिलेली सर्व पत्र तिने जपून ठेवली होती ती अजून तशीच आहेत. त्यामुळे तिच्या तिथल्या मुक्कामाचा इत्थंभूत इतिहास माझ्या हाताशी आहे.)
आईच्या लंडन मधल्या मुक्कामाचा हा असा श्री गणेशा झाला. धाडसी माणसांपुढे जणू मुद्दामच धाडस दाखवण्याचे प्रसंग रांगेने उभे केले जातात. ते पार करण्यात त्यांना समाधानही असतं. हॅंप्स्टेड येथील आमच्या लॉजिंग-बोर्डिंगमध्ये सकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण भाड्यात अंतर्भूत होतं. दुपारचं जेवण बाहेर. ते आम्हाला महागात पडलं असतं म्हणून एकदोन दिवस आम्ही ब्रेड आणि जॅम खाऊन काढले आणि मग आईने गुल्हाने दांपत्याशी बोलणी केली. त्याचा परिणाम म्हणजे त्यांनी तिला दुपारी स्वयंपाकघर वापरण्याची परवानगी दिली आणि आम्ही ब्रेड-बटर-जॅममधून सुटून पौष्टिक पोळी-भाजी-आमटीचं जेवण जेवू लागलो.
लंडनला आल्या आल्या आईला कामाची चिंता लागली होती. तिने पैसे मिळवावे अशी डॅडींची मुळीच अपेक्षा नव्हती. पण त्यांची पैशाची किती तारांबळ होत होती हे तिला माहीत होतं. ती काटकसर करतच होती पण त्या पलीकडे जाऊन थोडे का होईना आपण पैसे मिळवून त्यांना हातभार लावावा ही तिची स्वतःची प्रबळ इच्छा होती.
इथे दोन गोष्टी नमूद करायला हव्या. डॅडींची मुंबईची व्यवस्था आईने नलू मावशीला आमच्या फ्लॅटमघ्ये सह कुटुंब सह परिवार येऊन राहण्याची विनंती करून केली होती. नलू मावशीचे यजमान, बापूराव पाटणकर, अत्यंत सज्जन गृहस्थ होते. त्यांचं संपूर्ण कुटुंबच तसं होतं. आम्ही रविवारचे अनेकदा त्यांच्याकडे कुर्ल्याला जात असू. बापूराव ह्या योजनेस राजी झाले म्हणून बरं झालं. शिवाजी पार्क ही सोयीची जागा होती. नलू मावशी ह्या घरी अनेक वर्ष राहिली होती त्यामुळे तिला इथली सवय होती. आम्हां बहीणींसांठी पार्टिशन घालून तयार केलेल्या लहान खोलीत डॅडी राहू लागले होते. डॅडींची जेवणा खाण्याची व्यवस्था उत्तम झाली होती पण ते कौटुंबिक जीवनाला आणि मित्र-मंडळींच्या येण्या-जाण्याला मुकले होते. दुसरी आणि त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला इंग्लंडला पाठवण्याचे बेत चालू असतानाच डॅडींनी एका तात्विक कारणावरून टाइम्स ऑफ इंडियातली नोकरी सोडली होती. काही महिन्यांनी त्यांना टेल्को मध्ये नोकरी मिळाली खरी पण ती करण्यात त्यांना मानसिक समाधान नव्हतं आणि सतत जमशेदपूरला जावं लागे त्याची त्यांना दगदग होत होती. आमच्या शिक्षणासाठी त्यांची किती प्रकारांनी फरफट होत होती ह्याविषयी त्यांनी एक शब्दही कधी पत्रात लिहिला नाही. पण आईच्या पैसे मिळवण्याच्या तगमगीवरून हे मला कळत होतं. लवकरच आईला गुल्हान्यांकडे घरचंच काम मिळालं. त्यांच्या होटेलची थोडीफार व्यवस्था बघणं आणि तिथला हिशेब ठेवणं ह्या कामाचे ते तिला आठवड्याचे २ पौंड देऊ लागले. हिशेब ठेवण्याचं काम तिने नानांसाठी कैक वर्ष केलं होतं. तो तिच्या डाव्या हाताचा खेळ होता.
आम्हाला स्वतःचा फ्लॅट मिळायला तब्बल एक महिना लागला. उघड उघड नाही तरी सुप्त स्वरुपात लंडनमध्ये वंशवाद होता. एका अर्थाने आपल्याकडे जसे आपल्याच समाजाचे, आपल्याच जातीचे, आपल्याच सारखं जेवण जेवणारे लोक आपल्या हाउसिंग सोसायटीत हवे असतात, तोच प्रकार तिथेही. फरक एवढाच की आपण आपल्याच वंशातल्या माणसांना बाजूला करतो तर तिथे परकीय वंशातल्या. त्यामुळे एखाद्या फ्लॅटची जाहिरात दिलेली असायची पण तो पहायला आम्ही गेलो की अचानक तो नुकताच कोणी तरी घेतलेला असायचा. शिवाय आमच्याही काही मागण्या होत्या. आम्हाला आमच्या शाळेजवळ जागा हवी होती. आठवड्याचं साडेचार पौंडाहून अधिक भाडं असलेली जागा नको होती. शेवटी मिसेस न्यूविट नावाच्या दक्षिण आफ्रिकेतून स्थलांतरित झालेल्या विधवा बाईंच्या घरात आम्हाला पहिल्या मजल्यावरचा फ्लॅट मिळाला. मिसेस न्यूविट आणि त्यांचा मुलगा पीटर तळ मजल्यावर राहत होते. आमच्या वरच्या मजल्यावर न्यू झीलंडच्या दोन मुली, जीन आणि रसेल राहत होत्या. काही दिवसातच आईने ह्या तिन्ही बायकांशी गट्टी केली. निर्मलने जीनशी आणि आळीतल्या अनेक मुलींशी मैत्री केली. मी मात्र घरकोंबडी, भिडस्त आणि वाचनात गर्क. आमच्या हॉल-किचन फ्लॅटचं भाडं ४ पौंड १० शिलिंग आठवडा होतं. त्यात काहीं गैरसोयी होत्या. फ्लॅट दोघांसाठी असल्या कारणाने लॅंडलेडीने दोन सिंगल बेड पुरवले होते. आईने विनंती केल्यावर अनेक दिवसांनी मिसेस न्युविटने एक सिंगल बेडच्या जागी डबल बेड दिला. तोवर मला वाटतं आमच्या दोघींपैकी कोणी तरी सोफ्यावर झोपत असावं. नंतर आई सिंगलवर झोपू लागली आणि आम्ही दोधी डबलवर. त्या पलंगाला मध्ये झूल होती त्यामुळे सकाळपर्यंत आम्ही काठावरून घरंगळत मध्यभागी आलेल्या असू. त्या फ्लॅट मध्ये दुसरी मोठी गैरसोय होती. स्वयंपाकघरातल्या नळाला गरम पाणी नसायचं. थंड पाण्यात भांडी घासणं म्हणजे हात गारठून बर्फ होणं. खालच्या बाथरूम मध्ये २४ तास गरम पाणी असायचं. तिथून लागेल तेंव्हा आम्हाला वरती आणायला लागत असे.
आम्ही लंडनला पोहोचलो त्यानंतर बरोबर दोन महिन्यांनी, म्हणजे १९ सप्टेंबरला आमची शाळा सुरू झाली. शाळेच्या युनिफॉर्मचा —कोट, टोपी, बूट --यांचा खर्च मोठा होता. त्या कपड्यांचं डॅनिएल नील हे अधिकृत दुकान होतं. पण सेकंड हॅंडमध्ये जितके कपडे मिळतील तितके घेण्याचा आईचा प्रयत्न होता. त्याविषयी आईने डॅडींना लिहिलेल्या पत्रात केलेला खुलासा पुढील प्रमाणे:
“तुम्ही म्हणता मी सेकंड हॅंड कपड्यांबद्दल काय सारखं लिहिते म्हणून. पण ती लहान गोष्ट नाही. एकच उदाहरण देते. निर्मलच्या विंटर कोटला डॅनिएल नीलमध्ये ११ पौंड काही शिलिंग पडले तर ताईच्या सेकंड हॅंड कोटला २ पौंड पडले. तसंच निर्मलचा नवा रेनकोट ३ll पौंडाचा तर ताईचा सेकंड हॅंड १ll पौंडाचा. तुम्हाला अशा गोष्टी ऐकण्याचा नेहमी कंटाळा येतो माहीत आहे. पण आता ऐकावं लागणार. करता काय!” आई आणि डॅडी यांच्यात असलेल्या अनेक पदरी नात्यात असा खेळकरपणाही होता.
आमची शाळा सुरू झाली त्या आधी आईने एका तयार कपड्यांच्या कारखान्यात तीन दिवस आठवड्याला ४ पौंड देणारी नोकरी केली. आम्ही तिला घरकामात कितीही मदत केली तरी मुख्य भार तिच्यावरच होता. शाळेने मला आणि निर्मलला पुस्तकांच्या लांब लचक याद्या पाठवल्या होत्या. शाळा सुरू होण्या आधी त्यातली जमतील तितकी पुस्तकं वाचायची होती. घर काम आणि बाहेरची, म्हणजे बॅंकेची, शाळेची, खरेदीची कामं सांभाळून आईला आठ तासाची नोकरी करणं झेपण्यासारखं नव्हतं. शेवटी तिने ठरवलं आपल्याला घर बसल्या शिवणाचं काम करता आलं तर तेच करावं. तसं काम मिळू शकेल ही माहिती तिने आधीच मिळवली होती. पण घरी मशीन नाही. पैसे मिळवायचे तर तेवढी गुंतवणूक करणं गरजेचं होतं. डॅडी म्हणाले ३५ पौंडापर्यंत मिळत असेल तर मशीन घेऊन टाक. तेवढी किंमत त्यांच्या हिशेबात बसत होती. पण तितक्या किमतीत मशीन मिळत नव्हतं. म्हणून आईने ४८ पौंडाचं सिंगर घेतलं. वरचे १३ पौंड ३ आठवड्यात कमावून ती बॅंकेत टाकणार होती. अशा प्रकारे शेवटी तिचं शिवणाचं नियमित काम सुरू झालं. मोरे काकांच्या ओळखीच्या मिसेस मॉरिस ह्या बाई लहान मुलींचे एका विशिष्ट पॅटर्नचे गरम कपड्याचे फ्रॉक दुकानांना पुरवत असत. ते फ्रॉक आईकडे मुरूड घालायला आणि पॅचवर्क करायला येऊ लागले. आठवड्यातून दोन वेळा आई मिसेस सॉरिसकडे तयार झालेले कपडे द्यायला आणि नवीन कपडे आणायला जात असे. त्या कामाचे तिला आठवड्याला ४ पौंड मिळू लागले. डॅडींना लिहिलेल्या एका पत्रात तिने लिहिलंय की मिसेस मॉरिस तिला ३० पौंडाचं देखील काम देऊ शकेल “पण तितकं काम कारायची माझ्यात ताकद नाही. तुमच्या बायकोची तब्बेत तशी नाजुकच आहे.”
अशा नाजुक तब्बेतीच्या बाईने काय काय प्रताप केले ह्याचा मासला ता ४ सप्टेंबर १९५६ रोजी लिहिलेल्या पत्रात आहे:
“मागच्या सोमवारी इकडे सारखा पाऊस पडत होता व साधारण दुपारी एकाच्या सुमारास खग्रास ग्रहण लागल्यावर जसा मिट्ट काळोख होतो तसा पांच मिनिटं झाला होता. त्या वेळी मी नेमकी बस स्टॅंडवर होते. सोमवारी मी माझं तयार काम नेऊन देते आणि नवीन काम घेऊन येते. मी घरातून साधारण ९.३० ते १०च्या दर्म्यान निघते व एकच्या सुमारास लंचला परत येते. सोमवारी मी ज्या वेळी घरून निघाले त्या वेळी पाऊस झिमझिम पडत होता. नंतर वाढला तो इतका की येताना अर्ध्या वाटेत पाणी भरलं म्हणून बस पुढे जाऊ शकली नाही. मला खाली उतरून बरंच चालत जावं लागलं. जवळपास स्टेशन नसल्याने गाडीने येऊ शकले नाही. दुसऱ्या बस स्टॅंडवर जाऊन उभी राहिले. साडी पूर्ण भिजली होती. हातातले कपडे मात्र छत्रीखाली जितके धरता येतील तितके धरले. त्यामुळे ते कोरडे राहिले. मी मात्र हाडापर्यंत भिजले. अंगात इतकी थंडी भरली की दुसरी बस आली तेव्हां मला वर चढवेना. कोणी तरी मला हात देऊन मदत केली. मला त्या दिवशी घरी पोहोचायला ३ वाजले. त्याच रात्री वरतून काहीतरी मोठं पडल्याचा आवाज आला. आम्ही तिघी धावत वर गेलो. जीन आणि रसेल स्वयंपाकघरात एकाच वेळी किंचाळत आणि हसत उभ्या होत्या. त्यांच्या सीलिंगचा ३ फुट रुंदीचा भाग कोसळला होता.” म्हणजे हाडा पर्यंत भिजलेली नाजुक तब्बेतीची बाई इतरांवर आपत्ती काय आली बघायला धावली.
आई लोकांकडे फारशी जात नसे. घरकाम आणि शिवणकाम ह्यातच तिचा बराचसा वेळ जायचा. पैसे वाचवणं हेही महत्त्वाचं काम होतं. इकडे तिकडे हिंडून ते वाया घालवायचे नाहीत हे तिने पक्कं ठरवलं होतं. माझ्या एका पत्राचा शेवट मी असा केला आहे: “आईचा सध्याचा दिनक्रम साधा पण रोचक आहे. ती सकाळी उठून शिवण करते. मग थोडा वेळ शिवते. दुपार झाली की शिवायला बसते आणि शिवणाचा कंटाळा आला की विरंगुळा म्हणून शिवण करते.” शिवणकामातून सुरुवातीस मिळालेले पैसे डॅडींनी मशीनसाठी मंजूर केलेल्या रकमेत घालून आईने स्वतःचं नैतिक समाधान करून घेतलं. मजा अशी की आम्ही लंडनला आलो आहोत तर इथे जितक्या गोष्टी करता-शिकता येतील तितक्या आम्ही कराव्या असा डॅडींचा आग्रह असायचा. पण डॅडी आम्हाला किती पैसे पाठवू शकत होते आणि पुढे करावे लागणारे मोठे खर्च कोणते आणि किती होते ह्या संदर्भात इतर गोष्टींवर एक शिलिंग देखील खर्च करताना आईला विचार करावा लागत असे. मशीनचा हिशेब चुकता झाल्यावरच तिच्या अनेक दिवस मनात असलेली गोष्ट तिने केली. तिने बेकिंगचा क्लास जॉइन केला. तिथे शिकवलेल्या पाक कृतींची तिने जपून ठेवलेली वही ह्या क्षणी माझ्या समोर आहे. कॉफी नट केक, जॅम पफ्स, हॉट क्रॉस बन्स, डोनट्स, फ्रूट फ्लॅन अशा अनेक पाक कृती त्यात लिहिलेल्या आहेत. सुरुवातीच्या कृतींमध्ये काही स्टेप्सचे फक्त नंबर आहेत. पुढे कृती नाही. ह्याचं कारण शिक्षिका इंग्रजी भरभर बोलायची. तिचं बोलणं कळून त्याची आई नोंद करे पर्यंत ती पुढची स्टेप सांगत असायची. नंतरच्या पाककृती मात्र पूर्ण लिहिलेल्या आहेत. तोपर्यंत आईला तिथल्या लोकांच्या बोलण्याच्या पद्धतीचा आणि वेगाचा सराव झाला होता. बेकिंग क्लासमध्ये तिला एक गोष्ट खटकत असे. “मिक्सिंग बोलमधून जिन्नस बेकिंग डिश मध्ये ओतला की बोलला लागलेलं सगळं तसंच सरळ सिंकमध्ये जातं.” काही दिवस तिने हा प्रकार सहन केला. मग म्हणाली, “बाईचा डोळा चुकवून मी बोटांनी सगळं निपटून घेते आणि बेकिंग डिशमध्ये घालते.” तो महीना-दीड महीना आमची चैन होती. आठवड्यातून दोन तीन वेळा संध्याकाळी शाळेतून आल्यावर बशीत नवा पदार्थ असायचा.
लंडनमध्ये आईच्या ओळखी होत होत्या. आम्ही महाराष्ट्र मंडळाच्या दोन-चार कार्यक्रमांना गेलो. मी गणेशोत्सवाच्या निमित्ताने होणाऱ्या वार्षिक नाटकात काम केलं. त्या वर्षी आचार्य अत्र्यांचं सांष्टांग नमस्कार हे नाटक केलं होतं. त्यात मीरेची भूमिका मी केली होती. माझ्या वडीलांचं काम श्री रामराव तडकोड यांनी केलं होतं आणि तिच्या आईचं कुसुमताई पंडित यांनी. माझ्या भावाची, म्हणजे चंदूची भूमिका त्या वयाचा मुलगा न मिळाल्याने तडकोडांच्या मुलीने, मेधाने केली होती. त्या निमित्ताने तडकोड कुटुंबाशी आणि कुसुमताईं पंडितांशी आईची मैत्री झाली. आमच्या सर्वात मोठ्या काकांचा, दादासाहेबांचा मुलगा, ज्याला आम्ही बाळ भाऊ म्हणायचो, तो तिथे होता. सिंधू मावशी-मोरे काका होते. डॅडींचे जानी दोस्त मिलओनर्स असोसिएशनचे लेबर ऑफिसर आर जी. गोखले यांचा मुलगा शशी होता. डहाणूच्या करंदीकरांपैकी बापू करंदीकर आणि त्यांची बायको होते. आम्ही ज्यांच्या घरी राहणार होतो त्या मिसेस गोडबोले होत्या. शिवाय गुल्हाने मंडळी. अशा अनेकांशी आमचे निकटचे संबंध जुळून आले होते.
आईला इंग्रजीबद्दल न्यून गंड होता. त्याचा ती कसून सामना करीत होती. हळूहळू त्याचे परिणाम दिसू लागले. एक परिणाम म्हणजे अधून मधून तिच्या पत्रांची सुरुवात “प्रिय गोपाळराव” अशी न होता “Dear Gopalrao” अशी होऊ लागली. हाती भरपूर वेळ असला तरच ती ईंग्रजीत पत्र लिहित असे. प्रथम कच्चा खर्डा, त्यावरून मी नजर फिरवली की मग सुंदर अक्षरात पक्का खर्डा. नोव्हेंबर १९५६च्या मध्यावर तिने आणि मी लिहिलेल्या जोड पत्रात घरात चाललेल्या चर्चांची माहिती होती. निर्मल लंडनला अस्वस्थ होती. तिचा अभ्यास उत्तम चालला होता, शाळेच्या सुरुवातीस मैत्रिणी देखील खूप झाल्या होत्या, पण लंडन मध्ये तिला ‘जल बिना मच्छली’ सारखं वाटू लागलं होतं. तिला ताबडतोब मुंबईला परत जायचं होतं. तिथे तिचा विजय क्लब होता, रोज संध्याकाळचे खोखो, लंगडी हे खेळ होते. तिथे आमची गल्ली म्हणजे आमचंच विस्तारित घर आणि गल्लीतली माणसं म्हणजे आमचंच विस्तारित कुटुंब ह्याची जी उब वाटत असे ती तिला ह्या थंड प्रदेशात आणि तितक्याच थंड लोकांच्यात कुठे मिळायला? माझ्या पत्रात मी डॅडींना अनेक मुद्द्यांची यादी करून पटवून देण्याचा प्रयत्न केला की त्यांनी तिला जॅनेवारीत परत बोलावून घ्यावं. पत्रात आईने लिहिलेल्या भागात दहाच ओळी आहेत. त्यांचा गोषवारा आहे, शांताने लिहिलेल्या पत्राचा शांतपणे विचार करा आणि ह्याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कळवा.
डॅडींनी काय विचार केला त्याबद्दलचं त्यांचं पत्र संग्रहात नाही. आमची पत्र त्यांनी जपून ठेवली होती. नंतर आम्ही लिहिलेली पत्र आईने जपून ठेवली होती. पण मी निर्बुद्ध. विमानाने कायमची परत येत असताना मर्यादित वजनाचं सामान आणता येतं म्हणून सामान तोलून मापून शेवटी मागे ठेवाव्या लागल्या गोष्टींमध्ये सहा वर्ष मुंबईहून दर आठवड्याला न चुकता आलेल्या पत्रांचा गठ्ठा होता. ह्याबद्दल मी स्वतःला किती शिव्या दिल्या असतील त्याला सुमार नाही. असो. मराठीतला ‘असो’ हा शब्द खूप सोयीचा आहे. असो म्हटलं की मागची गोष्ट मागे सोडून पुढे जाता येतं. डॅडींनी पत्रात काय लिहिलं होतं ते प्रत्यक्ष डोळ्यांसमोर नसलं तरी त्या पत्राला आईने, मी आणि निर्मलने दिलेल्या उत्तरांतून सहज ओळखता येतं. थोडक्यात जी. सी. ई.ची परीक्षा देऊन ये हा त्यांचा सल्ला होता. जी. सी. ई म्हणजे आपल्या एस एस सी च्या बरोबरची तिथली परीक्षा. निर्मलने ते लगेच मान्य केलं. बेत असा होता की परीक्षा देऊन निर्मल परत गेली की तिला सरळ कॉलेज मध्ये प्रवेश मिळेल. दोन वर्षांची उडी घेऊन मी इथे सांगून टाकते की तसं झालं नाही. तिने जी सी ई मध्ये कोणते विषय घेतले की कॉलेजसाठी ती पात्र होईल ह्याविषयी डॅडींनी केलेल्या चौकशीत काही तरी गोंधळ झाला. त्यांना चुकीची कल्पना देण्यात आली. निर्मल परत गेल्यावर तिला आणि आम्हां सर्वानाच मोठा धक्का बसला. तिने जो एक विषय अधिक घ्यायला हवा होता तो तिने घेतला नव्हता. तो घेऊन तिला पुन्हा एस एस सी करावं लागलं आणि मग कॉलेजात प्रवेश मिळाला. ही १९५८ सालची गोष्ट. निर्मलची मानसिक अवस्था काय झाली असेल ती आपण ओळखू शकतो.
आता गाडी रिव्हर्स गिअर मध्ये टाकून आपण होतो तिथे परत जाऊ.
आम्हाला लंडनला येऊन सहा महिने झाले होते. मी तिथल्या जीवनात रुळले होते. निर्मलने आणखी दीड वर्ष राहण्याचं कबूल केलं होतं. पण तिकडे मुंबईला डॅडींना एकटेपण खायला येऊ लागलं होतं. इकडे आईच्या जीवाची तगमग होत होती. मी दोघांनाही आश्वासन देत होते की आई मुंबईला परत गेली आणि निर्मलसुद्धा गेली तरी मी आनंदाने एकटी राहीन. माझी भीड, लाजरेपणा, मुखदुर्बलपणा सर्व गळून पडलं होतं. मी १७ वर्षांची जबाबदार बाई झाले होते असं त्या काळातल्या माझ्या पत्रांवरून लक्षात येतं. जॅनेवारी १९५७पर्यंत बेत पक्का झाला. आईने मे-जूनच्या सुमारास मुंबईला परत जायचं. तो पर्यंत आमची राहण्याची व्यवस्था करायची. आमचा जम बसतोय की नाही ते बघायचं आणि मग परतीचा बेत नक्की करायचा. ह्या बेतात एक अडचण होती. आमच्या शाळेचा नियम होता की मुली आपल्या आई वडीलांकडे तरी राहत असाव्या किंवा त्यांचं पालकत्व करणारं जबाबदार माणूस नेमलं जावं. ह्यासाठी आईने आमच्या हेड मिस्ट्रेसची भेट घेतली. पालक म्हणून आपण श्री आणि सौ तडकोडांना नेमलं आहे असं त्यांना सांगितलं. त्यांची संपूर्ण माहिती दिली. तडकोड काका भारत सरकारच्या एका ऑफिसात काम करत होते. त्यामुळे शाळेच्या बोर्डाची त्यांच्या पात्रतेविषयी खात्री पटली आणि त्यांनी ही व्यवस्था मंजूर केली. त्या नंतरच आईच्या परतीची बोलणी सुरू होऊ शकली.
पुढचे सहा महिने आई आणि डॅडी दोघांचे उत्साहात गेले. त्यांचा लवकरच वनवास संपायचा होता. आई म्हणत होती मी गोपाळरावना सोडून पुन्हा कधीही कुठेही जाणार नाही. लंडनच्या उरलेल्या ह्या सहा महीन्यांत आईने शिवणाचं काम चालू ठेवलं. तिला पैसे मिळवून मुंबईला काही वस्तू घेऊन जायच्या होत्या -– लहान अव्हन (जे अजून घरी आहे), अव्हनमध्ये पदार्थ बनवण्यासाठी योग्य असे पायरेक्सचे वाडगे, आणि शिवणाचं सामान. पाहुण्यांची ये-जा चालू होतीच. तिला राइस क्रिस्पीज नावाच्या सीरियलचा शोध लागला होता. त्याची ती उत्तम भेळ करीत असे. ती आमच्यासाठी तर करायचीच पण मुंबईच्या आठवणी काढणाऱ्या तिथल्या लोकांनाही करून घालायची. शिवाय आमच्या मास्तरणींना घरी चहासाठी बोलावून त्यांना साबुदाण्याचे वडे वगैरे आपले पदार्थ करून घालत असे. बाळ भाऊ अनेकदा आमच्याकडे यायचा. तिथे शिकत असलेल्या कुसुमताई पंडीत यांच्या हुषार भाचीशी आईने त्याचं लग्न जुळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी घरी चहापाणी झालं. पण लग्न काही जमलं नाही. मुलीचे पुढच्या शिक्षणाचे बेत ठरले होते आणि बाळ भाऊ एका जर्मन बाईच्या प्रेमात पडला होता. मध्येच सिंधू मावशीला हॉस्पिटल मध्ये ठेवण्याची पाळी आली. तिची दोन अडीच वर्षांची मुलगी अंजू आमच्याकडे राहायला आली. निर्मल तिचं खूप करत असे. मुंबईहून हिंडायला आलेल्या लोकांची वर्दळही असायची.
दिवस भराभर जात होते. एप्रिल महिना उजाडला. आम्हाला शाळेजवळ ऍकटनला जॉर्ज आणि नेली डीन नावाच्या दांपत्याच्या घरी बेड-ब्रेकफास्ट-डिनरच्या बोलीवर जागा मिळाली. महाराष्ट्र मंडळाने केलेल्या आचार्य अत्रेंच्या सांष्टांग नमस्कार नाटकात कला बोडस नावाच्या तरूण बाईने त्रिपुरीची भूमिका केली होती. नाटकातल्या इतरांशी आईची जशी मैत्री झाली तशी कलाबरोबर झाली. डीन कुटुंबाशी तिचा कसा तो माहित नाही पण परिचय होता. तिच्या ओळखीने आम्ही त्याच्या २२, ब्रॉमयार्ड ऍव्हन्यू ह्या घरी पोहोचलो आणि आम्हाला ती जागा मिळाली. एप्रिलच्या अखेरीस आम्ही शेपर्ड्ज बुश इथला कनिंगहॅम रोड वरचा फ्लॅट सोडला. एका टुमदार सुंदर सजवलेल्या खोलीत आम्ही दोघी राहायला गेलो. आईने आपलं बस्तान मादाम मुरो ह्या फ्रेंच बाईने चालवलेल्या लॉजिंग-बोर्डिंगमध्ये हलवलं. तिथे कुलकर्णी नावाचे अत्यंत सभ्य मध्य वयीन गृहस्थ अनेक वर्ष राहत होते. त्यांनी तिची मादाम मुरोकडे शिफारस केली आणि आईला खोली मिळाली. कुलकर्णी, ज्यांना आम्ही कु काका म्हणायचो, त्यांनी देखील आमचं पालकत्व केलं.
मेचा संपूर्ण महिना रोज संध्याकाळी आई आमच्याकडे किंवा आम्ही तिच्याकडे जाऊ लागलो. आमची शाळा चालूच होती. इंग्लंड मध्ये उन्हाळ्याची सुट्टी जुलै-ऑगस्टमध्ये असते. आमचं राहणं, खाणं, शाळा सर्व सुरळीत चाललेलं पाहून आई निश्चिंत झाली. मुंबईला परतण्याच्या तयारीला लागली. १ जूनचं एअर इंडियाचं तिकीट बुक झालं. तिच्या मैत्रिणी म्हणू लागल्या परत का जाताय? गोखल्यांनाच इकडे बोलवून घ्या ना. बापू करंदीकरांनी आईला विचारलं तुम्ही सुनिताला तुमच्या बरोबर घेऊन जाल का? तिचे आजोबा तिला उतरवायला येतील. सुनिता त्यांची ७-८ वर्षांची मुलगी. आई अर्थातच हो म्हणाली. एअरपोर्ट वर काढलेल्या तिच्या फोटोत तिच्या शेजारी सुनिता आहे.
१ जून उजाडला. त्याच्या आदले दिवशी आणि त्या दिवशी काय झालं कसं झालं त्याचं वर्णन ३०-३१ मे आणि २ जूनला मी डॅडींना लिहिलेल्या पत्रात केलं आहे. त्यातले मुख्य भाग मी इथे देत आहे. मी १७ वर्षांची होते आणि निर्मल नुकतीच १६ वर्षांची झाली होती. “३० मे -- आज संध्याकाळी आई आमच्या खोलीवर आली होती. तिचं पॅकिंग पूर्ण झालं होतं. एकमेकींशी काय बोलावं आम्हाला कळत नव्हतं. आमच्या डोळ्यांसमोर मुंबई होती. मधूनच तुम्ही दोघं भेटल्यावर जो आनंद होणार होता त्याची कल्पना करून आम्हाला हास्याच्या उकळ्या फुटत होत्या. आईने आमचे पासपोर्ट आणि चेक बुक माझ्या स्वाधीन केलं. मी आयुष्यातला पहिला चेक मिसेस डीनच्या नावाने लिहिला आणि मोठी झाल्याचा अनुभव घेतला.
उद्या आईला निरोप द्यायला बरीच गर्दी होणार आहे असं वाटतंय. शशी येऊ शकणार नाही. पण तो आईला भेटून गेला तेंव्हा रडकुंडीस आला होता.”
“३१ मे – आज संध्याकाळी आम्ही आईकडे गेलो होतो. तिने आमच्यासाठी पुरी-भाजी केली होती. आमचे खूप लाड केले. मला मांडीवर झोपू दिलं.”
“१ जून – मुंबईच्या उन्हासाठी लंडनने आधीच आईची तयारी केली आहे. गेले तीन-चार दिवस खूप उकडत आहे. आई कस्टम्स मधून बाहेर येण्याची आम्ही वाट बघत होतो तेंव्हा मी चक्क वारा घेत होते आणि घाम पुसत होते. आज सकाळी आम्ही ६ वाजता उठलो आणि आईकडे ७.३०च्या सुमारास पोहोचलो. आम्ही तिथेच ब्रेकफास्ट केला. नंतर गप्पा मारत बसलो. पण घड्याळाचा काटा चाललाच होता. निघण्याची वेळ आली. मादाम मुरो रडू लागली. मला इच्छा शक्तीचा खूप वापर करावा लागला तेंव्हा आलेलं रडू मागे फिरलं. रडायचं नाही असा मी निश्चय केला होता. आईला जाताना वाईट वाटता कामा नये. कु काका, निर्मल आणि मी ट्यूब, बस, गाडी असा प्रवास करत एअरपोर्टला पोहोचलो. आई एअरलाईनच्या बसने आली. कुसुमताई पंडित आणि सौ व श्री तडकोड आले होते. AIR Flight 110ची घोषणा झाली. आई सर्वांचा निरोप घेऊ लागली. आम्हाला तिने लांबूनच हात केला. जवळ आली असती तर बांध फुटले असते. विमानाकडे चालत जात असताना आम्ही तिला बघितलं आणि मग ती विमानाच्या पोटात अदृष्य झाली. आईचं लंडनचं पर्व संपलं तेंव्हा ती ४४ वर्षांची होती आणि डॅडी ४८ वर्ष वयाचे.”
इंग्लंडहून परत आल्यावर आईने शिवणाचा क्लास सुरू केला. त्या आधी तिने पद्धतशीर परीक्षा देऊन झारापकरांचा डिप्लोमा घेतला होता. इतरांच्या मानाने ती फी कमी लावत असे कारण शिवण शिकवण्या मागचा तिचा हेतू केवळ पैसे मिळवणं किंवा आपल्या हातच्या कलेचा उपयोग करणं एवढा सीमित नसून, मध्यम वर्गातल्या बायकांना निदान स्वतःचे ब्लाऊज शिवण्या पुरेसं तरी स्वतंत्र करणं हाही होता. तिच्याकडे अनेक जणी ब्लाउज व्यतिरिक्त शिवणाचे इतर प्रकारही शिकून गेल्या. तिने स्वतः विकसित केलेला एक प्रकार सर्वांचा आवडता होता. त्याला ती पिनी म्हणत असे. हे लहान मुलांचं अंगातलं कापण्याची अशी काही खुबी होती की त्याला कुठेही बटण किंवा बंध लावण्याची गरज भासत नसे. खांद्यावर एक शिवण मारली की झालं. सरळ गळ्यातून घालायचं. आईच्या किती शिष्यांनी किती बाळंतविड्यांवर ही पिनी दिली असेल त्याची गणना नाही.
आई घरी शिवणाचा क्लास चालवू लागली तसाच, केवळ सामाज कार्य म्हणून, ती रिझर्व्ह बॅंकेतल्या प्यूनच्या बायकांना जवळच्या त्यांच्या कॉलनीत जाऊन सुद्धा शिकवू लागली. हे काम अर्थातच ती एक पैसाही फी न घेता करीत असे. तिच्या हाडातच समाज कार्य होतं. ह्या ना त्या रूपाने ती ते शेवट पर्यंत करत राहिली.
पुन्हा एकदा मी हळहळते आहे. १९५७ ते १९६५ ह्या काळातल्या १९६२ जुलै पर्यंतच्या पांच वर्षात नियमित दर आठवड्याला आईने आणि डॅडींनी प्रथम आम्हां दोघींना आणि नंतर मला एकटीला लिहिलेली जवळ जवळ २५० पत्र माझ्या संग्रही नाहीत. ह्या दरम्यान मी मार्च ते सप्टेंबर १९५९ शाळा संपून कॉलेज सुरू व्हायच्या मधल्या काळात मुंबईला येऊन गेले. ते सहा महीने कसे गेले कळलं नाही. एक आठवण मात्र आहे. ती ह्या सहा महीन्यातली की मी कायमची परत आले तेंव्हाची नक्की सांगू शकत नाही. पण आईच्या कर्तबगारीची आणि आत्मविश्वासाची झलक त्यात दिसते. आईचा शिवणाचा क्लास सकाळी सुरू व्हायचा तो संध्याकाळी संपायचा. प्रत्येक मुलीला जी वेळ दिलेली असायची त्या वेळी तिने यायचं आणि आईने तिला अर्धा तास शिकवायचं अशी क्लासची पद्धत होती. सब घोडे बारा टक्के असा सर्वांसाठी एक कोर्स तिने आखला नव्हता. नवशिकी असेल तर तिला मशीन कसं चालवायचं इथपासून ती शिकवत असे. बहुसंख्य बायकांनी थोडंफार शिवण केलेलं असायचं. त्यांना जो कपडा शिकायचा असेल तो ती शिकवायची. मापं घेणं, मापाचा कागद कापणं, त्यातल्या शिलाईच्या खुब्या सांगणं, करवून घेणं हे सारं दोन तीन धड्यात व्हायचं. मग पुढचा कपडा. दिवसातला मधला वेळ तिने जेवणासाठी राखलेला असायचा. जेवण झालं की दुपारचं सत्र सुरू. तिच्या शिवणासाठी डॅडींनी सुताराकडून लांबलचक टेबल बनवून घेतलं होतं. त्यावर परकर-पायजम्याचं कापड सुद्धा पसरता येत असे. सांगायची गोष्ट अशी की ह्या काळात कधी तरी आमचे सर्वात मोठे काका, दादासाहेब, आमच्याकडे काही दिवस राहायला आले हाते. त्यांचं बॉंबे हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन व्हायचं होतं. रात्रीच्या जेवणाला डॅडी असायचे. पण दुपारी दादासाहेब घरी एकटेच असायचे. ते असताना आईने तिच्या शिकवण्यांचं वेळापत्रक असं आखलं होतं की दादासाहेबांच्या जेवणाच्या वेळेला ती मोकळी असायची. त्यांना ती वाढायची. त्यांच्या सोबत बसायची. त्यांचं जेवण होऊन ते विश्रांती घ्यायला जात तोपर्यंत तिच्या पुढच्या शिकवणीची बाई आलेली असायची. असं असूनही दादासाहेबांच्या मनात तिच्या क्लासचा राग होता. एक दिवशी ते तिला म्हणाले, “इंदिराबाई तुम्ही हा सगळा पसारा कशाला घालता? मग घरात लक्ष राहत नाही.” आईला मनातून काय वाटलं असेल ते असेल. पण त्यांना ती म्हणाली, “घराकडे पूर्ण लक्ष देऊनच मी हे काम करत्येय. तुम्हाला काही कमी पडत असेल तर जरूर सांगा, मी उणीव भरून काढेन. मी क्लासचा पसारा का घालते ते सांगते. तुमच्या भावाच्या संसाराला थोडासा हातभार लाववा ही माझी इच्छा आहे म्हणून.”
मी लंडनहून सहा महीने सुट्टीवर आले तेंव्हा माझं वजन ९९ पौंड झालं होतं. परत गेले तेंव्हा आईच्या हातची तुपरोटी खाऊन ते पुन्हा पूर्ववत ११२ पौंड झालं. मला ब्रिस्टल युनिव्हर्सिटीत इंग्लीश भाषा व साहित्याचा अभ्यास करण्यासाठी प्रवेश मिळाला होता. ते शिक्षण संपवून मी १९६२च्या जुलै महिन्यात मुंबईस कायमची परत आले. मधले सहा महीने वगळले तर आईने इथे कोणते नवे उद्योग सुरू केले होते हे कळायला एकच मार्ग होता. तिची पत्रं. ती नाहीत. पण त्या नसलेल्या पुडक्यातल्या पत्रांविषयी एक गोष्ट मला निश्चित आठवते. बहुसंख्य पत्रं डॅडींची होती. आई मुंबईस आल्यावर तिची कामं इतकी वाढली की तिला पत्र लिहायला फुरसत नसायची. डॅडी हालहवाल कळवतच होते. कधी तरी तिला खास काही सांगायचं असेल तेंव्हा त्यांच्याच पत्रांत ती चार ओळी लिहित असे. अधून मधून निर्मलची छान पत्र यायची.
आई मुंबईला परत यायच्या सुमारास डॅडींनी लव्हबर्ड्ज पाळायचं ठरवलं. पोटची पाखरं उडून गेल्यावर दोघांना विरंगुळा म्हणून त्यांनी ते पक्षी आणले असावे. त्यांचं करण्यात देखील आईचा वेळ जात असावा. शिवण शिकवत होतीच. शिवाय वनिता समाजाच्या कामात ती अधिक गुंतून गेली होती. तिच्या लंडनच्या मुक्कामाविषयी समाजाने तिला भाषण देण्यास आमंत्रित केले. ती फार सभा धीट नव्हती. पण हळूहळू मंचाविषयीची भीति चेपण्यात ती यशस्वी झाली होती. आपलंच कौतुक आपण करणं बरोबर नाही म्हणून तिचं भाषण बरं झालं एवढं मोघमच तिने आम्हाला लिहिल्याचं आठवतंय. लव्हबर्ड्ज बद्दल मात्र खूप लिहीत असे. निर्मल १९५८ साली परत गेली तेंव्हां सुद्धा ते पक्षी होते. डहाणू सोडून अंतू मामा, कमा मामी मुंबईला आले तेव्हां आई-डॅडींच्या ओळखीने आमच्या मागच्या घरात, सुभाष निवास मध्ये त्यांना तळ मजल्यावरचा एक खोलीचा फ्लॅट भाड्याने मिळाला. अंतु मामावर आईचं खूप प्रेम होतं. कमा मामीचं आणि माझं सूत जुळायचं. त्यांचा वसंत सर्वांचा लाडका. सदैव हसत असायचा. तो आमच्या घरी खूप असायचा. पाळलेले पक्षी त्याचे सवंगडी झाले होते. वसंतने पिंजऱ्यात हात घातला की ते त्याच्या हातावर येऊन बसत. दादासाहेबांचा सर्वात घाकटा मुलगा (तोही वसंत) वर्षभर आमच्याकडे राहिला होता. तोही लव्हबर्ड्जमध्ये रंगत असे. आईने त्या पक्षांबद्दल लिहिलेला लेख मी ह्या प्रकरणाच्या शेवटी देत आहे. तो लोकप्रभा मासिकात प्रसिद्ध झाला होता. मी १९६२ साली इंग्लंडहून परत आले तो पर्यंत पक्षी नाहीसे झाले होते. ते कसे का ह्या तपशीलात मी इथे शिरत नाही कारण त्त्यामुळे मुख्य विषयाला फाटा पडेल. तर आपण आईकडे पुन्हा वळूया. म्हणजे १९६२च्या जुलै महिन्यात उडी घेऊया.
मी बी.ए.ची पदवी घेऊन मुंबईला परत आले तोपर्यंत फुकट गेलेलं एक वर्ष, त्यामुळे सहन करायला लागलेला कमीपणा हे सर्व पचवून निर्मलची कॉलेजमधली शैक्षणिक घोडदौड सुरू झाली होती. तिला दक्षिणा फेलोशिप मिळाली होती. शिष्यवृत्ती तर होतीच. ती इन्स्टिट्यूट ऑफ सायंसमध्ये झूऑलॉजीत बी एससी करत होती. नंतर एम एससी, कॅंसर रिसर्च असा तिचा प्रवास व्हायचा होता. आईचा शिवणाचा क्लास जोरात चालला होता. पण मी परत आल्यावर पहिले एक-दोन महीने ती काय करत्येय, काय नाही ह्याकडे माझं विशेष लक्ष नव्हतं. मला एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये लेक्चररची तात्पुरती नोकरी लागली होती. शिकणं आणि शिकवणं ह्यातली दरी भरून काढायला वेगळ्या प्रकारचा अभ्यास करावा लागतो. तो मी करत होते. भोवती नवा मित्र परिवार जमू लागला होता. जुना होताच. त्यांच्या भेटीगाठी, पार्ट्या अशा सामाजिक जीवनात मी गुंतून गेले. शिवाय नव्या लाटेची नाटकं आणि चित्रपट पाहणं हा गंभीर छंद होताच. मी फारशी घरात नसायची. चार वर्ष एकटी राहिले होते ती सवय अंगात भिनली होती. एक दिवशी मी बाहेर जायला निघाले असताना डॅडीं म्हणाले, “तू घराला होटेलसारखं वागवत्येस.” तेवढी सूचना मला पुरली. त्या नंतर बाहेरच्या आणि घरच्या जीवनात मी अधिक समतोल आणला.
ह्यानंतरचं आईचं भावनिक दृष्ट्या जीवन खडतर झालं. आम्हा बहीणींना डॅडी-आईनी आपापले साथीदार निवड्ण्याची मुभा दिली होती. निर्मलला बाळू (मुकुंद) लिमये आवडला आणि त्याला ती. तो उत्तम क्रिकेट पटु होता, हसतमुख आणि देखणा होता, त्याला मेडिकल रेप्रझेंटेटिव्हची चांगली नोकरी होती. आमच्या घरापासून पाच मिनिटांच्या अंतरावर त्याच्या वडीलांच्या मालकीचं घर होतं. निर्मलचं १९६४ साली लग्न झालं. लिमये कुटुंब रूढीरिवाज मानणारं होतं. त्यांना वैदिक पद्धतीचं लग्न हवं होतं. डॅडींनी ते मान्य केलं पण दोन अटींवर – घरच्या घरी थोडक्यात करायचं आणि त्यांना पूर्णतः अमान्य असलेला कन्यादान हा विधी गाळायचा. आईला पैशांची, किमान दागिन्यांची बरीच जुळवाजुळव करायला लागली. मला अत्यंत अपराधी वाटत होतं. माझ्या शिक्षणावर डॅडींनी अमाप पैसा खर्च केला होता. निर्मलचं सर्व उच्च शिक्षण तिने मिळवलेल्या शिष्यवृत्तीवर झालं होतं. आता लग्नात तिला द्यायला दागिने नाहीत. पूर्वी आमच्यासाठी आईने दोन सेट केले होते, माझ्यासाठी सोन्याचा, निर्मलसाठी मोत्याचा. माझा सेट माझा नव्हताच. तो आई-डॅडींचाच होता. मी आईला म्हटलं तो मला मुळीच नको. निर्मलला दे.
माझा ब्रिस्टल युनिव्हर्सिटीत नॉर्वीजियन मित्र झाला होता. माझ्याशी लग्न करायची त्याची इच्छा होती. माझी नव्हती असं नाही. पण मी भारत सोडून कुठेही जायला तयार नव्हते. भारतात आपला जम बसू शकेल का हे बघायला तो सहा महीन्यांसाठी मुंबईला आला होता. त्यातले पहिले १५ दिवस तो आमच्याकडे राहात होता. आईचं आणि त्याचं छान जमलं. मी कामावर जायची तेंव्हा तो स्वयंपाकघरात बसून तिच्याशी गप्पा मारायचा. तिचा स्वयंपाक त्याला खूप आवडायचा. त्याला जे पदार्थ खास आवडायचे ते ती त्याला कौतुकाने खाऊ घालायची. पण त्याला पाहून डॅडींच्या अंगाचा तिळपापड होत असे. संपूर्ण पंधरा दिवसांत ते त्याच्याशी एकही शब्द बोलले नाहीत. मी एखाद्या बुद्धीमान भारतीय माणसाशी लग्न करावं अशी त्यांची इच्छा होती. सहा महिन्यांच्या अखेरीस आमच्या लक्षात आलं की माझ्या मित्राचा भारतात जम बसण्याची शक्यता नाही. त्यामुळे आम्ही एकमेकांचा दुःखद निरोप घेतला. ह्या काळात आईला डॅडींची निराशा आणि निराशेतून उद्भवणारा राग ह्याचा सामना करावा लागला. नंतर मला लेफ्टेनंट कमांडर विजयकुमार मोहन शहाणे भेटला. मी त्याच्याशी लग्न केलं. त्या गोड-कडू इतिहासात मी शिरत नाही. मी एवढंच म्हणेन की मुलांचे गोड-कडू इतिहास फक्त त्यांचे कधीच नसतात. ते त्यांच्या आई-वडीलांचेही होतात. त्यांना खूप सहन करावं लागतं. आमच्या बाबतीत आईला जास्तच सहन करावं लागलं. आमचे दोघींचे घटस्फोट झाले तो पर्यंत डॅडी हृदय विकाराच्या झटक्याने गेले होते आणि आई एकटी होती. पण ती खांबासारखी आमच्या पाठीशी उभी राहिली.
ह्या सर्व गोष्टी पुढे व्हायच्या होत्या. तोपर्यंत आईच्या आयुष्यात एक मूलभूत बदल व्हायचा होता. ती कथा इथेच सांगते कारण त्यात आईने महत्त्वाची भूमिका निभावली. मी इंग्लंडहून परत आले तेंव्हा डॅडींनी पुन्हा एकदा टाइम्सची नोकरी सोडली होती. १९६१ साली इंडियन एक्स्प्रेस समुहाने एक नवीन वृत्तपत्र काढलं होतं -– फायनॅशिअल एक्स्प्रेस. त्याचे संपादक जी. एम लाड डॅडींचे मित्र होते. त्यांनी डॅडींना नवीन पत्राचे डेप्युटी एडिटर म्हणून येण्याची विनंती केली. त्यांना कामाचा भार पेलत नव्हता. तो हलका करायला त्यांना डॅडींसारख्या अनुभवी, कार्यक्षम आणि प्रामाणिक पत्रकाराची गरज वाटत होती. डॅडींना त्यांनी एक अमिशही दाखवलं. दोन-चार वर्षांत ते निवृत्त होणार होते. त्यानंतर संपादकपद डॅडींकडे येईल असं ते म्हणाले. १९६२मध्ये जेंव्हा डॅडी फायनॅशिअल एक्स्प्रेस मध्ये रुजू झाले तेंव्हा ते ५१ वर्षांचे होते. त्यांच्या अंगात घमक होती आणि नवीन बिझनेस वृत्तपत्रात काय मजकूर असावा, तो कसा सादर करावं, ह्याविषयी मनात अनेक कल्पना होत्या. चार वर्ष त्यांनी भरपूर काम केलं पण लाडांची निवृत्त होण्याची चिन्हं काही दिसेना. तेंव्हा त्यानी ठरवलं आता आपणच आपला गाशा गुंडाळावा. दुसऱ्याची हमाली न करता आपण आपलं काही तरी निर्माण करावं. डॅडी घ्येयवादी होते. आपली स्वप्न साकार करण्याची त्यांच्यात धमक होती. आईचा त्यांना पाठिंबा होताच. त्यांना मुंबईचा उबग आला होता. त्यांना ग्रामीण जीवनात शिरायचं होतं. ते अशा प्लॉटच्या शोधात होते की जिथे ते एक मोकळं, हवेशीर, कौलारू घर बांधू शकतील, समोर फुलबाग असेल, मागच्या दारी भाज्या, गोठ्यात म्हशी आणि पोल्ट्रीच्या घरात कोंबडीची पिल्लं. हे त्यांचं स्वप्न होतं. दर आठवडा अखेर ते पुण्याला जात, पुसाळकरांकडे उतरत आणि दोन दिवस प्लॉटच्या शोधात वणवण हिंडत. शेवटी तळेगावला हवा तसा प्लॉट मिळाला आणि घराचं बांधकाम सुरू झालं. घराचं बरचसं काम आईने कॉंट्रॅक्टरच्या डोक्यावर बसून करून घेतलं. तो गुजराती होता. ती डहाणूची म्हणून ती अस्खलित गुजराती बोलायची. कॉंट्रॅक्टरची आणि तिची भाषा जुळली आणि कॉंट्रॅक्टरच्या लक्षात आलं गोड बोलून आपल्याकडून हवं ते आणि तसं काम करून घेणारी खमकी गिऱ्हाईक आपल्याला भेटली आहे. इथे सांगायचा मुख्य मुद्दा हा की डॅडींचं प्रत्त्येक स्वप्न साकार करण्यात आईचा सहभाग निर्णायक असायचा, मग आम्हाला इंग्लंडला पाठवण्याचं स्वप्न असो की घर बांधण्याचं. ती लंडनहून परत आली तेंव्हा तिचं स्वागत एकट्या डॅडींनी केलं नव्हतं, तर छोटू, चिंगी वगैरे नावाच्या पाखरांनीही केलं होतं. घरात मुलांच्या किलबिलाटाची तिला भरपूर सवय होती. पण तिच्या आयुष्यात तोपर्यंत पक्षांची चिवचिव तिने ऐकलेली नव्हती. ती आता रोज कानावर पडू लागली. पक्षांचं तिने कसं कौतुक केलं ह्याचा पुरावा लोकप्रभा मासिकातल्या तिच्या ‘लव्हबर्ड्स’ ह्या लेखात सापडतो. तो लेख संक्षिप्त स्वरूपात इथे देत आहे.
छोटूचं प्रियाराधन आज फळाला येणार होतं. आज चिंगी सारा वेळ ब्रीडिंग बॉक्समध्ये बसली होती. खाण्या पुरेशी बाहेर येई. तिचा चेहरा म्लान झाला होता. छोटू बॉक्सच्या तोंडाशी बसून इकडल्या तिकडल्या गप्पा मारून तिचं मन रिझवायचा प्रयत्न करीत होता. तिला खाऊ घालायचं काम तर चालूच होतं. लहानगा वसंत रुसला होता. आज तो किती तरी वेळ पिंजऱ्यात हात घालून उभा होता तरी त्याच्या हातावर बसायला कोणी फिरकलं नाही. मी त्याची समजून काढली. आता चिंगी अंडी घालणार आहे. त्यातून पिल्लं बाहेर येतील. तुला पिल्लं पाहिजेत की नाही? पिल्लं होणार ऐकताच त्याची कळी खुलली. आता पिल्लं कधी होणार याची तो वाट पाहू लागला.
चिंगीची आज कशावरही इच्छा नव्हती. प्रसुती वेदना होत होत्या. तरीसुद्धा छोटूची चाललेली प्रेमळ धडपड तिला पाहवत नव्हती. बॉक्सच्या तोंडाशी येऊन त्याच्याशी एक-दोन शब्द बोले, त्याने आणलेला दाणा आपल्या चोचीत घेई आणि लगबगीने पुन्हा आत निघून जाई.
झालं. चिंगीने पहिलं अंड घातलं. एक दिवसा आड करून तिने पांच अंडी घातली. त्यानंतर सतरा दिवस ती सतत अंडी उबवत त्यांच्यावर बसून होती. खाण्यापुरती ती बाहेर येई आणि झटकन आत जाई. बॉक्सच्या जाळीतून आपण आत पाहिलेलं तिला आवडत नसे. एखादं अंड तिच्या कुशीतून दूर गेलेलं तिला आढळलं तर लगेच चोचीने आणि मानेच्या सहाय्याने ती त्याला पंखाखाली ओढून घेई. चिंगी अंड्यांवर बसली होती त्यामुळे छोटू रिकामा झाला होता. आता घरातल्या माणसांकडे लक्ष द्यायला त्याला उसंत मिळाली होती. तो वसंतच्या हातावर येऊन बसू लागला. मी त्याला नावाने हाक मारली की तो साद देई आणि माझ्या हातची कोथिंबीर चोचीत घेई.
सतरा दिवसांनी पहिलं पिल्लू बाहेर आलं. त्यानंतर एक दिवसा आड करून पांचही पिल्लं बाहेर आली. प्रथम पिल्लं म्हणजे केवळ मासाचे गोळे होते. चिंगी त्यांना कशी खायला घाली तिचं तीच जाणे. आता छोटू पुन्हा कामाला लागला. तो पिल्लांसाठी घास तयार करून तो चिंगीच्या तोंडात देई आणि तो घास चिंगी पिल्लांना भरवी. एक दिवशी छोटूला वाटलं आपण पिल्लांना भरवावं. चिंगीला ते मुळीच आवडलं नाही आणि ती दिवसभर त्याच्यावर रागावून बसली.
चिंगी-छोटूची पिल्लें आता छान वाढू लागली होती. त्यांच्या अंगावर लव दिसू लागली होती. रंगांच्या छटा देखील दिसू लागल्या होत्या. ती आठ-दहा दिवसांची झाली तेंव्हा चिंगी मधून मधून बाहेर येऊन बसू लागली आणि रात्री त्यांना सोडून निजू लागली. पिल्लं धीट होत होती. आता ती बॉक्सच्या तोंडाशी येऊन खायला मागू लागली. बरोबर पंचवीस दिवसांनी एक पिल्लू आपलं आपणच घरट्याबाहेर आलं. ते पाहताच छोटूची जोराची धावपळ सुरू झाली. तो सारखा त्याच्या जवळ जाई, त्याला भरवी आणि उडायचं कसं ते त्याला सप्रयोग दाखवी. पिल्लू त्याच्या मागे मागे जाऊन आपलेही पंख त्याच्यासारखे फडफडवून उडण्याचा प्रयत्न करी. ते न जमल्याने तो मग पिंजराभर धावे. पुन्हा छोटू त्याला दाणा भरवी आणि त्याच्या पाठीवर पाय देऊन उड म्हणून सांगे. पिल्लू कधी उडून आपल्या शेजारी दांडीवर येऊन बसेल असं त्याला झालं होतं. त्याचा हा अधिरेपणा चिंगीला पसंत पडला नाही. छोटू पिल्लाच्या पाठीवर पाय द्यायला लागला की ती त्याला दम भरी. थोडा वेळ तिचं तो ऐके पण लगेच त्याचा पूर्ववत कार्यक्रम सुरू होई. तो पिल्लाच्या हात धुवून मागे लागला होता. थोड्या वेळाने त्याच्या श्रमांना फळ आलं. पिल्लाने पंख पसरून दांडीच्या दिशेने लहानशी भरारी घेतली. पण दांडीपर्यंत ते पोहोचू शकलं नाही. बापाचे आणि त्याचे श्रम थांबेना. संध्याकाळी एक भरारी यशस्वी झाली आणि पिल्लू बापाच्या शेजारी ऐटीत बसलं. हे पिल्लू चांगलं पुष्ट होतं म्हणून आम्ही त्याचं नाव गोटू ठेवलं. हळूहळू सर्व पिल्लं बाहेर आली, उडायला शिकली आणि त्यांची नामाभिदानं झाली. चिंगी आणि छोटू आपल्या कर्तव्यातून मोकळे झाले होते. आता आपल्या बच्चांचे खेळ पाहण्यात ते गढून गेले होते.
सप्टेंबर १९६५च्या आसपास डॅडींनी नोकरीचा राजीनामा दिला आणि त्यांची तळेगावला जायची बांधाबांध सुरू झाली. तिथे आई-डॅडींचं करकरीत नवं जीवन सुरू व्हायचं होतं. त्या गावाशी आधीचा त्यांचा कोणताही संबंध नव्हता. डॅडी बेळगावचे. आई डहाणूची. त्यांचं खरं गाव मुंबई. आता निघाले होते तळेगावला. नाही म्हणायला तुकाराम महाराजांशी दोघांचे मानसिक लागेबांधे होते. घराच्या समोर भंडारा डोंगर होता. घराचं नाव अभंग ठेवलं होतं. हा खूपच मोठा दुवा म्हणायचा.
आई-डॅडी तळेगावला राहायला जायच्या आधी, म्हणजे १९६५ ऑगस्टम्ध्ये माझं आणि विजूचं लग्न झालं. आम्ही आमचा हनीमून तळेगांवच्या घरात केला. लग्नाचा संपूर्ण खर्च मी केला होता त्यामुळे माझे खिसे रिकामे होते. आई विजूला कर्णाचा अवतार म्हणत असे. त्याचे खिसे नेहमीच रिकामे असायचे. मग हनीमूनला कुठे जाणार? तळेगावला. अभंगमध्ये पूजा वगैरे व्हायची नव्हतीच. आम्हा नवं विवाहितांच्या पावलांनी गृहप्रवेश झाला.
डहाणू सोडून आईने प्रथम पाटणा जवळ केलं. पाटणा सोडून मुंबई जवळ केलं. आता मुंबई सोडून तळेगांव जवळ करणार होती. मुंबईत ललित इस्टेट मध्ये निर्मल आणि बाळू राहायला आले. डॉडींच्या मनातून मुंबईचा फ्लॅट मालकीणीला परत करायचा होता. घरात त्याविषयी चर्चा झाली. आई डॅडींहून अधिक व्यवहारी होती. ती म्हणाली तुमच्या मुंबईला फेऱ्या होतील तेंव्हा तुम्ही कुठे राहाल? त्यांच्या कामाच्या निमित्त्ताने मुंबईला फेऱ्या होणारच होत्या. ते वृत्तपत्रांसाठी लेख, पुस्तकांची परिक्षणं वगैरे लेखन करणार होते. त्यासाठी पुस्तकांची ने-आण करणं, लेखन पोहोचवणं ह्या कामांसाठी त्या काळात कुरिअर नव्हते. आईने निर्मल-बाळूला फ्लॅटमध्ये येऊन राहण्याची विनंती केली. त्यांनी आनंदाने विनंती मानली आणि डॅडींची सोय झाली.
तळेगांवला मुंबई-पुण्याच्या मित्रमंडळींची, नातेवाईकांची ये-जा सुरू झाली. जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरून अभंगची कौलं दिसायची इतकं ते त्याच्या जवळ होतं. दोन्हीकडच्या मित्रमंडळींना त्यामुळे येणं-जाणं सोयीचं होत असे. १९६६ सालच्या सप्टेंबर २२ आणि ऑक्टोबर ७ला, १५ दिवसांच्या अंतराने, विक्रमचा आणि रेणुकाचा मुंबईच्या दोन टोकांना जन्म झाला. विक्रमचा शिवाजी पार्कला आणि रेणुकाचा कुलाब्याला. आईची तळेगाव-शिवाजी पार्क-तळेगाव-कुलाबा अशी भयानक धावपळ झाली. मला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर नवजात बाळांना आणि आईचा कौस्तुभ मणी भरत यांना घेऊन आम्ही तळेगांवला गेलो. तिथे भरपूर माहेरपण उपभोगलं. नेव्हीच्या शिरस्त्या प्रमाणे विजूला अजून मुंबईत हक्काचं घर मिळालं नव्हतं. माझा तळेगावचा मुक्काम त्यामुळे वाढला. रेणुका तीन महिन्यांची झाली तेव्हा तिचं तिथे बारसं केलं. ती संघ्याकाळची पोटदुखीने रडायची. तिला पाळण्यात घातलं तेव्हा देखील ती रडत होती. नलू मावशी पुण्याहून आली होती. ती म्हणाली मूल असं रडत असताना नाव नाही ठेवायचं. तिने पाळणा म्हणण्यास सुरुवात केली. रेणुकाने पहिले सूर ऐकले मात्र आणि ती एकदम शांत झाली. संगीताची आणि नलू मावशीच्या आवाजाची किमया. नलू मावशीने पाळणा म्हटला तो अर्थात आईने रचला होता. त्याच्या शेवटच्या ओळी पुढील प्रमाणे होत्या:
हौशीने उभय कुटुंबे / शुभदिनी जमली अभंगी
आशीर्वच देण्या तुजला / दीर्घायुषी होई बाळा
रेणुका नाव तुझे हे / योजिले तुझ्या पित्याने
सार्थ करिसी त्या नावा / भूषवी उभय कुटुंबा
मी तळेगावला असताना आई आणि मी चाकणच्या बाजारात म्हैस विकत घ्यायला गेलो. सोबत बाजीराव होते. ते पोल्ट्रीचं आणि बागेचं काम बघत असत. सर्व म्हशी तावून सुलाखून पाहिल्यावर आम्हाला ४५० रुपयात हवी तशी म्हैस मिळाली. म्हशीला घेऊन आम्ही अभंग पर्यंत चालत आलो. टेंपो वगैरे वाहनं उपलब्ध नव्हती. म्हशीचं नाव आई-डॅडींनी गंगा ठेवलं. तिचं दूध घरी येऊ लागलं. उरलं सुरलं दूध उंच, ताठ बांध्याच्या जानकीबाई गावात विकू लागल्या. परतताना अभंगच्या ओटीवर ठेवलेल्या बाकावर बसून चहापाणी करून, गप्पा मारून मग त्या घरी जात असत. गंगेच्या जोडीला नंतर गोदा आली. तेव्हा मात्र मी तळेगावात नव्हते.
डॅडींचं रोजचं फिरणं सुरू झालं. मुंबईत त्यांच्या सोबत त्यांचे बालमित्र दत्ताराम पालेकर असत. इथे महाजन आजोबा होते. त्यांचा अभंगच्या मागच्या बाजूला, तीनचार फर्लांगावर, पुठ्याच्या खोक्यांचा कारखाना होता. ते धोतर आणि काळ्या टोपीत असत. डॅडी हाफ पॅंट आणि चौकट्यांच्या अर्ध्या बाह्यांच्या शर्टात. त्यांची जोडी खूप मजेदार दिसत असे. अभंगच्या शेजारचा रस्ता ओलांडला की बापटांचा खडूचा कारखाना होता. त्यांच्या तरूण मुलाला, अरूणला, आई-डॅडींचा लळा लागला. तो पुष्कळदा घरी यायचा. गावात मनोहरराव (दादा) सबनीस भजन शिकवायला येत असत. आई त्यांच्या क्लासला जाऊ लागली. गावात गो. नी, दांडेकरांचं घर होतं. त्यांच्या पत्नी क्लासला येत असत. त्यांच्याशी ओळख झाली त्यातून दांडेकरांशी झाली आणि त्याचं रूपांतर मैत्रीत झालं. ते तिला अक्का म्हणू लागले. पोलट्री सुरू करून जेमतेम एक वर्ष झालं असेल नसेल तितक्यात कोंबडीच्या पिल्लांना रोग जडला. त्या पायी त्यांच्यातली बरीच पिल्लं कमी करावी लागली. असा फटका पुन्हा सहन होणार नाही म्हणून डॅडींनी पोल्ट्री बंद केली. पण ग्रामीण धंदा तर करायचा होता. Poultry farming नाही तर pig farming. म्हणून त्यांनी गुलाबी डुकरं घेतली. आता मात्र आईने त्यांच्यापुढे हात टेकले. ‘डुकरांच्या धंद्यातलं ना मला काही माहीत ना माहीत करून घ्यायची इच्छा आहे. डुकरं तुम्ही सांभाळा, मी बाग बघते’ असा तिचा पवित्रा होता. डॅडींनी देखील डुकरांना लवकरच निरोप दिला.
पुण्याच्या नर्सरीतून डॅडी अनेक प्रकारची रोपं आणत असत. समोरची बाग फोफावू लागली. मागच्या दारी तोंडलीच्या आणि दुधी भोपळ्याच्या वेली होत्या आणि अळू होचा. तेही फोफावत होते. घरच्या भाज्या खाण्याची चैन आम्ही प्रथमच अनुभवत होतो. पाहुणे येऊन तळेगावची उत्तम हवा आणि दारचे दुधी खाऊन खुष होऊन जात. दादासाहेबांचा सर्वात मोठा मुलगा, विनायक उर्फ बबन भाऊ, पोलीस ऑफिसर होता. त्याची तेंव्हा पुण्याला बदली झाली होती. डॅडींना राखण करणारा कुत्रा हवा होता. बबन भाऊने पोलीसांनी ट्रेन केलेला ऍलसेशियन कुत्रा त्यांना आणून दिला. डॅडींनी त्याचं नाव खंडू ठेवलं. त्याच्यासाठी अंगणात लाकडी घर बांधून घेतलं. आई त्याच्यासाठी रोज मटण शिजवू लागली.
रेणुका साडे तीन महिन्यांची झाली त्या सुमारास विजूला मुंबईत चर्चगेटला हक्काचं घर मिळालं आणि मी मुंबईला गेले. त्या नंतर दोन महीन्यांनी, १८ मार्च १९६७ ह्या दिवशी आई-डॅडींच्या लग्नाचा २९वा वाढदिवस होता. आईंने पक्वान्न म्हणून डॅडींचा आवडता सुधारस केला होता. बाकी स्वयंपाक करून ती भजनाच्या क्लासला गेली होती. ती परत यायच्या आधी, बाजीरांवांची सुद्धा वाट न बघता, त्यांनी आणलेल्या नवीन रोपासाठी डॅडी खड्डा खोदू लागले. ते करत असताना त्यांच्या छातीतून भयानक कळ गेली. तितक्यात बाजीराव आपलं काम आटोपून खड्डा खोदायला हजर झाले तो काय. डॅडी यातनेने कोलमडून पडले होते. त्यांना उचलून त्यांनी घरात नेलं. तिथे डॅडींना भडभडून ओकारी झाली. आई परत आली तेंव्हा ते बिच्छान्यावर पडून यातना भोगत होते आणि बाजीराव रडत होते. अरूण बापट निर्मलला आणि मला तातडीने पुण्याला घेऊन जायला आला. डॅडींना जहांगीर नर्सिंग होममध्ये नेलं होतं. आम्ही बबन भाऊकडे सामान टाकून हॉस्पिटलकडे धावलो. डॅडीं बिछान्यावर. नाकात तोंडात नळ्या. डॅडींना आम्ही कधीही असं पाहिलं नव्हतं. त्या दिवशी प्रथम आणि शेवटचं. आई त्यांच्या बिच्छान्याशी खंबीर उभी होती. हॉस्पिटलच्या मागे तळेगाव स्टेशन होतं. तिथे गाडीची घंटा झाली की “माझी वाजली” असं डॅडी हसत म्हणत होते. उपचार चालू होते पण त्यांचं शरीर दाद देत नव्हतं. २० तारखेला सकाळी त्यांना दुसरा झटका आला आणि ते गेले. ते ५६ वर्षांचे होते. आई ५३ वर्षांची.
तळेगावातलं आणि जगातलंच आईचं एकटीचं जीवन त्या दिवसा नंतर सुरू झालं. तिला जबर धक्का बसला होता तरीही तिचा मानसिक समतोल ताब्यात होता. डॅडींचं पार्थिव सुधाकर मामाने मिळवून दिलेल्या वाहनामधून तळेगावला आणण्यात आलं आणि त्यांच्या अंत्यसंस्कारांची चर्चा सुरू झाली तेव्हा आई म्हणाली, ‘कोणत्याही प्रकारचा धार्मिक विधी करायचा नाही. गोपाळराव नास्तिक होते. त्याचा मान राखून करायचं ते करा.’
विजूच्या बदल्यांमुळे माझं अधूनमधून बेघर होणं चालूच होतं. त्यामुळे डॅडी गेले त्या नंतरच्या काळात मी आईकडे बरेच दिवस राहू शकले. निर्मल येऊन जाऊन असायचीच. काही दिवसांनी एका सकाळी आई म्हणाली, “काल रात्री मला गोपाळराव दिसले. मी उठले. डोळे उघडे ठेऊन अंधारात घरभर हिंडले. तिथे कोणीही नव्हतं. मी त्यांना म्हटलं, ‘तुम्हाला पाहण्याची सतत इच्छा असते म्हणून माझ्या मनाने तुम्हाला समोर आणलं.’ जगात भूतं नसतात हे डहाणूला नानांनी पिंपळा खाली उभं राहून आईला पटवून दिलं होतं. त्या वेळी तिची अंधश्रद्धा जी पळाली ती पळाली. तिचा डॅडींबरोबरचा संवाद अखंड चालू राहिला. तिच्या शेवटच्या दिवसांत ती त्यांनाच सारखी म्हणत होती, “गोपाळराव आता पुरे झालं. मला न्या इथून.”
डॅडी गेल्यावर काही काळ आईचा आवाज गेला. गेला म्हणजे ती बोलू शकत होती पण तिला गाता येईना. तरीही ती भजनाच्या क्लासला जात राहिली. हळूहळू आवाज सुधारून एक-दोन महिन्यांनी पूर्ववत झाला. “माझा आवाज भजनाने परत दिला” असं ती म्हणत असे. डॅडींना जाऊन एक महिना झाला तेंव्हा तिने दादा सबनीसांचं अभंग मध्ये भजन केलं. घराची मधली खोली मोठी होती. खोलीला प्रचंड आडवी खिडकी होती. खिडकीतून भंडारा डोंगर दिसत असे. निमंत्रीतांच्या समोर ते भव्य दृष्य. कानात दादांच्या गोड आवाजातले तुकाराम-ज्ञानेश्वरांचे अभंग आणि खिडकीतून येणाऱ्या मावळत्या सूर्याची कलती किरणं. हलवून टाकणारी पण त्याच बरोबर शांत करणारी संध्याकाळ होती ती.
आईच्या मनात जो कोलाहल चालला होता असणार त्याला तिने कधीही वाचा फोडली नाही. वरकरणी ती लवकरच पूर्णपणे सावरल्यासारखी दिसली. घरातली ये-जा चालू होती. बापट-महाजन कुटुंबांशी आधीचे संबंध होते ते वाढले. त्यात भरीला आता साठे म्हणून एक विधवा बाई आणि त्यांची मुलगी नीलम जवळ राहायला आल्या होत्या. त्या दोघी जवळ जवळ दररोज संध्याकाळी येत. गायकवाड, ज्यांनी घराची वीज व्यवस्था केली होती, तेही अधूनमधून येऊन जात. मराठे नावाच्या बाईंशी आईची नव्याने ओळख झाली. नंतर मैत्री झाली. गो नी दांडेकरांच्या मुलीचं वीणाचं विजय देव यांच्याबरोबर लग्न झालं. वीणाचा आणि आईचा आधीपासून एकमेकींवर जीव होता. आता विजयला आईने जावई मानलं. गोदा-गंगा ह्या म्हशी काढून टाकल्या होत्या. बाजीरावना सुट्टी द्यावी लागली होती. डॅडींनी आपली सर्व बचत घरात ओतली होती. आईच्या हाती फार पैसे राहिले नव्हते. ते जगले असते तर त्यांची लेखनातून मिळकत चालू राहिली असती. आता ती नव्हती. अभंगला शेपूट वजा जाण्या-येण्याचा स्वतंत्र मार्ग असलेल्या दोन खोल्या डॅडींनी योजल्या होत्या. मुख्य घरात आणि त्यांच्यात दरवाजा होता. तो बंद केला की खोल्या पूर्णपणे खासगी होत असत. डॅडींचं स्वप्न होतं की तिथे दोन मुली, जावई येऊन राहतील. आपले लेखक मित्र भंडारा डोंगराच्या साक्षीने लेखन करतील. आता त्या खोल्या तशाच रिकाम्या होत्या. त्या भाड्याने देऊन थोडे पैसे मिळवता येतील का ह्या दिशेने आईचा विचार सुरू झाला. पण तळेगावला नोकरीसाठी वा शिक्षणासाठी बाहेरून येणारे कोणी लोक नव्हते ज्यांना भाड्याच्या जागेची गरज भासावी. त्यामुळे तो विचार बाजूला ठेवावा लागला.
तितक्यात आईला दुसरा धक्का बसला. डॅडींना जाऊन नऊ महिने देखील झाले नव्हते. आयुष्याची नव्याने जुळवाजुळव करण्याचा आई अजून प्रयत्न करत होती आणि ११ डिसेंबर १९६७ ह्या दिवशी पहाटे चार वाजून २० मिनिटांनी कोयना धरण परिसरात ६.७ रिश्टर क्षमतेचा तीव्र भूकंप झाला. पलंग गदगदा हलला म्हणून आई थाडकन उठली. त्याच सुमारास मुंबईत मीही जागी झाले, रेणुकाला उचललं. आई अंगणात घावली. मला धावायला जागा नव्हती. मी रेणुकाला घट्ट धरून थिजल्यासारखी जिथल्या तिथे उभी होते. मुंबईला पोहोचलेला धक्का काही क्षणांचा होता. तळेगावला अधिक तीव्र धक्का बसला. ह्या भूकंपाचे घक्के ७०० कि.मि.च्या अंतरा पर्यंत पसरले होते असं नंतर कळलं. हळूहळू धरणी शांत झाली. पण त्या आधी तिने जे नुकसान केलं त्यात अभंगच्या फाटकाचा एक मजबूत खांब भंगला. घर ज्याच्या खांद्यांवर उभं राहिलं होतं तो मुख्य खांब आधीच कोसळला होता. त्यातून आई सावरायचा प्रयत्न करत असताना ही दुर्घटना घडली. आई बरीच हबकली.
१९६८च्या फेब्रुवारीत विजूची दिल्लीला बदली झाली. दोन महीन्यांच्या वार्षिक सुट्टीवर जात असलेल्या तिथल्या एखाद्या ऑफिसरचं घर त्याला तात्पुरतं मिळेपर्यंत मी तळेगावला रहायला आले. कधी नव्हे ती तेंव्हा आईने तिची भीति बोलून दाखवली. “हे घर आमची बचत होती. डॅडी मिळवत राहिले असते. पण ते निघून गेले. लहानसहान डागडुजी करण्या पुरेसे माझ्याकडे पैसे आहेत. पण घर कोसळलं तर मी काय करू? ते जो पर्यंत शाबूत आहे तोपर्यंत मनाचा हिय्या करून मला ते विकलं पाहिजे. मला राहायला कुठेही एक खोपटी पुरेल.”
माझी किंवा निर्मलची ऐपत असती तर आम्हीच तिच्याकडून अभंग विकत घेतलं असतं. डॅडींनी आणि तिने इतके श्रम करून बांधलेल्या घरात ती सुखाने राहू शकली असती. पण आमची ती ऐपत नव्हती. घर विकणं हाच एक मार्ग होता. आम्ही ताबडतोब एक-दोन मराठी वृत्तपत्रांत घराची जाहिरात दिली. लोक घर बघायला येऊ लागले. पण घराचा एकूण आकार आणि रचना ह्या गोष्टी डॅडींच्या कल्पनेतल्या होत्या. सर्वांच्या पसंतीस उतरतील अशा नव्हत्या. लोकांना काही तरी फॅन्सी हवं असतं. डॅडींनी एकूण परीसरांचं भान ठेऊन त्यात सामावेल अशी घराची रचना केली होती. घर बैठं होतं. कौलारू होतं. त्याच्या भिंती तिथल्या दगडाच्या होत्या. आजूबाजूच्या परिसरावर मात करून ‘माझ्याकडे बघा’ म्हणणारा उद्दामपणा त्या घराच्या ठिकाणी नव्हता. त्यामुळे लोकांना ते आवडत नव्हतं. ज्यांना आवडत होतं ते किंमत पाडून मागत होते. मग आईने ठरवलं की प्लॉटच्या मागच्या हिश्यात पोल्ट्रीसाठी बांधलेली shed वेगळी विकायची. दादा सबनीस तशी जागा शोधत होते. त्यांनी ती घेतली. आता घर विकणं काही प्रमाणात अधिक सोपं झालं. करता करता निर्मलच्या ओळखीच्या काळे नावाच्या कुटुंबाने घर घेतलं. किंमत थोडी पाडूनच दिली पण घर प्रेमाने घेतलं आणि वापरलं. आईला दुसरी जागा मिळेपर्यंत ती तिथून हलणार नव्हती. तिला पुण्यात खोली हवी होती. वीणा आणि विजय देव यांच्या मदतीने पर्वती जवळ जागा मिळाली. पण आईने तिथे राहावं हे निर्मलला मुळीच मान्य नव्हतं. “तुझा मुंबईत फ्लॅट असताना आणि तिथे तुझी जवळची माणसं असताना तू पुण्यात एका खोलीत का राहावं? तू म्हणालीस म्हणून आम्ही ललित इस्टेटमध्ये राहायला आलो. आम्ही आमच्या घरी परत जाऊ. तू तुझ्या घरी परत ये.” निर्मल ललित इस्टेटमध्ये राहायला आली तेंव्हा तिचे सासू-सासरे नाराज झाले होते. आता ती परत जाणार तेंव्हा घरात काही बदल करावे लागणार होते. ते तिने कल्पकतेने केले. ती आणि बाळू पुन्हा श्री निवास मध्ये राहायला गेले. निर्मलच्या आयुष्याची एक स्वतंत्र आणि काही अंशी निराशदायी कहाणी आहे. पण ज्याची कथा त्यांनीच सांगावी. इतर लोक कितीही जवळचे असले तरी बाहेरचेच असतात. म्हणून, आणि मुख्य म्हणजे ही आईची गोष्ट आहे म्हणून, मी निर्मलच्या किंवा माझ्या आयुष्याच्या तपशीलात शिरलेली नाही. निर्मलने मनाचं औदार्य दाखवलं आणि आईच्या पुढच्या आयुष्याची योजना झाली.
डिसेंबर १९६८ साली आई अभंग सोडणार होती. मी आठ महीन्यांची गरोदर होते. विजूला रशियाला पाठवण्यात आलं होतं. मी तळेगावला गेले असते पण आता तळेगाव नव्हतं. विजूचा एअर फोर्समध्ये असलेला मोठा भाऊ अजित तेंव्हा पुण्यात होता. मी त्यांच्याकडे राहिले. बाळंत व्हायला मी निर्मलकडे गेले. आई माझ्याबरोबर आली. शेजारच्या वझे हॉस्पिटलमध्ये गिरीश झाला. तो झाल्यावर दोनच आठवड्यांनी विजूच्या आई, माई, गेल्या. त्याचे वडील दादा पुण्याच्या घरात, ममितात, एकटे पडले. माझ्या दोन मुलांना घेऊन आई आणि मी त्यांना सोबत म्हणून तिथे राहायला गेलो. ममिता हे माईंनी हौसेने बांधलेलं कर्वे रोडच्या लगतचं घर. विजू रशियाहून आला तो सरळ विशाखापट्टनमला बदली होऊन गेला. तिथे त्याला तात्पुरतं घर मिळालं तेंव्हा आई आणि मी तिकडे गेलो. गिरीश सात महीन्यांचा होईपर्यंत आई आमच्याबरोबर होती. १९६९च्या जुलै-ऑगस्टच्या सुमारास ती मुंबईला गेली. आता तिच्या जुन्या घरी तिला नव्या आयुष्याची सुरुवात करायची होती. वरकरणी ती डगमगलेली दिसत नसे. डॅडी गेल्यापासून तिच्या मनात काय चाललं होतं त्याचा तिने आम्हाला पत्ता लागू दिला नाही. निदान मला तरी नाही. निर्मलशी त्याविषयी बोलली असली तर असेल.
विशाखापट्टणममध्ये ज्या घरी आई राहिली होती ते घर काही दिवसांनी आम्हाला सोडावं लागलं. नेहमीप्रमाणे मी गाठोडं बांधून मुलांना घेऊन मुंबईला आईकडे आले. विजूला हक्काचं घर मिळालं तेंव्हाच परत गेले. त्या नंतर आले ती गाशा गुंडाळून १९७४ सालच्या मे महीन्यात. मधल्या चार वर्षांत आईला काही लागलं भागलं तर निर्मल शेजारीच होती. तिच्याशी आईच्या गप्पा होत असत. त्या काळातल्या मला माहीत झालेल्या काही गोष्टींची मी इथे नोंद करते. अभंग विकून आलेल्या पैशाची गुंतवणुक आईने बरवे नावाच्या एका एजंटच्या सल्ल्यावरून दोन–तीन मध्यम उद्योगांत केली. शिवणाचा क्लासही पुन्हा सुरू केला. त्यातून मिळणारी फी आणि गुंतवलेल्या पैशातून येणारं व्याज इतक्यावर घर चालवणं कठीण होतं. त्यासाठी तिने उपाय योजला. डॅडींनी जमिनीपासून छतापर्यंत जाणारं पुस्तकांसाठी भक्कम शेल्फ करून घेतलं होतं. त्याचा पार्टिशन म्हणून उपयोग करून निर्मल आणि माझ्यासाठी त्यांनी स्वतंत्र खोली तयार केली होती. ती खोली आता रिकामी होती. तिथे आईने सबनीस आणि देशपांडे नावाचे दोन तरूण पेइंग गेस्ट ठेवले. तिची घर खर्टाची व्यवस्था पक्की झाली. तळेगावचे शेवटचे काही महीने गावातल्या लक्ष्मीबाई नावाच्या वयस्क बाईं आईला रात्रीची सोबत म्हणून झोपायला येत असत. त्यांना तिने मदत म्हणून मुंबईला बोलावून घेतलं. तिचं आयुष्य असं लागी लागत असतानाच १९७४च्या मे महिन्यात मी तिच्याकडे येऊन थडकले. त्या नंतरच्या आमच्या एकत्रित आयुष्याची कहाणी पुढच्या प्रकरणात.
मी मुंबईला आले आणि मला एच आर कॉलेजमध्ये लेक्चररची नोकरी मिळाली. आम्हाला जागा अपुरी पडू लागली म्हणून बिचाऱ्या देशपांडे आणि सबनीस ह्या अत्यंत सालस तरुणांवर दुसरी जागा बघण्याची पाळी आली. कॉलेजमधून येणाऱ्या माझ्या पगारात आमचं सर्वांचं भागत होतं. आईच्या स्वतंत्र खर्चासाठी तिला क्लासमधून आणि गुंतवणुकीतून येणारे पैसे पुरत होते. ह्या सुरळीत चाललेल्या घरात लक्ष्मीबाईंच्या भावजयीचा त्रास सुरू लागला. ती जहामबाज बाई सतत येऊन लक्ष्मीबाईंचा पगार वाढवून मागे. तिचा सूर भांडणाचाच असे. लक्ष्मीबाई अत्यंत मवाळ होती. विधवा होती. आईवर तिला जीव होता. पण शेवटी आईला तिच्या भावजयीला सांगावं लागलं की तुझ्या नणंदेला तू घेऊन जा. लक्ष्मीबाई गेल्यावर दोन-चार महीन्यांनी अलका घुळप, वय वर्ष १६, आमच्याकडे कामाला आली. सकाळी येऊन संध्याकाळ पर्यंत राहू लागली. आज ४६ वर्ष ती ह्याच घरात काम करते आहे. तिच्या वेळा बदलल्या, कामं बदलली पण ती ठाम राहिली. तिचा आम्हाला सर्वांनाच मोठा आधार आहे.
१९७४ ते १९७९ ही पांच वर्ष आमची खूप शांत गेली. मी कॉलेजमधून दुपारी परत आले की घरीच असायची. मुलांचे कपडे शिवणं, त्यांचे अभ्यास बघणं, संध्याकाळचा स्वयंपाक करणं अशी भरपूर कामं असायची. मुलांना निर्मलचं घर म्हणजे दुसरं घर होतं, अघून-मधून रविवारी आम्ही ताई मावशीकडे जात असू. एका उन्हाळ्यात आम्ही गणपती पुळ्याची सहल केली. ती सोडली तर त्या पांच वर्षांत मी इतर कुठे गेले नाही. विजू मुंबईला आला की मुलांना भेटायला येई. त्याची बदली मालाड जवळच्या आय. एन. एस. हमल्याला झाली तेंव्हा त्यांना तो तिकडे नेई. आमच्या घरी टी व्ही नव्हता, पण प्रेमळ शेजार होता. मुलं काही कार्यक्रम त्याच्याकडे जाऊन बधत. शनिवारी मुलं निर्मलकडे दिवस घालवत. रविवारी भरत-विक्रम आमच्याकडे येत. भरत आणि आईचं खूप खोल असं नातं होतं. त्याला ती कौस्तुभ मणी म्हणत असे. रेणुकावरही तिचा जीव होता. गिरीशचं आणि तिचं फारसं पटत नसे. रांगतं बाळ असताना जो तिला बिलगत असे, सोडत नसे, तो मोठा होऊ लागला तसं त्याचं स्वतंत्र व्यक्तिमत्व घडत गेलं आणि तो तिचं ऐकेनासा झाला. मुख्य म्हणजे अभ्यास करण्याविषयीचा तिचा आग्रह तो मानत नसे. त्यात भरीस भर म्हणजे मुलांची स्वतंत्र आयुष्य जशी सुरू झाली तशी माझ्या भोवती गुंजन घालणाऱ्या आणि आईला मुळीच न आवडणाऱ्या बोधपट दिग्दर्शकाशी माझी मैत्री झाली. आईच्या मनात मी पुन्हा लग्न करावं असं होतं. पण तिच्या नावडत्या माणसाच्या मागणीला मी होकार दिला तेव्हा ती हतबल झाली. त्याच्याशी लग्न करण्याच्या माझ्या निर्णयाचे परिणाम मुख्यतः आईला, आणि काही अंशी मुलांना, भोगावे लागले. आईला जन्माता माझ्यापासून जितका त्रास झाला नसेल तितका माझ्या ह्या एका कृत्त्याने झाला. तिच्या क्लासमध्ये येणाऱ्या एक बाई माझ्या नवऱ्याच्या पहिल्या बायकोच्या नात्यातल्या होत्या. त्यांनी तिला त्याच्या एकूणच पण खास करून बायकांच्या बाबतीतल्या वर्तनाबद्दल काही गोष्टी सांगितल्या होत्या. सहाजिकच तिला वाटत होतं की अशा माणसापासून तिच्या मुलीला सुख मिळणं अशक्य. तिने माझं मन वळवण्याचे आटोकाट प्रयत्न केले आणि मी तिला आश्वासन देत राहिले की त्याने त्याच्या जीवन पद्धतीत बदल करण्याचं मला वचन दिलं आहे. त्याच्या खरेपणावर तिला विश्वास नव्हता. ती तिच्या विरोधात ठाम होती. या गुंतागुंतीत सर्वात क्रूर गोष्ट ही की माझ्या ह्या नवऱ्याला स्वतःचं घर नव्हतं आणि शेवटी तो तिच्याच घरी राहायला आला. मुलीच्या आणि नातवंडांच्या प्रेमाखातर तिने ह्या अप्रिय माणसाचा उद्दाम सहवास सहन केला. मुलांनीही सहन केला. आई गेल्यानंतर सहा वर्षांनी मी शेवटी त्याच्यापासून फारकत घेतली आणि तिच्या फोटोपुढे ओक्साबोक्शी रडले. पण ती गेल्यावर मी रडण्याचा तिला काय फायदा? फायदा मलाच. चूक कबूल करून स्वतःला थोडं हलकं करून घेतलं हा. ह्या साऱ्या प्रकाराविषयी तिच्या वहीत मला दोन-तीन कविता सापडल्या. एक कविता शांत सागरी कशास उठविलींस वादळें ह्या जुन्या गाण्याच्या पहिल्या ओळीपासून सुरू होते. तिच्या कवितांवरून इतरांना मी कशी दिसत होते ते कळलं.
आणखी एका घटनेने तिला जबर धक्का बसला. अनिल हार्डर्बोर्ड नावाच्या ज्या कंपनीत तिने काहीं पैसे गुंतवले होते ती कंपनी कोसळली. श्री बरवेंनी काखा वर केल्या. आई आशेने शेअरहोल्डर्सच्या प्रत्येक मीटिंगला जायची आणि हिरमुसली होऊन परत यायची. नक्की काय झालं हे तिला समजत नव्हतं. ते समजून घेण्याचा तिने खूप प्रयत्न केला. ही लोकांची समजून उमजून केलेली फसवणूक होती की व्यवसायातला शुद्ध ढ पणा होता हे तिला कळत नव्हतं. शेवटी नाइलाजाने तिला त्या गुंतवणुकीवर पाणी सोडावं लागलं.
आईच्या आयुष्यात बाहेरून येणाऱ्या अशा दुःखांना तिला जरी सतत तोंड द्यावं लागत होतं तरी सुख देणारे काहीं उपक्रम तिने स्वतःसाठी निर्माण केले होते. मुंबईला आल्यावर तिचं भजन सुटलं होतं त्याची तिला हुरहुर लागली होती. तिने वनिता समाजात दादांचा क्लास सुरू केला. तिथल्या भगिनींना वाटू लागलं की हा क्लास समाजाचा नसून इंदू ताईंचा खाजगी क्लास आहे. ही तक्रार तिच्या कानावर आली म्हणून तिने क्लास घरी आणला. त्याचं नाव स्वानंद भक्ती मंडळ ठेवलं. महिन्यातून दोन दिवस दादा घरी येऊन क्लास घेऊ लागले. ते आणि वहिनी, म्हणजे त्यांच्या पत्नी, आईकडेच राहत असत. पहिल्या दिवशी आदल्या खेपेस शिकवलेल्या भजनांचा ते पाढा घेत आणि दुसऱ्या दिवशी दोन नवे अभंग शिकवत. नवी भजनं आईच्या टेपरकॉर्डरवर ती रेकॉर्ड करून घेत असे. आठवडाभर ती त्यांचा सराव करी. महिन्यातल्या उरलेल्या तीन बुधवारी आई क्लास घेत असे. बायका प्रथम रेकॉर्डिंग ऐकायच्या आणि नंतर आईच्या मार्गदर्शनाखाली नवीन भजनांचा सराव करायच्या. साथीला पेटीवर विमल धारप आणि तबल्यावर गोखले रोडवर राहणारे श्री बाम असायचे. मुलं शाळेतून आणि मी नोकरीवरून घरी आलो की तुकाराम, ज्ञानेश्वर, संत कवी कानी पडत. वातावरण आनंदमय असे. दोन वर्षं कॉलेजात शिकवल्यावर शैक्षणिक पद्धतीत होणाऱ्या बदलांमुळे मला १९७६ साली ती नोकरी सोडावी लागली. मी फेमिना ह्या स्त्रीयांसाठी निघणाऱ्या मासिकांत उपसंपादक म्हणून नोकरी धरली.
आईने आणि मी स्वयंपाकाचे दिवस वाटून घेतले होते. पण दादा येत असत तेव्हा दोन्ही दिवस आई स्वयंपाक करायची. त्यांचा नाश्ता, जेवण, दुपारचा चहा-खाणं, त्यांना काही भाज्या खास प्रिय होत्या त्या करणं अशी सकाळपासून रात्री निजानीज होईपर्यंत तिची धावपळ चाललेली असे. तोपर्यंत तिची साठी उलटली होती. मी कधीतरी तिला म्हणायची जेवणाचा इतका आटापीटा का? दादा आध्यात्मिक आहेत. ते साधं भाजी-आमटी-पोळीचं जेवण आनंदाने जेवतील. त्यावर ती म्हणत असे, “पण माझा आनंद त्यांना करून घालण्यात आहे. तो मी का घेऊ नये?”
आई परफेक्शनिस्ट होती. करायचं ते बिनचुक झालं पाहिजे. त्यात कोणतीही कसर राहता कामा नये. क्लासच्या सभासदांसाठी एका सुरात वाजतील असे कासं आणि पितळ ह्या मिश्र धातूचे टाळ तिने बनवून घेतले होते. तिचे टाळ आणि भजनाची वही मी जपून ठेवली आहे. स्वानंद भक्ती मंडळाला कार्यक्रमाची आमंत्रणं येत असत. तेंव्हा कोणी कोणत्या क्रमाने त्यांना नेमून दिलेली भजनं म्हणायची ह्याची तिची खास योजना होती. कॅलेंडरवरचे एक ते दहा, बारा, चौदा, जितक्या बायका हजर राहणार असतील तितके अंक कापून त्या-त्या बायकांच्या हाती ती देई. मंचावर तू गा मी गा हा गोंधळ झालेला तिला खपत नसे. प्रत्येक बाई क्रमाने उठून माइक समोर येई आणि तिला दिलेलं भजन गाऊन झालं की मागे सरे. एकदा स्वानंद भक्ती मंडळाचा कार्यक्रम दूरदर्शनवर झाला. बायका उत्तम गायल्या. पण आई एका गोष्टीमुळे वैतागली होती. “आम्ही मध्ये बसलेलो. आमच्यापासून दूर एका टोकाला पेटी आणि दुसऱ्या टोकाला तबला. असं कधी गाणं होतं का? वाद्य गाणाऱ्यांच्या जवळ नकोत?”
आईला अभंगाविषयी आणि दादांविषयी काय वाटत असे त्याबद्दल तिच्या कागदपत्रात दोन लेख आहेत. एक तिच्या हातचा आहे, पण त्यावर नाव आहे मालती मराठे असं आणि पत्ता आहे लोकमान्य नगर, माहीम, असा. दुसरा लेख वेगळ्याच हस्ताक्षरातला आहे आणि त्यावर नाव पत्ता काही नाही. दोन्ही लेख फुलस्कॅप कागदावर लिहिलेले आहेत. लेखांच्या सुरुवातीचे परिच्छेद वेगळे आहेत पण मुख्य विषयाकडे नेणाऱ्या त्या भिन्न वाटा आहेत. मुख्य मजकूर तोच आहे आणि त्याच शब्दांत लिहिलेला आहे– मनोहर नारायण सबनीस उर्फ दादा यांचा परिचय. आई नेहमी म्हणायची की ज्यांचा काहीही अभ्यास नाही, ज्यांच्या ठिकाणी अध्यात्मातला ‘अ’ देखील नाही, जे केवळ पैसे मिळवण्याचा मार्ग म्हणून भजन शिकवतात, त्यांची जग गुरू-गुरू म्हणून वाहवा करतं. आणि दादांसारखा माणूस साधा म्हणून, आणि आपली प्रतिमा तयार करण्यात त्याला रस नाही म्हणून ओळखला जात नाही. ही परिस्थिती सुधारण्यासाठी हा लेख लिहिला होता हे उघड आहे. तो प्रसिद्ध झाला की नाही कळायला मार्ग नाही. त्याची छापील प्रत कुठेही नाही. तो बराच लांब आहे म्हणून इथे देत नाही. पण भजनाविषयीच्या आणि दादांविषयीच्या तिच्या सर्व भावना त्यात उतरल्या आहेत. बुधवारी आईचा भजन वर्ग असे तर सोमवारी दिवसभर वधुवर सूचक मंडळ. त्याची देखील तिने शिस्तशीर व्यवस्था केली होती. तिने नोंदवह्यांचे दोन गठ्ठे ठेवले होते. एकात मुलींची माहिती, शिक्षण, मागण्या वगैरे आणि दुसऱ्यात मुलांची. प्रत्येक स्थळाचे अपेक्षित माहितीचे कॉलम होतेच पण शिवाय अनपेक्षित असा शेवटी एक कॉलम होता : ‘हुंडा घेणार नाही.’ येणाऱ्या मंडळींना हा बारीकसा चिमटा होता. वाटाघाटीत कोण काय मागेल तिला कळणं शक्य नव्हतं पण तिचं मत त्या कॉलमच्या मार्फत मांडण्याचं काम तिने केलं होतं. कधीकधी त्या रकान्यात बरोबरची खूण केलीही जात असे. त्याचा आईला खास आनंद होत असे.
स्थळं शोधणाऱ्यांची सकाळपासून रीघ लागायची. आई व्हरांड्यात मार्गदर्शन करायला बसलेली असायची. वह्या चाळणं, योग्य वाटेल त्या ठिकाणांची नोंद करून घेणं हे लोकांचं काम. कधी तरी खडा लागे. भेटीगाठी होत. लग्न ठरलं की आईला आमंत्रण येई. लग्न मुंबईत असलं तर त्याला ती आवर्जून जाई. शुभेच्छेचं प्रतीक म्हणून रंगीत कागदात गुंडाळलेला लहानसा सुबक लामण दिवा ती नवविवाहितांना देई. तिच्या हिशेबाच्या वहीत एके ठिकाणी ‘तीन लामण दिवे’ अशी नोंद आहे. याचा अर्थ ती ते आणून ठेवत असे. तहान लागली की विहीर खणा ही पद्धत तिच्या शिस्तीत बसत नसे. ज्यांची लग्न मुंबईच्या बाहेर झालेली असत, ती जोडपी परत आल्यावर आठवणीने तिला भेटायला येत. घरात लामण दिवे असत त्यामुळे ती त्यांनाही ते पटकन देत असे. दोन चार वेळा असंही झालं होतं की विवाहेच्छूंना भेटण्यासाठी जागा नव्हती. त्यांच्या भेटी आईच्या खोलीत झाल्या. भजनाच्या वर्गांप्रमाणेच हेही कार्य तिने वनिता समाजात सुरू केलं होतं. दोन्ही कार्य संस्थेची असावी, वैयक्तिक नसावी हा त्या मागचा विचार. पण समाजातल्या बायकांनी हेही कार्य वैयक्तिक आहे असं ठरवलं आणि नाइलाजाने तिला तेही घरी आणावं लागलं. पण समाजावर तिची निष्ठा होती. तिने त्यांच्या कार्यक्रमांसाठी दोन तीन छोट्या नाटिका लिहिल्या होत्या. नांदी नावाच्या नाटिकेत संगीत नाटकाचा थोडक्यात इतिहास सांगितला होता. सूत्रधार आणि नटी यांच्या तोंडी माहिती घातलेली होती. अभिनयाचे आणि गाण्याचे अंग असलेल्या तरूण मुलींकडून तिने कथेचा भाग करून घेतला होता. दुसरं नाटक होतं दिंडी. त्तिने कल्पिलेल्या ह्या गोष्टीत बसतील असे अभंग तिने निवडले होते. गाणारे होते रेणुका आणि विक्रम. तिसरं नाटक होतं भारूड. त्यात दोन भारुडं होती -- तुकाराम महाराजांचं अव्वा चालली पंढरपूरा आणि त्याबरोबर आईने रचलेलं समाकालीन भारूड आज मी जातेय पार्टीला बाई पार्टीला.
कोणीही काहीही चांगलं केलं की त्याचं तोंडभरून आई कौतुक करायची. कधीकधी छोटीशी भेट देऊन ती ते प्रदर्शित करी. वनिता समाजात गाण्याच्या स्पर्धा होत असत. कधीकधी आईला एखादीचं गाणं खूप आवडायचं. त्या मुलीला परीक्षकांनी बक्षीस दिलं नाही तर ती आपल्याकडून छोटसं बक्षीस द्यायची. बहुदा तिचं आणि परीक्षकांचं एक मत व्हायचं. मग समाजाच्या बक्षीसात तिच्या बक्षीसाची भर पडत असे. पुढे नावारूपाला आलेल्या दोन मुलींना तिने बक्षीसं दिली होती -– आरती अंकलीकर आणि साधना घाणेकर, जी नंतर साधना सरगम नावाने गाऊ लागली. सोमवारी वधुवर, मंगळवारी शिवण, बुधवारी भजन आणि शुक्रवारी वनिता समाज असे तिचे वार लागलेले होते त्यात गुरुवार मोकळा होता. त्या दिवशी ती महिला दक्षता समितीच्या कार्यालयात मदत करायला जात असे. ती स्त्रीवादी होती. स्त्रीवादाचे सिद्धांत ती जाणत नव्हती पण आपल्या सामाजिक रचनेत बायकांवर अन्याय होतो ह्याविषयी तिला जाणीव होती आणि त्याबद्दल राग होता. तिने लिहिलेल्या सर्व नाटिकांत हे व्यक्त झालेलं आहे. महिला दक्षता समिती व्यतिरिक्त ती महीन्यातून एकदा तरी कोसबाडला जात असे. ती डहाणूची म्हणून तिला वारली जमातीविषयी आस्था होती. कोसबाडला अनुताई वाघ ह्यांच्या उपक्रमात ती मदत करत असे. कोसबाडच्या टेकडीवर अनुताईंनी आदिवासींच्या उन्नतीसाठी 'कोसबाड प्रकल्प' म्हणून संस्था स्थापन केली होती. शिवाय आदिवासींच्या शिक्षणासाठी पाळणाघरे, बालवाड्या, प्राथमिक शाळा, प्रौढ शिक्षण वर्ग, बालसेविका ट्रेनिंग कॉलेज इ. शैक्षणिक संस्था सुरू केल्या होत्या. ह्यापैकी कोणत्या उपक्रमात आई कोणत्या प्रकारची मदत करत असे हे मी जाणून घेतलं नाही. ज्या सावित्री मासिकात आईचा आजीविषयीचा लेख प्रसिद्ध झाला होता ते मासिक स्त्रीजागृतीसाठी अनुताई वाघांनी सुरू केलं होतं आणि त्याचं संपादन त्याच करीत असत.
आईचं एकूण जीवनकार्य हे असं भरगच्च भरलेलं असायचं. त्यामुळे प्रभाताई परांजपे, छायाताई गोडबोले, मालतीबाई पेंडसे ह्या तिच्या मैत्रिणी तक्रार करायच्या -- इंदूताई नेहमी बिझी असतात. कधी भेटावं कळत नाही. त्यातल्या त्यात आई मालतीबाईंना नियमित भेटत असे कारण ती आणि त्या मिळून दादर-माटुंगा कल्चरल सेंटरच्या शास्त्रीय संगीताच्या मासिक कार्यक्रमांना न चुकता जात असत. दोघींना संगिताचं वेड होतं. इतर मैत्रिणींना ते नव्हतं. महीन्यातून एकदा तिचा आणखी एक कार्यक्रम असायचा. डॅडींचे जीवलग मित्र दत्ताराम पालेकर आणि त्यांची पत्नी लीलाताई (डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांची बहीण) यांच्याबरोबर आई होमिओपाथीचे डॉ. हब्बू ह्यांच्याकडे गुडघे दुखीसाठी जात असे. त्यांचा दवाखाना सायन सर्कल जवळ होता. डॉक्टरांनी तिघांना महिन्याचं औषध दिलं की ते सर्कलच्या एका कोपऱ्यावर असलेल्या हनुमान कॉफी हाऊस मध्ये इडली-सांबारचा नाश्ता करत.
डॅडी गेल्यावर आईचं नाटकं पाहणं बंद झालं होतं. सिनेमाला ती फारशी कधी गेलीच नाही. तिची १९८३ साली सत्तरी झाली तेव्हा आम्ही तिला बळेबळे शक्ती चित्रपट पहायला नेलं. तो सोडून इतक्या वर्षांत तिने एकही चित्रपट पाहीला नव्हता. १९८६ साली ७३ वर्ष पूर्ण व्हायच्या दोन महीने आधी आणि डॅडी गेल्यावरचा १९ वर्षांचा एकटीने केलेला प्रवास संपवून, ती गेली.
निर्मलने आणि मी आईच्या जाण्याबद्दल अनेकदा चर्चा केली आहे. आमच्याकडून काही कमी पडलं का. आम्ही फार उशीरा जाग्या झालो का. तिच्या शरीरात काय चाललंय ह्याचं बाहेर दिसत असलेल्या चिन्हांवरून आम्ही निदान करू शकलो नाही ते का? दुर्लक्ष की रोगाची अपुरी माहिती? आधी पावलं उचलली असती तर ती आणखी काही वर्ष जगली असती का?
आईला मोठ्या आतड्याचा कर्करोग झाला होता. त्याचं १९८६च्या फेब्रुवारीत निदान होई पर्यंत तो पित्ताशयापर्यंत पोहोचला होता. मागे बघता आधीच्या दोन वर्षात, म्हणजे १९८४ सालापासून रोगाचं एकेक चिन्ह दिसू लागलं होतं असं जाणवतं. १९८४ साली नेहमीच्या शिरस्त्या प्रमाणे आई दिवाळीत १० दिवस लोणावळ्याला, मराठे नावाच्या तिच्या मैत्रिणीकडे, गेली होती. तिला फटाक्यांचे आवाज सहन होत नसत म्हणून ती दर वर्षी लोणावळ्याला पळ काढायची. त्या वर्षी तिची दहा दिवसांची सुट्टी संपायच्या दोन दिवस आधीच ती परत आली. तिला कधी नव्हे तो एकाएकी जुलाब झाला होता. त्याला कारण काहीच नव्हतं म्हणून ती थोडी नर्व्हस झाली होती. घरी आल्यावर तिला बरं वाटलं आणि जे झालं ते ती विसरली. पण मी विसरायला नको होतं असं रोगाची इत्थंभूत माहिती करून घेतल्यावर माझ्या लक्षात आलं. एकाएकी जुलाब होणं किंवा बद्धकोष्टता उत्पन्न होणं हे कोलन कॅंसरचं एक चिन्ह असू शकतं. ह्या नंतर आईचं तोळ्या तोळ्याने वजन कमी होऊ लागलं. ती म्हणायची वय झालं की होतं. ब्लाऊजची बाही किती सैल झाल्येय ते ती दाखवत असे. वयोमानाने होतं ह्या पलीकडे तिच्या घटत असलेल्या वजनाचा मी विचार केला नाही. करायला हवा होता. आईच्या जिभेला चरे गेले होते. ती ते रोज मला दाखवायची. मी नंतर काढलेल्या माहीतीत हे रोगाचं चिन्ह असल्याचं आढळलं नाही. तरीही ते काही तरी वेगळं आहे असं जाणवत होतं आणि डॉक्टरला त्या विषयी सांगायला हरकत नव्हती. तिची भूक कमी झाली होती. ती म्हणाली जिभेला चरे आहेत म्हणून खाववत नाही. पण कारण वेगळंच असण्याची शक्यता माझ्या ध्यानी आली नाही.
आई तिची सर्व कामं नेहमी प्रमाणे करत होती. म्हणावा तसा थकवा वगैरे वाटत नव्हता. मात्र १९८६च्या सुरुवातीस तिला बारीक ताप येऊ लागला. तेंव्हा बाळू जागा झाला. तो अनेकदा सकाळी कामावर जाण्या आधी आईला भेटायला एक चक्कर मारत असे. त्यांच्या खूप गप्पा व्हायच्या. तो मेडिकल रेप्रझेंटेटिव्ह होता, म्हणजे अर्धा डॉक्टरच. तिला ताप येऊ लागला तेव्हा तो तिला त्याच्या डॉक्टर मित्राकडे डॉ समसीकडे घेऊन गेला. तिथपासून चाचण्यांना सुरुवात झाली. पोटाच्या सोनोग्राफीत आतड्यात मोठा गोळा दिसला आणि पित्ताशयाला झालेली लागणही स्पष्ट दिसली. डॉ अरूण समसींनी सर्व रिपोर्ट्स पाहीले आणि आमची शंका सिद्ध केली. कोलन कॅंसर. लिव्हरला लागण. आम्ही हबकलो. डॉक्टरांनी ऑपरेशन करायचं ठरवलं. थोडी आशा जागृत झाली. डॉक्टर म्हणाले सहा महीने जीवदान मिळेल. तरी ही आई पूर्ण बरी होईल अशी आशा होतीच. मनात आशा असते म्हणून आपल्याला जगणं शक्य होतं. आईचा डॉ. समसींवर पूर्ण विश्वास होता. त्यांनीच ऑपरेशन केलं पाहिजे असं तिने ठरवलं. इथे आम्हाला बुचकळ्यात टाकणारी एक गोष्ट नोंदवते. आपल्याला कोणता आजार झाला आहे हे तिने एका शब्दानेही आम्हाला विचारलं नाही. तिला आतून समजलं असेलंच, पण त्याची वाच्यता तिला नको होती असं आम्ही ताडलं. ऑपरेशन के ई एम हॉस्पिटलमध्ये १३ मार्चला झालं. आई रोजचा हिशेब ठेवत असे. तिच्या हिशेबाच्या वहीत शेवटची नोंद ता ३ मार्चची आहे. त्या नंतरची पानं कोरी आहेत. ऑपरेशन नंतर दहा दिवस ती हॉस्पिटलमध्ये होती. मी १९७८ साली फेमिना सोडून ग्लॅक्सो कंपनीत नोकरी धरली होती. तिथे दर वर्षी कंपल्सरी वैद्यकीय चाचण्या करून घ्याव्या लागत. त्याच वर्षी, म्हणजे १९८६ साली मला इस्कीमिया निघाला. झोप व्यवस्थित झाली पाहिजे असं डॉक्टरांनी सांगितलं. म्हणून निर्मलने दहा दिवस हॉस्पिटलमध्ये रात्रपाळी केली. मी ऑफिसातून सुट्टी काढली होती. मी दिवस पाळी करत असे. दहा दिवसांनी आई घरी आल्यावर सुद्धा निर्मल घरचं काम आटपून लगबगीने रात्र पाळी करायला यायची. नंतर जेव्हां आईचे शेवटचे दिवस आले आहेत अशी चिन्हं आम्हाला दिसू लागली, तेंव्हा आम्ही दोघी तिच्या दोन बाजूला निजू लागलो.
जूनपर्यंत आईने आपल्याला कोणताच आजार झाला नाही अशा प्रकारे आपले नित्याचे व्यवहार चालू ठेवले – भजन, शिवण, स्त्री दक्षता. जूनच्या शेवटच्या आठवड्यात ती स्त्री दक्षता समितीच्या कार्यालयातून परत आली ती जेमतेमच. आपली जिद्द आपल्याला एका विशिष्ट टप्प्या पर्यंतच नेऊ शकते. मग आपल्याला शरीराचं मानावंच लागतं. त्या दिवशी तिला अक्षरशः चालवत नव्हतं. दुसरे दिवशी दात घासायला मी तिला बेसिनशी नेलं तेंव्हा तिचे पाय अशक्तपणाने थरथरू लागले आणि तिचं वजन ते पेलेनात. के इ एम ला तपासणीसाठी नेलं तिथे तिला उभं राहावे ना. ती भिंतीला टेकून खाली सरकली. आमच्या लक्षात आलं की ह्यापुढे तिला बिछान्यातून उठणं शक्य होणार नाही. मी सकाळी तिला आंघोळ घालून ऑफिसला जात असे ते आता स्पंजिंग सुरू झालं. अलकाची खूप मदत असायची. पण दिवसभर आम्ही कोणीच नसायचो त्यामुळे अलकाला घर आणि आई दोन्ही झेपणं शक्य नव्हतं. आम्ही आईसाठी गुलाब नावाची आया ठेवली. ती अत्यंत सुस्वभावी होती. पण आईची इच्छा आपलं सगळं अलकाने करावं अशी असायची. गुलाब म्हणाली अलकाला त्यांचं करू दे. मी तिला मदत करेन आणि तिचं घरातलं काम सांभाळेन.
जुलैच्या सुमारास आईला बारीक ताप येऊ लागला. क्रोसिन दिली की उतरायचा आणि पुन्हा चढायचा. डॉक्टर येऊन बघून गेले. ते काही म्हणाले नाहीत पण आम्ही ओळखलं की आता त्यांच्या हाती करण्या सारखं काही उरलं नव्हतं. आई म्हणायची साधा ताप बरा करता येत नाही हे कसले डॉक्टर? तिला काय माहीत की आता पित्ताशयाच्या लागणीने उचल खाल्ली होती. आईचा होमिओपॅथीवर विश्वास होता. पण तोपर्यंत तिच्या डॉ. हब्बूंचं निधन झालं होतं. शेजारचे डॉ गणेश राव यांना मी भेटले. म्हटलं तिच्या सामाधानासाठी काही तरी औषध द्या. ते म्हणाले त्यांना एखादा प्लॅसिबो देण्यापेक्षा शेवटचा उपाय म्हणून तुम्ही डॉ. कासड यांना भेटा. हे पारशी डॉक्टर अनेक वर्ष कॅंसरवर होमिओपॅथीचे काय उपचार होऊ शकतात ह्याचा अभ्यास करत आहेत. ते काही तरी सुचवू शकतील. मी डॉ कासडना भेटले. ते घरी आले. आईच्या बिछान्याशी दोन तास बसून त्यांनी तिच्या आरोग्याचा संपूर्ण इतिहास समजून घेतला. त्यांनी आम्हाला सल्ला दिला. कातडी खाली रोज एक इंजेक्शन घ्यावं लागेल. ही इंजेक्शनं भारतात उपल्ब्ध नव्हती. ती स्वित्झरलंडहून मागवावी लागणार होती. मी तिकडे लगेच पत्र धाडलं. त्या काळात ईमेलची सुविधा नव्हती. त्यामुळे तिकडून इंजेक्शनं यायला उशीर झाला. तोवर डॉ रावांनी दिलेलं मदर टिंक्चर रोज आईला देत होतो. त्याने आईचा ताप जो उतरला तो उतरला. इंजेक्शनं आल्यावर डॉ राव रोज येऊन ती देऊ लागले.
जुलैच्या मध्यापर्यंत आम्ही आईचा भजनाचा क्लास चालू ठेवला होता. ती बिच्छान्यात पडलेली असायची आणि बायका शेजारी भजन करीत असायच्या. पण नंतर तिला कोणताच आवाज सहन होईनासा झाला. एके काळी जे मधुर वाटत असे, ज्याने तिला कठीण काळात मानसिक आधार दिला होता ते भजन आता बंद करावं लागलं. १४ ऑगस्टला आई बरळू लागली. नंतर तिची शुद्ध गेल्यासारखं झालं. २१ ऑगस्टला डॉ राव इंजेकश्नची तयारी करत होते. कमल मामी आणि रेणुका आईच्या जवळ होत्या. कमल मामी डॉक्टरांना म्हणाली, ते इंजेक्शन खाली ठेवा. ह्यांना बघा. आईने शेवटचा श्वास घेतला होता. मी ऑफिसमध्ये होते. तिथे रेणुकाने मला फोन केला. मी घरी आले. निर्मलला कळवलं. आईच्या चेहऱ्यावरच्या वेदनेच्या रेषा पूर्णपणे पुसून गेल्या होत्या. ती शांत झाली होती. तिला नेलं त्या वेळेस स्वानंद भक्ती मंडळाच्या बायकांनी निरोपाचं भजन केलं. आईची यात्रा संपली.